२०१४ चे उदारमतवादी भारतरत्न

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना गुणवत्ता, कर्तृत्व आणि राजकीय सोय यांची सांगड घालण्याची पूर्वापार परंपरा पाळत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदुत्ववादी शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय मदनमोहन मालवीय यांना हा सन्मान जाहीर केला आहे. हिंदुत्वाचा मवाळ सर्वसमावेशक चेहरा आणि 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' असे म्हणणारा आग्रही विचार, अशा दोन्ही प्रवाहांना एकाचवेळी खूष ठेवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित करून केंद्र सरकारने दीर्घकाळच्या जनभावनांचा आदर केला आहे. भारतीय राजकारणाचा इतिहास ज्यांच्या समावेशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे वाजपेयी यांचे नेतृत्व आहे. हिंदुत्ववादी संगोपन असूनही उदारमतवादाचा वारसा त्यांनी जपला. त्यांचे कार्य फक्त जनसंघ वा भारतीय जनता पक्ष यांच्यापुरते कधीच सीमित नव्हते. वाजपेयी नेहमीच पक्ष आणि विचारसरणीच्या भेदांपलीकडे वाटचाल करीत राहिले. आघाडीचे सरकार आणि एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या किंवा समांतर विचारांच्या घटकांना एकत्र बांधून ठेवणारे सरकार पहिल्यांदा यशस्वीपणे चालवले ते वाजपेयींनी. ते हिंदुत्ववादी आहेत, यात कधीच शंका नव्हती; मात्र त्याचा हिंस्र आविष्कार कधीच त्याच्या वागण्या-बोलण्यात आला नाही. देशाचे वैविध्य समजून समन्वय साधणारे त्यांचे राजकारण भाजपला देशभर पोचवण्यात मोलाचे ठरले. वाजपेयी संसदेत काँग्रेसच्या सरकारचे वाभाडे काढताना सत्ताधारीही ऐकत राहात. अपवादात्मक असा संसदपटू वाजपेयींच्या रूपाने संसदेने पाहिला आहे. तेच वाजपेयी नेहरूंच्या निधनानंतर ‘सूर्यास्त तर झाला; आता ताऱ्यांच्या प्रकाशात वाट शोधूया असे सहजपणे बोलून गेले. पाकिस्तानला नमवणारे युद्ध जिंकणाऱ्या इंदिरा गांधींचे वर्णन दुर्गा असे करताना त्यांना पक्षाभिनिवेश शिवला नाही. नेहरूंनीच ज्यांच्यात भविष्यातला पंतप्रधान पाहिला ते वाजपेयी भाजप सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान बनणे स्वाभाविक होतं. त्यांनी कारगिलमधल्या पाकिस्तानी विश्वासघाताला तोंड दिले; तसेच अणुचाचण्या करून भारतीय उपखंडातील संरक्षण सिद्धतेची समीकरणे कायमची बदलूनही टाकली. महामार्गाचा देशव्यापी सुवर्ण चतुष्कोन साकारणारा महाप्रकल्पही त्यांच्या कारकिर्दीतलाच.

वाजपेयींनीही प्रारंभी पत्रकारिता केली, कविता केल्या आणि लखनौतील मुशायऱ्यांनाही हजेरी लावली. त्यांचे असे बहुपैलू कर्तृत्व आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुढाकाराने जनता पक्षात संघ विलीन झाला आणि पुढे सत्ता आल्यावरही जनता पक्षात झालेल्या फाटाफुटीनंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना संघपरिवाराने केली, तेव्हा अध्यक्षपदावरून बोलताना वाजपेयींनी ‘गांधीवादी समाजवादाचा नारा दिला होता! पण हे नाणे राजकारणात चालले नाही आणि संघपरिवाराने लालकृष्ण अडवानी यांना पुढे करून अयोध्येत ‘बाबरीकांड घडवून आणले, तेव्हा वाजपेयी त्या घडामोडींपासून काहीसे दूरच होते. समन्वयवादी मध्यममार्ग हे वाजपेयीच्या राजधर्माचे सूत्र राहिले. पाकिस्तानशी निर्णायक समझोता करण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले, तरी इतिहासाला दखल घ्यायला लावणारे आहेत. गुजरातच्या दंगलीने विषण्ण झालेल्या वाजपेयींनी जाहीरपणे गुजरात सरकारला राजधर्माची आठवण करून दिली. वाजपेयींचे हेच मोठेपण आहे. एकेकाळी अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर अवघा देश गाजवणाऱ्या वाजपेयींना आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या वाणीनेच दगा द्यावा, यापरते दुर्दैव दुसरे नाही. राजकारणाच्या धबडग्यात राहूनही आपल्या कवी कलंदर वृत्तीसह संपन्न आयुष्य जगलेले वाजपेयी नव्वदीत पदार्पण करताना ‘भारतरत्नने सन्मानित झाले आहेत.


वाजपेयींबरोबरच हा सन्मान स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी आणि शिक्षणतज्ज्ञ पंडित मदनमोहन मालवीय यांनाही मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. पंडितजींच्या कार्याचे मोलही अनमोल आहे. त्यांनी स्थापन केलेल्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे जगजीवन राम यांच्यापासून सेतू माधवराव पगडी यांच्यापर्यंत देशभरातील अनेक अग्रणी स्नातक होते आणि ते विद्यापीठ हेच मालवीयजींचे कायमस्वरूपी स्मारक आहे. त्यांच्या पुरस्काराच्या निमित्ताने मरणोत्तर असा पुरस्कार द्यावा का, हा विषय काहींनी नव्याने चर्चेत आणला आहे. पुरस्काराचे निकष कसे ठरवावेत, यावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते; मात्र मालवीय यांच्या कामगिरीविषयी दुमत असायचे कारण नाही. मालवीय आणि वाजपेयी यांच्या कारकिर्दीत काळाच्या दृष्टीने मोठे अंतर असले, तरी त्यांची वैचारिक बैठक एकाच मुशीतून तयार झालेली होती. मालवीय यांनी आपले समाजकारण आणि राजकारण हे काँग्रेसच्या दुसऱ्याच म्हणजे १८८६ मध्ये झालेल्या अधिवेशनास उपस्थित राहून सुरू केले आणि वाजपेयींची उभी हयात काँग्रेसविरोधातील राजकारण करण्यात गेली असली, तरी दोघांची मानसिक जडणघडण एकाच म्हणजे आर्य समाजाच्या वैचारिक परंपरेतून तयार झाली. मालवीय यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात काँग्रेसमधून बाहेर पडून आपले जीवन शैक्षणिक कार्याला अर्पण केले. वाजपेयींप्रमाणेच त्यांनीही सुरवातीला काही काळ पत्रकारिता केली होती. सायमन कमिशनविरोधातील निदर्शनात ते सहभागी होते. निधनानंतर सहा दशकांनीही स्मरणात राहिलेले त्यांचे काम म्हणजे त्यांनी स्थापन केलेली बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हेच होय. या दोघांच्या सन्मानामुळे ‘काल के कपोल पर लिखता मिटाता हूँ... गीत नया गाता हूँ...’ हे वाजपेयींचे शब्द सहजपणे आठवतात.

लोकमान्य - एक युगपुरुष

आवर्जून पहा आणि अभिमान बाळगा. http://youtu.be/UX9UM5cexg4

सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित सिनेमाचा ट्रेलर...
लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, ‘केसरी आणि मराठा’ सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.

’पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.

केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्‍फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. ’मराठा’सारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून  पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा ’गूळ का साखर’ हा लेख, ‘राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण’ अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.

लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य ‘संघटनात्मक’ कामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.

यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू

कल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू  आपल्या वाट्याला आला तर?

१) "मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?"
Ans:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !"
(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)

२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.. "एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..?"
Ans:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)
ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला ! (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा? कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)

३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू?
Ans:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..)
तो उमेदवार म्हणाला - टी ! (?)
(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )

४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली?
या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.
Ans :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)
उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )

५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात
उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?
Ans:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.? आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..
‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)

६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.?
‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.
उमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.
"असं का.. हीच जागा का. ?"
Ans:- उमेदवाराने उत्तर दिले- "सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.?
त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.
तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.!

नक्की शेयर करा आणि आपल्या मित्रांनाही वाचू दया.
गजानन काळे

''हॅपी जर्नी " (अ फिल्म बाय सचिन कुंडलकर) ''थोड़ी खट्टी… थोडी मिठी… ''

भावाबहिणीच्या नात्यावर मराठीत आजवर असंख्य चित्रपट निघाले असतील. पण ते सर्व चित्रपट हे घराच्या चार भिंतीमध्ये हुंदके देत बंदिस्त होते. सचिन कुंडलकरचा ''हॅपी जर्नी " मात्र याला अपवाद ठरतो. भावाबहिणीच्या हळव्या, मोकळया ढाकळ्या मैत्रीपूर्ण नात्यावर आधारित असलेला सदर चित्रपट आजच्या काळाची गरज ओळखून घराच्या चार भिंतीं भेदत थेट 'चार चाकीच्या' (छोटी मोटारगाडी) आश्रयाला गेला आहे. तो आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ पाहतोय. ''हॅपी जर्नी " चे सादरीकरणातील हे 'वेगळेपण' नक्कीच दखलपात्र असंच आहे नि त्यासाठी सचिन कुंडलकरला धन्यवाद दयायला हवेत.

सदर सिनेमा हा भावाबहिणीच्या नात्यावर असला तरी त्याची भाषा, भावाबहिणीतील हळवं, निखळ मैत्रीपूर्ण नातं आजच्या तरुणाईच्या भावेल असंच आहे. त्यातंच ताईच्या (जानकी) भूमिकेत असलेली गोड,बिनधास्त, थोडीशी बोल्ड प्रिया बापट तर आजच्या तरुणाईची फेवरेटच आहे. त्यातच तिच्या मोठा दादाच्या (निरंजन) भूमिकेत असलेल्या अतुल कुलकर्णीची तिच्याशी जुळलेली केमिस्ट्री यामुळे ''हॅपी जर्नी "अर्थातच प्रेक्षकांना भावतो. पण ''हॅपी जर्नी" पाहून प्रेक्षक पार भारावून वैगेरे अजिबात जात नाहीत. कथानकाची सरळसोट मांडणी, सुरुवातीलाच सिनेमा एकदा घराच्या चार भिंती भेदून बाहेर पडल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा त्याचे घरात घुटमळणे, भावाबहिणीचे नाते फुलू देण्याअगोदरच पुढील व्यक्तिरेखेची (जानकीचा प्रियकर अजिंक्य~ सिध्दार्थ मेनन) कथानकात होणारी (खरं तर अडसर वाटणारी) एन्ट्री, सहकलाकार पल्लवी सुभाषचा अतिशय सुमार दर्जाचा (खरं तर प्राथमिक स्तरावरचा अभिनय), दिग्दर्शकाचा तिची नि निरंजनमधील प्रेमकहाणी फुलवण्याचा तोकडा प्रयत्न, त्या प्रयत्नामुळे जानकी नि निरंजन या भावाबहिणीतील फुलू पाहणाऱ्या नात्याला खोडा बसणं… या सर्व कारणांमुळे ''हॅपी जर्नी" चा प्रवास सुखकर न होता अधेमधे बऱ्याचदा रेंगाळतो, भटकतो नि कंटाळवाणा सुद्धा होतो.

''हॅपी जर्नी " चा ट्रेलर दाखवताना जी गोष्ट दिग्दर्शकाने लपवली होती, तिचा 'पर्दाफाश' मात्र तो चित्रपटाच्या सुरुवातीलाच करून मोकळा होतो! 
कथा सांगताना दिग्दर्शकाने दाखवलेल्या या 'निष्काळजीपणामुळे' आपला चांगलाच भ्रमनिराश होतो नि मग आपल्याला ''हॅपी जर्नी" च्या पुढील प्रवासाविषयी काळजी वाटू लागते. त्यातच परवा मी जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक Mohsen Makhmalbaf यांचा 'GABBEH' हा सुंदर चित्रपट पाहिला असल्याने त्यातील अगदी साधे सरळ असलेलं कथानक उलगडताना दाखवलेल्या चातुर्यामुळे तो चित्रपट शेवटपर्यंत आपलं कुतूहल कायम ठेवत आपली उत्सुकता ताणतो. खरं तर ते 'कुतूहलच' त्या सामान्य कथेला सौंदर्य प्राप्त करून जातं. इथे मात्र दिग्दर्शकाने सुरुवातीलाच रहस्यभेद केला असल्याने ते कुतूहल नाहीसं होतं. बरं यापुढे आपली नि जानकीची सुद्धा अशीच इच्छा असते कि निरंजनने पुढील काही दिवस घरापासून दूर राहत फक्तं निसर्गाच्या सानिध्यात तिच्यासोबत वेळ घालवाण्यासाठी ''हॅपी जर्नी" ला सुरुवात करावी. त्यासाठीच तर त्यांच्या दिमतीला जानकीची आवडती मोटारगाडी होती ना ?
पण इथे सुद्धा सदर चित्रपटलेखक/दिग्दर्शक सचिन कुंडलकर निरंजनला त्याच्या घरीच घुटमळत ठेवतो. मग त्या गाडीचे नक्की प्रयोजन काय ???

फक्तं दिवसा जानकीसोबत गावात चक्कर मारणे नि रात्री शहाण्या बालकाप्रमाणे घरी परतणाऱ्यामुळे, घरी आई वडिलांसोबतच्या प्रसंगामुळे त्या दोघा भावाबहिणीत फुलू पाहणाऱ्या नात्यात वारंवार अडथळा येत राहतो. हे कमी कि काय म्हणून कथेत लगेच जानकीचा प्रियकर अजिंक्यला घुसडण्याची लेखक/ दिग्दर्शक घाई करतो. त्यामुळे त्या दोघा बहिणभावातील नाते फुलण्यास अवधीच मिळत नाही. त्यासाठी अजिंक्यला मध्यंतरानंतर कथेत आणायला हवे होते.

त्यातच मग उत्तरार्धानंतर निरंजन नि त्याच्या मैत्रिणीमधील (पल्लवी सुभाष) प्रेमकहाणीसाठी दिग्दर्शकाने बराच वेळ वाया घालवला आहे. त्यामुळे जानकी नि निरंजनमधील भावाबहिणीचे नाते काही काळ दुर्लक्षित होते. गंमत म्हणजे आपल्या बहिणीच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणारा निरंजन आपल्या प्रेमिकेला पळवून नेण्यासाठी मात्र जानकीच्या आवडत्या मोटरगाडीचा वापर करतो! अर्थात त्यांच्यासोबत जानकीही असतेच. नव्हे तीच त्याला त्यासाठी प्रेरित करते. त्यामुळे उतरार्धानंतर खऱ्या अर्थाने ''हॅपी जर्नी " ला सुरुवात होते असे म्हणणे योग्य ठरेल!

कथानकातील कमकुवतपणा प्रिया बापट नि अतुल कुलकर्णी यांच्या सुंदर अभिनयामुळे थोडाफार झाकला जातो. प्रिया बापटच्या प्रगल्भ अभिनयाची झलक याअगोदरच 'काकस्पर्श' मधे आपल्याला दिसली होती. पण माझ्या मते त्याची मराठी फिल्म इंडस्ट्रीने म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. अतुल कुलकर्णीचा नेहमीप्रमाणेच सयंत, समंजस अभिनय. पल्लवी सुभाषने मात्र मॉडेल्सचा अभिनयाशी तिळमात्र संबंध नसतो (काही अपवाद असतीलही) याची आपल्या सुमार अभिनयाने खात्री पटवून दिली. सुहिता थत्ते नि माधव अभ्यंकर यांनी आपआपली कामे ठिक केली असली तरी मुळातच त्यांना चित्रपटात जास्त वाव नाहीये. मराठी प्रायोगिक रंगभूमी गाजवत असलेला 'सिध्दार्थ मेनन' हा युवा अभिनेता वयाने नि शरीराने खूप लहान वाटतो. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे कौतुक वैगेरे वाटण्याऐवजी कधी कधी तो चेष्टेचा विषय बनतो. ('एकुलती एक' मधे याचा अनुभव आला होता)

''अन्न, वस्त्र,निवारा नि वायफाय मला लागतंच '' हे असे आजच्या तरुणाईला साजेसे ,तजेलेदार संवाद प्रिया बापटच्या तोंडी अगदी शोभून दिसतात. नव्हे ती या अशा संवादाद्वारे आजच्या या तरुणाईचे एक प्रकारे प्रतिनिधित्वच करते! 
बाकी चित्रपटाचे संगीत ठिक असले तरी लक्षात राहणारे वा ठेका धरायला लावणारे अजिबात नाही.

असो. ''हॅपी जर्नी " ची एक गंमत आहे. चित्रपट बऱ्याच वेळेला दिग्दर्शकाच्या हातून सुटतो पण प्रेक्षक मात्र शेवटपर्यंत त्याच्याशी 'कनेक्ट' राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो !
नि याचे क्रेडीट मी अर्थातच प्रिया बापटला देईल. So, प्रिया बापटसाठी ''हॅपी जर्नी " एकदा अनुभवायला हरकत नाही.

~ कल्याण 
(नोव्हेंबर २९, २०१४)