तानाजी मालुसरे


आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!

सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.

स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७०रोजी घडली.

तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.

शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,

......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .

ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत.  अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या