कोका कोला शीतपेयांमध्ये वापरणार फळांचा रस

कोका कोला आणि पेप्सीनं शीतपेयांमध्ये फळांचा रस वापरावा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना 'फळाला' येण्याची चिन्हं आहेत. कारण, फ्रुट ज्युसचा वापर करून सॉफ्ट ड्रिंक बनवण्याचं काम कोक कंपनीनं सुरू केलंय आणि उन्हाळा सुरू होण्याआधी ती बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे फळ उत्पादकांचं भाग्य चांगलंच 'फळ'फळणार आहे.


दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकात इंडिया फुड पार्कचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. तेव्हा, देशातील फळ उत्पादकांना बाजारपेठ मिळावी यादृष्टीनं त्यांनी कोका कोला, पेप्सीसारख्या कंपन्यांना साद घातली होती. आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शीतपेयं विकली जातात. पेप्सी, कोक या कंपन्या देशात अब्जावधी रुपयांची उलाढाल करतात. या कंपन्यांनी आपल्या शीतपेयांमध्ये फक्त पाच टक्के फळांचा रस मिसळल्यास इथल्या शेतकऱ्यांना फळं विकायला अन्य कुठेच जायची गरज भासणार नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधलं होतं. अमेरिका दौऱ्यावेळी पेप्सी, कोकच्या अधिकाऱ्यांपुढे हा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. त्यावर 'कोक'नं सकारात्मक पावलं उचलल्याचं कंपनीतील सूत्रांकडून कळतं.
इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोक फ्रुट ज्युस मिश्रित शीतपेय बाजारात आणणार आहे. साधारणतः एप्रिलमध्ये, उकाडा सुरू होण्याआधी हे पेय लाँच केलं जाईल. त्यावर भारतातच काम सुरू आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन, चाचण्या केल्या जाताहेत. आता हा पूर्णपणे वेगळं, नवंकोरं शीतपेय असेल असेल की मिनिट मेड ज्युससारखं काही असेल, हे अजून निश्चित झालेलं नाही. परंतु, फळ उत्पादकांना त्यापासून मोठा फायदा होईल, हे नक्की.

स्वत:चं काहीतरी सुरू करावंसं वाटतं?

आजपासून 'वैश्विक उद्योजकता सप्ताह' साजरा केला जातो. या निमित्ताने उद्योजकतेचा करिअर म्हणून विचार करणे औचित्यपूर्ण ठरेल. या क्षेत्राकडे वळण्याची सुरुवात होते ती तुमच्या दृढ मानसिकतेपासून!

आज व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय.. अभियांत्रिकी, वाणिज्य शाखेची, कला शाखेची पदवी घेतल्यानंतर व्यवस्थापनाचा एखादा खणखणीत अभ्यासक्रम करायचा आणि मग लठ्ठ पगाराची नोकरी करताना एकीकडून दुसरीकडे उडय़ा मारत राहायच्या.. असं करणारे आपल्याला बरेच भेटतात. यातील कितीजण बुद्धिमत्ता असून, संभाव्य बलस्थानं असून स्वत:चा उद्योग उभा करायला मात्र धजावत नाहीत. त्याकरता ते पुरते बिचकतात. यात नवं असं काही नाही.. याची प्रमुख कारणं म्हणजे पैसा, वेळ वाया जाण्याची भीती, उमेद गमावण्याचा संभव आणि सारं काही पटकन मिळवून स्थिरस्थावर होणं अशी बनलेली आपली प्राथमिकता!

या साऱ्या गोष्टी.. आणि जोखीम स्वीकारण्यातला नन्नाचा पाढा आपल्याला नवीन काहीतरी सुरू करण्यापासून रोखतो. त्यासोबतच आपल्याला उद्योजकतेपासून दूर नेत असतं ते आपल्या भोवतालचं वातावरण! मात्र जर कुणाला या साऱ्या परिस्थितीवर मात करत उद्योजक म्हणून हव्या त्या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर मात्र त्या क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या सेवा, उत्पादनांपेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं आणि अधिक द्यायला हवं.

