अग्निपंख - डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम - मराठी पुस्तक परीक्षण (Book Review)


पुस्तकाचे नाव: 
अग्निपंख

लेखक: डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

प्रकाशन: राजहंस प्रकाशन

मूल्य: ₹ २२०/-

पृष्ठसंख्या: १७८ पाने

सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण संबंधित परीक्षण व्हिडीओ स्वरूपात पाहू शकता

मुखपृष्ठाविषयी थोडक्यात: पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे चित्र आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर आणि चिंतनशील भाव त्यांच्या विचारशीलतेची साक्ष देतात. हे प्रतिबिंब त्यांच्या तपस्वी जीवनशैलीचे, अथक परिश्रमांचे आणि देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाचे प्रतीक आहे. मुखपृष्ठाच्या डाव्या बाजूला आकाशात उंच झेपावणारे रॉकेट, कलाम सरांच्या भव्य आणि दूरदृष्टीने चाललेल्या वैज्ञानिक यशाचे प्रतीक म्हणून उभे आहे.

हे पुस्तक म्हणजे भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्राप्त केलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. त्यांच्या कार्य आणि प्रेरणादायी जीवनाचे दर्शन देणारी काही निवडक पुस्तके म्हणजे, 'प्रज्वलित मने', 'अदम्य जिद्द', 'टर्निंग पॉइंट्स', 'दीपस्तंभ', 'इंडिया व्हिजन २०२०' इत्यादी. लहानपणी खडतर परिस्थितीतून शिक्षणाचे महत्व समजून, देशासाठी अखंड मेहनत घेतलेल्या आणि राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या डॉ. कलाम यांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे.

डॉ. कलाम यांना शास्त्र आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची विशेष आवड होती. तरुणाईच्या हातात देशाचे उज्ज्वल भविष्य आहे, यावर त्यांचा विश्वास होता आणि ते तरुणांना नेहमीच प्रोत्साहित करत. आत्मचरित्राच्या पृष्ठांमध्ये एकीकडे त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षाची चित्रण केली आहे, तर दुसरीकडे अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या प्रख्यात क्षेपणास्त्रांच्या निर्मितीची कहाणी सांगितली आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ डॉ. कलाम यांचे आत्मचरित्र नसून, भारताच्या अवकाश संशोधन आणि संरक्षण विज्ञानाच्या विकासाचे महाकाव्य आहे.

आत्मचरित्राची सुरुवात अथर्ववेदातील ओळींनी होते, ज्या ईश्वराचे सर्वव्यापक अस्तित्व सांगतात. त्यांचा जन्म रामेश्वरम येथे एक अशिक्षित नावाड्याच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे संस्कार घेतले. त्यांच्या आई-वडिलांनी दिलेली ईश्वरभक्ती आणि नेहमीच चांगले करण्याची शिकवण, त्यांच्या जीवनातील संघर्षांना ताकद देणारी ठरली. 

शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी इयादुराई सालोमन यांच्या प्रेरणेमुळे आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले, आणि पुढे एमआयटीमधील शिक्षणाने त्यांच्यात आत्मविश्वास जागवला. डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जडणघडणीत त्यांच्या कुटुंबाचे आणि शिक्षणाचे मोलाचे योगदान आहे. 

त्यांच्या जीवनातील अनेक कठीण प्रसंगांचे वर्णन या आत्मचरित्रात आढळते. कधीकाळी वर्तमानपत्राचे गाठोडे उचलणाऱ्या डॉ. कलाम यांनी, नंतर वैज्ञानिक म्हणून आपल्या ध्येयास पूर्ती करण्यासाठी अमेरिकेत नासामध्ये चार महिन्यांचे एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर डी.आर.डी.ओ. मध्ये काम करताना त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वी केले. 

डॉ. कलाम यांचे जीवन हे नुसतेच वैज्ञानिक कामगिरीचे नसून, भारतीय स्वावलंबनाच्या दिशेने एक महान प्रवास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV), पीएसएलव्ही, त्रिशूल, पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग यांसारख्या प्रकल्पांनी भारताला जागतिक पातळीवर क्षेपणास्त्र सामर्थ्य मिळवून दिले. १९८१ साली मिळालेला पद्मभूषण आणि नंतरच्या अनेक सन्मानांनी त्यांच्या यशाचा गौरव केला.

त्यांच्या आत्मचरित्रात तरुणांना ध्येयप्राप्तीसाठी प्रोत्साहित करणारी मोलाची शिकवण आहे. 'तरुणांनी हृदय आणि आत्मा एकत्र करून काम करावे', असा संदेश देणारे कलाम सर आपल्याला नेहमीच आठवण करून देतात की, अपयशांमधूनच यशाची बीजे रोवली जातात. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील असाधारण कामगिरीमुळे भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचे योगदानही त्यांनी अधोरेखित केले आहे.

डॉ. अब्दुल कलाम यांच्या काव्यप्रेमाचे प्रतिबिंब या पुस्तकात अनेक ठिकाणी आढळते. जिद्द, चिकाटी, आणि अथक परिश्रमांनी साधलेले यश हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. भारताच्या अवकाश संशोधन आणि शस्त्रास्त्र विकासाची ही कहाणी वाचकाला उभारी देते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या