किमान खर्चांमध्ये कमाल संरक्षण !

Posted by Abhishek Thamke on ६:०० म.पू. with No comments
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने गेल्या काही दिवसात अनेकविध योजना सादर केल्या आहेत. या योजनांमध्ये दोन विमाविषयक योजनांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातील लोकांना या योजना आपल्याशा वाटत नसतीलही; मात्र अल्प उत्पन्न गटातील लोकांचे भविष्य साकारण्यासाठी या योजना वरदान ठरतील, यात शंकाच नाही.

अटल पेन्शन योजना

लाभ काय : प्रति महिना ₨ १,००० ते ५,००० पेन्शन

किती खर्च : चाळीस वर्षाच्या प्रौढ व्यक्तीला प्रति महिना १,००० रुपयांच्या पेन्शनसाठी वीस वर्षे दरमहा २९१ रुपये गुंतवावे लागतील. मात्र, अठरा वर्षाच्या व्यक्तीला चाळीस वर्षांसाठी दरमहा ४२ रुपये गुंतवावे लागतील. 

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानची व्यक्ती, वय वर्षे साठपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना प्रामुख्याने तुमच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. ठरा​विक वर्षांनी काम सोडल्यानंतर अशा व्यक्तींकडे पाहणारे दुसरे कोणी नसते.


पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

लाभ काय : अपघाती विमा आणि दोन लाखांपर्यंत अपंगत्व विमा.

किती खर्च : वार्षिक १२ रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : ही योजना असणाऱ्या कोणत्याही बँकेत बचत खाते असणारी व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : ही योजना सर्वांसाठी उपयुक्त आहे. विशेष करून ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, वृत्तपत्रविक्रेते, फळ-भाजीपाला विक्रेते. शिवाय ज्या व्यक्ती जिवावर उदार होऊन कामे करतात, त्यांच्यासाठी ही योजना अतिउपयुक्त.


पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

लाभ काय : पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर वारसदाराला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण.

किती खर्च : वार्षिक ३३० रुपयांचा प्रिमियम

अर्हता काय : वय वर्षे १८ ते ७० दरम्यानची कुणीही व्यक्ती; जिचे बँकेमध्ये बचत खाते आहे.

कोणासाठी उपयुक्त : तुमच्याकडे कार्यरत कुणीही नोकरदार.. ज्याच्या कुटुंबातील एकमेव कमविणारी व्यक्ती ती स्वतः आहे. तिच्यावर अथवा त्याच्यावर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे.


पंतप्रधान जनधन योजना

लाभ काय : झीरो बॅलन्सचे बचत खाते मिळते, खातेधारकाला 'रुपे डेबिट कार्ड' मिळते, शिवाय एक लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा आणि तीस हजार रुपयांपर्यंतचा जीवनविमा.

किती खर्च : शून्य

अर्हता काय : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुणीही. भविष्यातील सर्व कल्याणकारी आणि अनुदानाशी संबंधित योजनांसाठी अत्यंत उपयुक्त योजना असल्याने तुमच्या नोकरदारांना अवश्य लाभ करून द्यावा.

कोणासाठी उपयुक्त : असंघटित क्षेत्रात कार्यरत प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त. तुम्ही तुमच्या नोकरदारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करू शकता. त्यांना बँकेच्या व्यवहारांची माहिती देण्यासाठी उपयुक्त.


आरोग्यविमा योजना

लाभ काय : आजारी पडल्यामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे होणारे हॉस्पिटलायझेशनचे सर्व खर्च भरून निघतात.

किती खर्च : वय वर्षे १८ ते ४० दरम्यानच्या व्यक्तीसाठी ५०,००० रुपयांपर्यंतच्या संरक्षणासाठी वार्षिक ७०० ते ८०० रुपयांचा प्रिमियम.

अर्हता काय : सर्वचजण पात्र.

कोणासाठी उपयुक्त : आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्यांना वैद्यकीय खर्च परवडत नाहीत. आयुष्यभराची पूंजी हॉस्पिटलवर खर्च करण्याची वेळ आलेल्यांसाठी योजना उपयुक्त.


सुकन्या समृद्धी योजना

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ९.२ टक्के दराने परतावा.

किती खर्च : किमान वार्षिक गुंतवणूक ₨ १,०००, कमाल वार्षिक गुंतवणूक ₨ १,५०,०००

अर्हता काय : दहा वर्षांखालील मुली

कोणासाठी उपयुक्त : घरकाम करणाऱ्या बहुतांश घरकामगार मुलींना शिकवण्याऐवजी संसाराला हातभार म्हणून कामाला जुंपतात. मुलीच्या नावे पैसे गुंतवल्यास तिचे शिक्षण आणि लग्न यासाठी काही रक्कम टप्प्याटप्याने दिली जाते.


किसान विकास पत्र

लाभ काय : केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ८.७ टक्के दराने व्याज आणि शंभर महिन्यांमध्ये ठेव रक्कम दापदुप्पट मिळण्याची खात्री.

किती खर्च : किमान एक हजार रुपयांची ठेव ठेवावी लागते. कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : कुणीही.

कोणासाठी उपयुक्त : सर्व वयोगटातील घरकामगार, वृत्तपत्रविक्रेते, मध्यम उत्पन्न गटातील कुणीही, अल्पकालीन गुंतवणुकीची इच्छा असणाऱ्यांसाठी.


टपाल खाते, बँकांच्या मुदत ठेवी

लाभ काय : एक ते चार वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर वार्षिक ८.४ टक्के दराने व्याज, पाच वर्षांच्या मुदतठेवींवर साडेआठ टक्के दराने व्याज, वयोवृद्ध घरकामगाराच्या अथवा ज्येष्ठ नागरिकांच्या नावे पैसे गुंतवल्यास वार्षिक ९ ते ९.२५ टक्के दराने व्याज मिळण्याची हमी.

किती खर्च : टपाल खात्यामध्ये गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा ₨ २००, ​कमाल मर्यादा नाही.

अर्हता काय : आधार कार्ड किंवा बँक खाते असणारी कुणीही व्यक्ती.

कोणासाठी उपयुक्त : घरकामगारांच्या अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त योजना. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी घरांचे डाउन पेमेंट करण्यासाठी, कोचिंग क्लासेसची फी भरण्यासाठी उपयुक्त रक्कम जमविण्यासाठी.


सर्वच योजनांचा एकत्रित वार्षिक हप्ता... (तुमच्याकडे कार्यरत घरकामगार महिला अथवा पुरुषाचे वय ४० वर्षे असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. ती व्यक्ती मासिक १,००० रुपयांच्या पेन्शन योजनेत सहभागी झाल्याचे गृहित धरण्यात आले आहे.)

पंतप्रधान जनधन योजना ० + पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ₨ ३३० + पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ₨ १२ + अटल पेन्शन योजना ₨ ३,४९२ + आरोग्य विमा ₨ ८०० + सुकन्या समृद्धी योजना ₨ १,००० + किसान विकास पत्र ₨ १,००० + टपाल खाते, बँक ठेवी ₨ २०० = ₨ ६,८३४.
Reactions: