अर्थ मराठी चे संस्थापक, अभिषेक ठमके यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 'नॅशनल अवॉर्ड २०२५’ जाहीर

मुंबई : साहित्य, विज्ञानकथा, चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलता आणि सामाजिक कार्य या सर्वच क्षेत्रांमध्ये आपली छाप उमटवणारे सुप्रसिद्ध साहित्यिक, संपादक व AI तज्ज्ञ अभिषेक ठमके यांची निवड साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 'नॅशनल अवॉर्ड २०२५’ या प्रतिष्ठित सन्मानासाठी झाली आहे. या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिरपूर, जिल्हा धुळे येथे लवकरच होणार असून, देशभरातील साहित्यिक, पत्रकार, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


अभिषेक ठमके गेल्या अकरा वर्षांपासून ‘अर्थ मराठी दिवाळी अंक’ संपादित करत आहेत आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली या अंकाने चार वेळा IDAA कडून ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्कार पटकावला आहे.

लेखक म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला असून ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ या पुस्तकाला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचा मान मिळाला आहे. ‘अग्निपुत्र,’ ‘मैत्र जीवांचे,’ ‘ओमेगा अपग्रेडेड,’ ‘गुरुत्वाकर्षणाचा अंत’ या पुस्तकांनी त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांच्या ‘आऊट ऑफ ऑफिस’ या मराठी कादंबरीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली असून इंग्रजी साहित्यविश्वात पदार्पण करताना लिहिलेल्या ‘Out of Office’ या कादंबरीच्या २००० हून अधिक प्रती जपान, इंग्लंड आणि अमेरिका येथे विकल्या गेल्या आहेत. त्यांची Beyond Boundries, Echoes of Silence, Dating with Sia, Magnet ही आगामी पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या साहित्यिक प्रवासातील हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो.

साहित्याची मांडणी करताना ते नेहमी वास्तव आणि कल्पना यांचा समन्वय घडवतात. मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत, बदलणारी जीवनशैली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजावर होणारा प्रभाव हे विषय ते प्रभावीपणे मांडतात. प्रवाही आणि सोपी भाषाशैलीमुळे त्यांचे लेखन युवकांना आकर्षित करते आणि विचार करायला प्रवृत्त करते. साहित्याला केवळ मनोरंजन न मानता सामाजिक बदलाचे माध्यम म्हणून स्वीकारण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांना इतरांपासून वेगळा ठरवतो.

विज्ञानकथा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविण्यातही ठमके आघाडीवर आहेत. पंतप्रधानांकडून आदर्श पुरस्काराने सन्मानित डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘लिहू आनंदे’ या पुस्तकातील 'सायन्स-फिक्शन' विभागाचे लेखन त्यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक क्षेत्रात ते तज्ज्ञ मानले जात असून, AI विषयावरील लेखन व संशोधनपर कार्यात ते सतत सक्रिय आहेत. साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राबरोबरच ठमके यांनी याआधी मराठी चित्रपटसृष्टीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. ‘किल्ला,’ ‘काट्याकळजात घुसली,’ ‘बंध नायलॉनचे,’ ‘डबल सीट’ आणि ‘सैराट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी क्रिएटिव्ह कॅम्पेन डिझाइन केले आहेत ज्यामुळे त्यांची कल्पकता जनमानसात पोहोचली.

सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग प्रेरणादायी आहे. त्यांनी आजवर ४३ वेळा रक्तदान केले असून सलग तीन वर्षे नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 'नॅशनल अवॉर्ड २०२५’ हा सन्मान अभिषेक ठमके यांच्या अखंड साहित्यप्रेमाचा, नवनवीन कल्पनांच्या ध्यासाचा आणि सातत्यपूर्ण सामाजिक-जाणीवेच्या प्रवासाचा योग्य गौरव ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या