सध्या विविध कामांसाठी आपल्याला पदवी अभ्यासक्रमाची मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र आवश्यक असते. कधी नोकरीसाठी तरी कधी अन्य कामांसाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. पण अनेक वेळा जुनी मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र गहाळ झालेली असते. अशावेळी ही गहाळ मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र नेमके कसे मिळू शकते, हा प्रश्न आपल्याला नेहमी सतावतो. नवीन मार्कशीट कशी मिळवायची किंवा पदवी प्रमाणपत्र कसे काढायचे, त्याबद्दल जाणून घेऊ या हेल्पलाइनद्वारे...
कशी मिळेल मार्कशीट...
मुळात एखाद्या विद्यार्थ्याची मार्कशीट हरविली अथवा गहाळ झाली असेल, तर त्यासाठी प्रथम त्या विद्यार्थ्याला नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. त्यानंतर हरविलेली मार्कशीट नेमकी कशी हरविली किंवा नेमके काय झाले, यासंदर्भात विद्यार्थ्यांना ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करणे गरजेचे आहे. त्यानंतर हे दोन्ही कागदपत्रे घेऊन संबंधितांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा. याठिकाणी यासंदर्भात एक फॉर्म उपलब्ध असून, त्या फार्मसोबत एफआयआर आणि प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे सादर करावी. हा अर्ज सादर केल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना मार्कशीटची दुसरी प्रत उपलब्ध होते. ही दुसरी मार्कशीट देताना त्या विद्यार्थ्यांच्या निकालाची सर्व माहिती विद्यापीठाकडून पुन्हा एकदा तपासून मगच ती दिली जाते.
येणारा खर्च....
मुळात नवी मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्र
मिळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ काही फी आकारते. संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र जितके जुने असेल, तितकी फी आकारली जाते. यासाठी कोणतेही ठराविक शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून, संबंधितांची मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र किती जुने आहे, यावर ते ठरविण्यात येते. कसे मिळेल नवे पदवी प्रमाणपत्र एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची मार्कशीट आणि पदवी प्रमाणतपत्र वेळेनुसार विद्यापीठाकडून कॉलेजात पाठविण्यात येते. मात्र अनेक वेळा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रारही पुढे येते. या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात संपर्क साधल्यास त्यांना नवे पदवी प्रमाणत्र मिळू शकते. त्यासाठी एक विशेष अर्ज विद्यापीठाकडून भरून घेतला जातो. या अर्जासाठी विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
कसे मिळेल पदवी प्रमाणपत्र...
मुळात हरविलेली किंवा गहाळ झालेली मार्कशीट किंवा पदवी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत जवळपास एकसमानच आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील एफआयआरची प्रत आणि प्रतिज्ञापत्रासह नव्या पदवी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज भरावा लागतो. साधारणपणे २५ दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाते. पदवी प्रमाणपत्रांचे हे प्रमाणपत्र जेवढे जुने असेल तेवढे ते मिळण्यास उशीर लागतो. मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग विद्यार्थ्यांची सोय आणि वाढते कम्प्युटरायझेशन लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने नॅशनल अकॅडमिक डिपोझटरी योजना म्हणजे, मार्कशीट आणि पदवी प्रमाणपत्रांचे डिमॅटिंग सुरू करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आता गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र सुरक्षितरित्या ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. सीडीएसएलच्या माध्यमातून शैक्षणिक कागदपत्रांचे जतन केले जात आहे. कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट लिंक उपलब्ध होणार असून लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. लॉगइन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना ती कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहे. विशेष म्हणजे गुणपत्रिकांवर डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. जेणेकरून पडताळणी करणे सोपे जाईल.
कशी असणार डिमॅट पद्धत...
या माध्यमातून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
झाल्यावर नॅशनल अकॅडमिक डिपोझिटरीमध्ये माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर हा सर्व डेटा डिजिटल स्वाक्षरीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि त्याची एक लिंक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार असून, मार्कशीटवर परीक्षा नियंत्रकाची डिजिटल स्वाक्षरी असेल. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित संस्थेतर्फे ईमेल पाठवला जाईल.
Thank u- सौरभ शर्मा हेल्पलाइन
0 टिप्पण्या