सकाळ वृत्तसेवा
नागपूर - एखादे घर किंवा दुकान भाड्याने देण्याच्या गोष्टी आपण आजवर ऐकत होतो. आता मात्र साक्षात राजवाडे, गड आणि किल्लेदेखील भाड्याने मिळणार आहेत. विदर्भातील 69 पैकी 18 ऐतिहासिक वास्तू भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भातील अधिसूचना शासनाने जारी केली आहे.
राज्याच्या सांस्कृतिक आणि कलेची ओळख असलेल्या पुरातन वास्तूंना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गत विदर्भातील 69 पैकी 18 वास्तू पुढील पाच वर्षांसाठी खासगी व्यक्ती व संस्थांना देण्यात येतील. राज्य संरक्षित स्मारकांचे जतन, संरक्षण, सौंदर्यीकरण आणि विकासाकरिता पर्यायाने पर्यटक व भाविकांना या स्मारकांकडे आकर्षित करण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. "महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना' या रूपाने ही योजना प्रत्यक्षात येत आहे. या वास्तू भाडेतत्त्वावर देण्यात येत असली तरी मूळ मालकी शासनाचीच राहील.
तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची ही कल्पना होती. राज्याचे सांस्कृतिकमंत्री असताना त्यांनी ही योजना आखली होती. त्यानंतर पाच वर्षांनी राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातर्फे हे धाडस केले जात आहे. कोणतीही इच्छुक व्यक्ती वा संस्थेस स्मारकाच्या संगोपनासाठी निवडक स्मारके या संचालनालयाच्या अधीन राहून भाडेतत्त्वावर देण्यात येतील. याबाबत स्पष्ट निर्देश लवकरच येणार असले तरी पाच वर्षांचा हा कालावधी राहील. तथापि, या काळात कुठलीही कामे करण्यासाठी संचालनालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहील. भाडेतत्त्वधारकास या वास्तूचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करता येईल. यात पर्यटन व्यवस्था वा उद्यान तयार करून त्यावर तिकीट आकारता येईल. "ब्रॅण्ड' म्हणून या वास्तू विकसित करण्याची मुभा राहील.
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यांतील या वास्तू आहेत. यात किल्ले, मंदिर, राजवाडा, निवासस्थान आदींचा समावेश आहे. रामटेकचे गडमंदिर ते सिंदखेडराजाचा रंगमहाल आदींचा यात समावेश आहे. नगरधनचा किल्ला आणि माणिकगड किल्लाही भाडेतत्त्वावर दिला जाईल.
पुरातत्त्व विभागाला या स्थळावर कायमपणे लक्ष देणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक स्मारके दुर्लक्षित राहून त्यांची स्थिती खराब होत आहे. आपल्या भूतकाळातील वैभवाचे प्रतीक असलेल्या या स्मारकांचे जतन व पुनरुज्जीवन करून सध्याच्या व पुढच्या पिढीला संस्कृती व परंपरेची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. यासोबतच धार्मिक महत्त्व व पर्यटनातून विकास हा उद्देशही असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या विदर्भातील वास्तू
स्मारकाचे नाव ठिकाण तालुका जिल्हा
पंचशिखरी मंदिर अंबाळा तलाव रामटेक नागपूर
राम गणेश गडकरी निवासस्थान सावनेर सावनेर नागपूर
केवल नरसिंह मंदिर गडमंदिर, रामटेक रामटेक नागपूर
रुद्र नरसिंह मंदिर गडमंदिर, रामटेक रामटेक नागपूर
वराह मंदिर गडमंदिर, रामटेक रामटेक नागपूर
शिव मंदिर बाजारगाव नागपूर नागपूर
राम मंदिर बाजारगाव नागपूर नागपूर
नगरधन किल्ला नगरधन रामटेक नागपूर
लखुजी जाधव राजवाडा सिंदखेडराजा सिंदखेडराजा बुलडाणा
रंगमहाल सिंदखेडराजा सिंदखेडराजा बुलडाणा
सावकारवाडा सिंदखेडराजा सिंदखेडराजा बुलडाणा
निळंकठेश्वर मंदिर सिंदखेडराजा सिंदखेडराजा बुलडाणा
माणिकगड मंदिर माणिकगड कोरपना चंद्रपूर
विष्णू मंदिर माणिकगड कोरपना चंद्रपूर
भवानी मंदिर भटाळा वरोरा चंद्रपूर
महादेव मंदिर भटाळा वरोरा चंद्रपूर
अंबागड मंदिर अंबागड तुमसर भंडारा
काळभैरव मंदिर नागरा गोंदिया गोंदिया
पालकत्व घेणाऱ्यांची कर्तव्ये व कार्ये
: स्मारकांचे पालकत्व तात्पुरत्या स्वरूपात व करार कालावधीपुरता
: स्मारकाची स्वच्छता व देखभाल याबाबतचे संचालनालयाचे निकष बंधनकारक
: पर्यटकांसाठी वाहनतळ, प्रसाधनगृहे, संपर्क यंत्रणा सुविधा पुरवावी लागेल
: प्रकाशध्वनी कार्यक्रम व दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, पर्यटकांसाठी मार्गदर्शक आदी जबाबदारीही असेल
: स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमावा लागेल
: स्मारकाची लाईट व पाणी आदीची देयके पालकत्वास द्यावी लागेल
: पालकत्वास स्मारकाचा उद्योगाच्या जाहिरातीसाठी प्रतीकचिन्ह म्हणून वापरता येईल
: करार कालावधीत स्मारकाचे छायाचित्रण, चित्रीकरण व छायाचित्रांचा कॅलेंडर, डायऱ्या आदींमध्ये वापर करता येईल
0 टिप्पण्या