पुरूषांनो, एव्हढं करून दाखवा !

एव्हढं करून दाखवा,
पुरुषांनो, एव्हढं करून दाखवा
दरवर्षी शब्दांची तीच फोलपटं सांडवण्यापेक्षा
आमच्यासाठी....एव्हढं करून दाखवा
एका तरी पुरूषाने... .सती जाऊन दाखवा
आवडत्या(?) बायकोसाठी
बघायचंय आम्हाला
खाली जाळ लागताच.... बुडाला
कसे येताय केकाटत; टुण्णदिशी उडी मारून
सरणावरून, पेटलेले बुड घेऊन
हात जोडत; ही रूढी बदलण्यासाठी
एक करून दाखवा
आपल्या लाडक्या(?) लेकीला
स्वतः जन्म देऊन दाखवा... एकदातरी पुरुषाने
बघायचंय आम्हाला
कसे बोंबलत ठणाणा; मरणप्राय कळांनी
सहन करताय ते....की उलट
हात जोडत रडताय...नशीबाजवळ
हा निसर्गनियम बदलण्यासाठी
एक करून दाखवा
ईतिहासात जाऊन... थोबाडीत मारून दाखवा
युधिष्ठीराच्या आणि... समस्त पुरूषी बिनडोकांच्या
पत्नीपेक्षा धर्म श्रेष्ठ; हे ढोंग उगाळल्याबद्दल
करून दाखवा शीर धडावेगळे; दु:शासनाचे
त्याचवेळी.... वस्त्रे पुरवण्यापेक्षा
बघायचीय; तुमची मर्दुमकी(?) आणि प्रेम
एक करून दाखवा
झोपला असाल किंवा नसाल.... कोणा दुसरीसोबत
तरी..... वनात जाऊन दाखवा; काही वर्षं तरी
किंवा अग्नीपरिक्षा..
धोब्याने सर्टीफिकेट दिले तरी; आमच्यासाठी
बघायचंय आम्हाला....तुमचा त्याग, समर्पण
तडफड; आमच्यासाठी
आणि, नसाल करू शकत हे
ढोंग्यांनो; तर बंद करा हे नाटक
भाट बनून, एका दिवसापुरते..... थोतांड!
दिनाबिनाचे..... नाही गरज आम्हाला
या गायपोळ्याची..... आमच्या जन्मजन्मांच्या जखमांवर
शब्दांची झूल पांघरण्याची
माहित आहे आम्हाला; आमचे मोठेपण, महती
आम्ही आहोत; समर्थ आता....जगण्यास, जगवण्यास
आणि एक करून दाखवा
हे शेवटचे;
टाका हा ईतिहास गाडून; टाका त्या पोथ्या जाळून
करा तर्पण मूर्ख रूढ्यांचे, जाळा मढे अक्कलशून्य परंपरांचे
आणि द्या साथ; आम्हाला एक मित्र म्हणून
जगण्याच्या समान हक्कासाठी
निदान एव्हढे तरी
कराल ना....
आमच्यासाठी?
कवी- उमेश कोठीकर .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या