इ. स. १७६१ मध्ये महाराष्ट्राचे, एवढेच नव्हे; तर संपूर्ण भारताचे भवितव्य घडवणारी एक प्रलयकारी घटना घडली आणि ती म्हणजे पानिपत येथे लढले गेलेले मराठे व गिलचे (अफगाण) यांच्यातील युद्ध. या अतिभयंकर घटनेचे मराठी साहित्यात चित्र न उमटले तरच विशेष.
प्रत्यक्ष युद्ध जवळून पाहिलेल्यांनीही या युद्धाचा आढावा घेतलेला आहे. नाना फडणीसांचे आत्मवृत्त, पंडित काशिराज यांची बखर, भाऊसाहेबांची बखर व पानिपतची बखर या चार साहित्यकृती पायाभूत समजल्या पाहिजेत. नाना फडणीस हे पानिपत युद्धात सामील होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या मातु:श्री व पत्नीही तीर्थयात्रेच्या निमित्ताने होत्या. युद्ध हरल्यानंतर अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत फडणीस पुण्याला परतले खरे; परंतु आप्तांना वाचवू शकले नाहीत. वृद्ध आईला पाठीवर घेऊन परतीचा प्रवास करावा लागला. युद्धातील महत्त्वाच्या घटना व अनुभव यांचे यथार्थ वर्णन त्यांनी आत्मचरित्रात केले आहे.
काशिराज पंडित हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी; पण उत्तरेतील मोगल सरदार सुजाउदवला याच्या पदरी नोकरीस लागला व उच्चपदास पोचला. काशिराज पानिपतच्या लढाईत प्रत्यक्ष सहभागी होता. सुजा प्रत्यक्षात अब्दीलीला सामील होता व तो अब्दालीच्या बाजूने लढला; परंतु त्याचे मराठा सैन्याचा सेनापती सदाशिवरावभाऊ यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. युद्धात आपला विजय झाला तर आपण सुजाला मोगल बादशाहाची वजिरी मिळवून देऊ, असे भाऊसाहेबाने त्यास वचन दिले होते. त्यामुळे सुजाचा युद्धातील सहभाग डळमळीत होता व यात काशिराजाची शिष्टाई महत्त्वाची होती. काशिराजाने युद्धातील अनुभव बखररूपात लिहिले आहेत. मूळ लेखन फारसी भाषेत आहे; पण त्याचे भाषांतरही उपलब्ध आहे. सदाशिवरावभाऊ हत्तीवरून उतरून घोड्यावर बसला व स्वत: लढू लागल्याचे त्याने पाहिले आहे व भाऊचा मृत्यू झाला व त्याचे प्रेत ओळखले, अशी त्याची नोंद आहे; तसेच विश्वासराव लढाईत मारला गेल्यावर त्याच्या प्रेताची अवहेलना होऊ नये व त्याचा सन्मानाने अंत्यविधी व्हावा, याची त्याने दक्षता घेतली. भाऊसाहेबाची बखर ही पानिपतच्या लढाईवर आधारित आहे. कृष्णाजी शामराव व चिंतो कृष्ण वळे हे त्याचे लेखक आहेत. युद्ध संपल्यावर दोन-तीन वर्षांनी लिहिलेली आहे. लेखक प्रत्यक्ष युद्धकाळात मराठा सैन्याबरोबर होता. एका अर्थाने युद्धातून परत आलेल्या लोकांच्या साक्षींवरून ही बखर लिहिलेली आहे व त्यामुळे ती काही प्रमाणात पूर्वग्रहदूषित आहे, असे समजले जाते. पानिपतच्या शोकांतिकेला सदाशिवरावभाऊंचा हट्टी व तापट स्वभाव कारणीभूत झाला, अशी या बखरकारांची भूमिका आहे. राघोबादादाने अटकेपार मराठ्यांचा झेंडा लावला, याचा इतिहासही बखरीत आहे. नजीबखान, मल्हारराव होळकर व त्याची पत्नी गौतमबाई यांची व्यक्तिचित्रणे यात फार प्रभावीपणे रेखाटली आहेत.