उद्योजक म्हणून एखाद्या क्षेत्रात आपलं बस्तान बसवणं खूप कठीण आहे, हे मान्य. पहिल्या पिढीच्या प्रतिनिधीला तर त्यातील खाचखळगे प्रत्येक टप्प्यावर नव्याने समजत असतात. म्हणूनच एखादं क्षेत्र जेव्हा तुम्ही उद्योगासाठी निश्चित करता, तेव्हा त्या क्षेत्रात तुमचा वावर असणं, त्यातील गरजा, आव्हानं, तत्त्वं माहीत असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर त्या विशिष्ट क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींशी आयडिया शेअर करणं आवश्यक असतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शोध आणि इनोव्हेशन (प्रयोगशीलता) यातील फरक कळायला हवा. इनोव्हेशन म्हणजे तुमची नवनिर्मिती बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं. त्यात लॉजिस्टिक, मार्केटिंगचा विचार केलेला असतो. त्यासाठी यात सांघिक कामगिरी बजावणं आवश्यक असतं. इनोव्हेटिव्ह बिझनेसमध्ये 'व्हॉटस्अॅप'चा समावेश करता येईल. 'व्हॉटस्अॅप'चा जनक असलेल्या जॅन कोयुमचे एक छान वाक्य आहे- 'कठीण परिस्थितीला संधीत बदलता येते.' सरकार फोन टॅप करतं, हे लक्षात आल्याने त्याचे पालक फोन वापरत नाहीत, हे ध्यानात घेत त्याने 'व्हॉटस्अॅप'ची निर्मिती केली.

याबाबत 'इनोव्हेशन' विषयाचे जागतिक स्तरावरील तज्ज्ञ डॉ. शुलामित फिशल म्हणाले, 'योजना, कृती, संशोधन, संवाद, प्रतिसाद (रिफ्लेक्ट), निरीक्षण अशा 'स्पायरल' पद्धतीने प्रयोगशील उद्योजकतेचा विकास होतो.' शुलामित यांनी आणखी एका पद्धतीने उद्योजकतेचा विचार करता येतो, हेही नमूद केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'ज्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, त्यासंबंधीचा डाटा गोळा करणं, त्या माहितीचं विश्लेषण करणं, त्यासंबंधीची कृतीयोजना बनवणं हे उद्योजकतेसाठी आवश्यक ठरतं. एक मात्र नक्की, तुमची कृती योजना अशी असावी, की त्यातून काहीतरी बदल घडणं आवश्यक आहे. प्रयोगशील उद्योजकतेच्या त्रिकोणात प्रेरणा, गरजा आणि इच्छा यांचा समावेश हवा.'

उद्योजकतेकडे वळताना पाच महत्त्वाच्या घटकांचा सविस्तर विचार करावा लागतो. या गोष्टी म्हणजे व्यवस्थापनाचं साहस, प्रयोगशील/सर्जनशील असणं, कम्फर्ट झोन सोडणं, त्याकरता वेळ देणं, समविचारी व्यक्तींचं नेटवर्क तयार करणं.
उद्योजकतेकडे वळण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक असतात, याविषयी सांगताना 'शिक्षणव्यवस्थेतील उद्योजकता' या विषयाच्या इस्रायली अभ्यासक गलित झायमर म्हणाल्या, 'उद्योजकतेकडे वळणाऱ्या व्यक्तीकडे आत्मविश्वास, स्वयंप्रेरणा, सकारात्मकता, धैर्य, निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि बदल घडवण्याची आसक्ती आवश्यक असते. त्यासोबत लागतो तो प्रॅक्टिकल अॅप्रोच! हे सारं शिकता येतं. मात्र ते शिकण्याची, मोठं होण्याची वृत्ती असावी लागते. वास्तववादी असणं, संयम आणि इतरांप्रती आदर असणं, इतरांचं ऐकून घेण्याची वृत्ती असणं अशी गुणकौशल्यंही अंगी बाणवावी लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयशाचा सामना करण्याची तयारी आणि अपयशाला न घाबरणं..'

