रानवाटा - मारुती चितमपल्ली - मराठी पुस्तक परीक्षण (Book Review)

पुस्तकाचे नाव: रानवाटा

लेखक: मारुती चितमपल्ली

प्रकाशन: साहित्य प्रसार केंद्र

मूल्य: ₹ १५०/-

पृष्ठसंख्या: १५० पाने

सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण संबंधित परीक्षण व्हिडीओ स्वरूपात पाहू शकता

मुखपृष्ठाविषयी थोडक्यात: पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जंगलाचे दाट दृश्य आणि उंच वाढलेली झाडे सहजपणे नजरेत भरतात. गर्द हिरव्या झाडीतून जाणाऱ्या पायवाटा एक अनोखी सफर अनुभवायला लावतील, असे जाणवते. वाघाचे चित्र हे मुखपृष्ठावर विशेषतः लक्षवेधी असून, त्यातून वन्यजीवांबद्दलची माहिती पुस्तकात सखोल मिळणार आहे, याचा संकेत मिळतो. धूसर प्रकाशात झळकणारा सूर्य, अरण्यातील निसर्गसौंदर्याचे साक्षीदार बनण्याचे आमंत्रण जणू देतो.

मारुती चितमपल्ली यांचे 'रानवाटा' हे पुस्तक म्हणजे वनभ्रमंतीचे अमूल्य संचित आहे. लेखकाने जंगल आणि निसर्गाच्या विविध पैलूंची ओळख आपल्या शब्दांनी अतिशय प्रभावीपणे करून दिली आहे. 'रानवाटा' या पुस्तकात महाराष्ट्रातील काही भागांमधील वन्यजीवनाचे बारकावे, जंगलातील सूक्ष्म अनुभव, अरण्यातील प्राणी-पक्ष्यांचे निरीक्षण यांचा समर्पक आणि ओघवता मागोवा घेतलेला आहे. अरण्यातील काही लेख जुन्या दिवाळी मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेले असले तरी, त्यांची ताजगी आणि गूढता आजही वाचकाला खिळवून ठेवते.

हे पुस्तक निसर्गातील अनुभवकथनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. लेखकाच्या अनुभवांमधून जंगलातील दुर्मिळ वन्यजीव, त्यांची अनोखी जीवनशैली, आणि त्यांचे निरीक्षण यांनी वाचकांना खिळवून ठेवले आहे. यातील वर्णन इतके प्रभावी आहे की वाचकाला स्वतः जंगलातील भटकंतीचा अनुभव घेतल्यासारखे वाटते. लेखकाच्या साध्या-सोप्या भाषेतून निसर्गाशी नाते निर्माण होत जाते. 

"जो माणूस वनात रमतो, चाफा त्याच्या मनात फुलतो," असे मार्मिक शब्द वापरून लेखकाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अरण्यातील गूढता, सौंदर्य, आणि त्याच्या जीवनशैलीला ज्या प्रकारे लेखक आपल्या लेखणीतून जगासमोर आणतात, ते निसर्गाच्या प्रेमात पडायला लावणारे आहे.

पुस्तकातील 'तणमोराचे दिवस' हा भाग वाचकाला विशेष भावतो, कारण यात एका विशिष्ट पक्षाच्या पिसांच्या रंगाचे वर्णन आणि त्या रंगांच्या शोधाची कथा अद्भुत आहे. 'धनचिडी' या पक्षाचे केलेले वर्णन त्यांच्या बारकाईने घेतलेल्या निरीक्षणावर आधारलेले आहे, ज्यामुळे लेखकाचे सखोल ज्ञान आणि निसर्गाविषयीची बांधिलकी स्पष्टपणे जाणवते.

'रानवाटा'मधील 'अरणी' ही व्यक्तिरेखा आणि तिच्या माध्यमातून उलगडलेले जंगलाचे रहस्य पुस्तकातील एक वेगळा पैलू उभे करतात. यातील जंगलातील 'घोटूल' हा विभाग विशेषतः लक्षवेधक आहे, कारण तो आपल्याला अरण्यातील राहणीमानाची झलक दाखवतो. हत्ती आणि हस्तिदंत यांवरील माहिती वाचून वाचकांना आश्चर्याचा धक्का बसतो, आणि हे पुस्तक वाचताना त्यांची कुतूहल अधिकच वाढते.

सलीम अलींसोबत पक्षीनिरीक्षणाचा अनुभव आणि प्रकाश बाबा आमटे यांच्या सहवासातील वन्यजीवनाशी संबंधित किस्से हे वाचकाला विचारमग्न आणि प्रेरणादायक वाटतात. फासेपारधी, आदिवासी, मादिया गोंड, भिल्ल यांची जीवनशैली लेखकाने त्यांच्या सहवासातून जाणून घेतली आहे आणि त्यांच्या संस्कृतीच्या बारकाव्यांचे चित्रण पुस्तकात वाचायला मिळते.

'रानवाटा'मधील सर्वच लेख निसर्गाचे अनमोल अनुभव देणारे आहेत. व्यंकटेश माडगूळकर यांच्या रेखाचित्रांनी पुस्तकाला एक वेगळीच नजाकत दिली आहे. या चित्रांतून लेखकाच्या दृष्टिकोनाचा सखोल अर्थ उलगडतो. मारुती चितमपल्ली यांच्या अनुभवकथनाची भाषा साधी असूनही भावपूर्ण आहे. त्यांनी घेतलेली निरीक्षणं आणि अनुभव यांचा प्रत्यय वाचकाला आकलनक्षम बनवतो.

संपूर्ण पुस्तकातून जंगल, वन्यजीवन, पक्षीनिरीक्षण, आणि अरण्यातील विविध जाती-प्रजातींचे अत्यंत प्रभावीपणे वर्णन केले आहे. 'रानवाटा' वाचून वाचकाला निसर्गाच्या जादुई दुनियेची ओळख होते, आणि त्यातून निर्माण होणारे गूढ त्यांना जंगलाच्या प्रेमात पाडते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या