पानिपतची बखर ही नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई हिच्या सांगण्यावरून रघुनाथ यादव चित्रे यांनी लिहिली. सदाशिवरावभाऊ हा या बखरीचा नायक. त्याचे शौर्य यथार्थपणे बखरीत मांडलेले आहे. मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, विश्वासराव इत्यादींची स्वभावचित्रेही प्रभावीपणे रेखाटलेली आहेत. युद्धवर्णनेही बहारदार आहेत. युद्धानंतरच्या पाच-सहा वर्षांत या बखरीचे लेखन झाले आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळी "लालन द बैरागिण' ही इंग्रजीत कादंबरी लिहिली गेली. या कादंबरीची नायिका लालन बैरागिण आहे. पानिपत लढाईत सहभागी झालेला प्रख्यात मराठा सरदार महादजी शिंदे यांची ती प्रेयसी आहे. या कथानकातील काही पात्रे वास्तव आहेत; पण लालनसारखे पात्र काल्पनिक आहे. पानिपतावरचे हे पहिलेच ललित लेखन. त्याचे जोरवेकर यांनी मराठीत भाषांतर केले आहे. याच गोष्टीचा आधार घेऊन नागेश विनायक बापट यांनी सन १८९७ मध्ये "पानिपतची मोहीम' ही साडेसहाशे पृष्ठांची कादंबरी लिहिली. महादजी शिंदे यांच्या प्रेमात पडलेली लालन त्यांच्या शोधार्थ सर्व हिंदुस्थानभर फिरते व शेवटी पानिपत येथील मराठ्यांच्या छावणीत पोचते. युद्धाच्या अंतिम टप्प्यात अब्दालीचा सरदार सुजाउदवला याला आपल्या बाजूला वळवण्याच्या नाजूक व धोकादायक योजनेची अंमलबजावणी महादजी व सदाशिवरावभाऊ लालनवर सोपवतात. लालन त्यात कितपत यशस्वी होते, हे रहस्यमय कथानक मुळातून वाचणे अधिक रोचक ठरेल. या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्तीही अनंतराव कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केली आहे; तसेच बापटांच्या कादंबरीतील लालन बैरागिण हिच्या व्यक्तिमत्त्वाने मोहित होऊन शिरीष पै यांनी छोटेखानी कादंबरी लिहिली आहे. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांची सुंदर प्रस्तावनाही आहे.
बापटांनी "पानिपतची मोहीम' या पुस्तकात मराठ्यांचे युद्धातील शौर्य प्रभावीपणे मांडले आहे; परंतु भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांना पानिपत युद्ध ही मोठी शोकांतिका वाटते. त्या भूमिकेतून त्यांनी "दुर्दैवी रंगू' ही कादंबरी लिहिली. रंगू या विधवेचे विश्वासरावावर प्रेम बसते; परंतु ते यशस्वी होत नाही, असे या कादंबरीचे कथानक आहे. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी पानिपत युद्धानंतर घडलेल्या "तोतया'च्या बंडावर आधारित नाटक लिहिले आहे.
सन १९८८ मध्ये विश्वास पाटील यांची "पानिपत' ही कादंबरी प्रसिद्ध झाली. हट्टी व अहंकारी सेनापती अशी बखरकारांनी रंगवलेली सदाशिवरावभाऊची प्रतिमा विश्वास पाटलांना अन्यायकारक वाटली आणि त्याला न्याय देण्यासाठी हेतूने त्यांनी ही कादंबरी लिहिली. जिवंत व्यक्तिचित्रण, उत्कृष्ट संवाद, ओघवती भाषा ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत. मराठी सारस्वताने "पानिपत' या घटनेस योग्य न्याय दिला हे खरे.
0 टिप्पण्या