जगभरात अत्यंत नावाजलेल्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांनी उमेदीच्या काळात ज्या खस्ता काढल्या होत्या- त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे..
  • विजेच्या दिव्याच्या निर्मितीत यश मिळण्याआधी एडिसनला दहा हजार वेळा अपयश आलं होतं.
  • युक्रेनमध्ये जन्मलेला अमेरिकन संगणक वैज्ञानिक मॅक्स लेवचिन याने स्थापन केलेली पहिली कंपनी सपशेल अपयशी ठरली. त्याने स्थापन केलेल्या दुसऱ्या कंपनीला पहिल्याच्या तुलनेत कमी फटका बसला, पण प्रयत्न मात्र साफ फसला. त्याने स्थापन केलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या कंपनीचा परफॉर्मन्स जेमतेम होता. पण त्यातून तो सावरला आणि पे पल या त्याच्या पाचव्या कंपनीने घवघवीत यश संपादन केले.
  • ज्या कंपनीचे अँग्री बर्ड हे कार्टून मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, त्या रोवियो या कंपनीला २०व्या प्रयत्नात यश मिळालं. तोपर्यंत आठ र्वष कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागला.. 'अँग्री बर्ड'ने आठ वर्षांचं सारं अपयश धुवून काढलं.
  • सिल्व्हस्टर स्टेलॉन जेव्हा 'रॉकी' चित्रपट बनविण्यासाठी स्क्रिप्ट घेऊन फिरत होता, तेव्हा त्याला पहिला होकार मिळण्याच्या आधी तब्बल दीड हजार वेळा चित्रपट बनविण्यासाठीचा नकार सहन करावा लागला होता.
उद्योजक होताना लहानशा, नव्याने उचललेल्या पावलापासून सुरुवात करणं आवश्यक ठरतं. चुकांमधून शिकत पुढे सरकणं महत्त्वाचं असतं. उद्योग करताना जेव्हा पदरात अपयश येतं, तेव्हा त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहाणं गरजेचं असतं.
'उद्योजकतेकडे वळणाऱ्यांचं प्रमुख उद्दिष्ट पैसा कमावण्यापलीकडे पोचत नवनिर्मिती हे असेल तर त्या कामातून त्यांना अधिक आनंद मिळू शकतो. यश हे पैशात मोजलं जात नाही तर ते ज्ञानाच्या रूपात आणि अनुभवात मोजलं जातं,' असंही गलित म्हणाल्या.

सुरुवातीला बरीचशी अस्थिरता, काहीशी अनिश्चितता आणि अस्वस्थता पेलण्याची इच्छा व क्षमता असली आणि नेटाने काम केलं तर तुमच्या उद्योजकतेतील नवनिर्मितीला बाळसं धरतं आणि मग त्यापाठोपाठ आपोआपच पैसा, प्रसिद्धी पायघडय़ा घालत येते. मात्र त्यासाठी सुरुवातीची अवघड वळणं, काटेरी प्रवास पेलण्याची धमक हवी.. एक छान वाक्य आहे- 'जर तुम्ही बाहेर पडाल, तर तुम्ही छानशा ठिकाणी पोहोचू शकता..'

एखादी गोष्ट जेव्हा जमत नाही, तेव्हा न जमलेली गोष्ट पुन्हा नव्याने, मेथड बदलून करता येऊ शकते. तुम्ही किती वेळा प्रयत्न करता, तुम्ही प्रयत्न कसे करता, याला बरंच महत्त्व असतं.

तुमची नवनिर्मिती ही जर लोकांना भेडसावणाऱ्या समस्येवरचा उतारा असेल आणि त्या उत्पादनाने केवळ तुमचाच नाही तर इतरांना लाभ होत असेल तर तुम्ही खरे उद्योजक! 
- सुचिता देशपांडे

थ्री डी प्रिंटींग : अर्थात सेल्फी स्टॅच्यू

कॅमेरा फोन्स आणि सोशल नेटवर्किंग या दोन बाबींमुळे अल्पावधीतच सेल्फी फोटोंना अमाप लोकप्रियता मिळाली. २०१३ मध्ये सेल्फी हा सोशल नेटवर्किंग साइट्सवर सर्वाधिक वापरण्यात आलेला शब्द होता. ऑक्सफर्ड डिक्शनरीनेही सेल्फी शब्दाची दखल घेऊन त्याला 'वर्ड ऑफ दि इयर' ठरवले. आता सेल्फीची पुढची पायरी म्हणून सेल्फी स्टॅच्यूकडे पाहिले जात आहे. नव्या थ्री-डी प्रिंटींग तंत्रज्ञानाच्या आधारे आपले शरीर स्कॅन करून स्वतःचा पुतळा तयार करण्याचा ट्रेंड रुजू पाहतो आहे.

अमेरिकेत एकट्या न्यूयॉर्कमध्ये गेल्या वर्षभरामध्ये स्टॅच्यू तयार करून देणारे चार स्टुडिओ आहेत. पूर्वी आपला पुतळा तयार करून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला शिल्पकारासोबत काही दिवस बसावे लागत होते. थ्री-डी स्कॅनिंग व प्रिंटींग तंत्रज्ञान अद्ययावत झाल्याने अवघ्या काही सेकंदांमध्ये तुमचे शरीर स्कॅन करून प्रिंटरमध्ये त्याची प्रतिमा साठवली जाते व त्यानुसार अपेक्षित आकारमानामध्ये पुतळा तयार करण्यात येतो. न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ आर्ट अँड डिझाइनने आतापर्यंत अशाप्रकारचे ६,००० स्टॅच्यू तयार केले आहेत. या स्टॅच्यूंची किंमत साधारणतः ३० डॉलर्सपासून आहे. साडेतीन इंच इतक्या लहान आकारापासून हे पुतळे तयार करण्यात येतात. प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक वूडी अॅलन यांनीही थ्री-डी स्कॅनिंगच्या माध्यमातून आपला पुतळा तयार करून घेतला आहे. स्मिथसॉनियन इन्स्टिट्युशनने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना स्कॅन करून त्यांचाही थ्री-डी प्रिंटेड स्टॅच्यू बनवला आहे.

हे स्टॅच्यू पूर्णतः रंगीत असतात. यासाठी जिप्सियम पावडरचा वापर करण्यात येतो. या तंत्रज्ञानामध्ये विविध प्रकारच्या सामग्रीचा वापर करता येऊ शकतो. या सेल्फी स्टॅच्यूची लोकप्रियता पाहून वॉल मार्टसारख्या मोठ्या कंपनीने आपल्या शॉपिंग मॉलमध्ये अशाप्रकारचे स्टुडिओ सुरू करण्याची योजना आखली आहे. वॉल-मार्टच्या ब्रिटनमधील 'एएसडीए' या स्टोअरमध्ये नोव्हेंबरपासून थ्री-डी स्टॅच्यू बनवून देण्यात येतील. या तंत्रज्ञानामुळे एखाद्या कार्टून कॅरेक्टरच्या शरीरास आपला चेहरा अशा स्टॅच्यू बनवण्याच्या विविध शक्यता अस्तित्वात येऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये या स्टॅच्यूंना मिळणारी लोकप्रियता वाढत आहे. आपल्याकडे स्टॅचू बनवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही पालकांची असते व त्यांना आपल्या लहान मुलांचे स्टॅच्यू बनवून घ्यायचे असतात, असे 'आय मेकर स्टोअर' या स्टुडिओचा निर्माते स्लिवेन प्रेयमाँट सांगतात. अमेरिका व ब्रिटनमध्ये या स्टॅच्यूंना मिळत असलेली लोकप्रियता पाहता भविष्यामध्ये अन्य देशांमध्येही असे स्टुडिओ मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.