नवीन वर्ष, नवीन चेकबुक !


नवीन वर्ष, नवीन चेकबुक हे नवीन वर्षाचे स्लोगन किंवा घोषवाक्य नाही. नवीन वर्षापासून जुन्या चेकबुकचा वापर करता येणार नाही. १ जानेवारीपासून देशभरात नवीन चेक ट्रंक्शन सिस्टीम (सीटीएस) लागू करण्यात येणार असल्याने बँकेच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेणे अनिवार्य आहे. 
नवीन चेक ट्रंक्शन सिस्टीमअन्वये चेक आता एकाच दिवसात वठतील. चेक क्लिअरिंगसाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी न पाठविता त्याऐवजी चेकची इलेक्ट्रॉनिक छायाप्रत (इलेक्ट्रॉनिक इमेज) पाठविण्यात येणार आहे.
या नवीन पद्धतीमुळे चेक क्लिअरिंगची प्रक्रिया जलद, उत्कृष्ट आणि सुरक्षित होईल. यासाठी नवीन स्वरूपातील चेक लागतील. आजवर बँका आपल्या पद्धतीने चेक तयार करीत. आता रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार चेक एकसारखेच असतील. आकार, कागद, डिझाईन सर्वकाही एकसारखे असेल. चलनी नोटांप्रमाणे नवीन चेकमध्येही गोपनीय ओळख असेल; जेणेकरून बनावट चेक ओळखता येतील. नवीन व्यवहारासाठी नवीन चेकचा वापर करता येईल.
असे असतील नवीन चेक 
- बँकेचे नाव चेकवर सर्वांत वर असेल. 
- बँकेचा ‘लोगो’ अल्ट्रा व्हॉयलेट इंकमध्ये असेल. 
- लांबी ८ इंच आणि रुंदी ३.६६७ इंच असेल. 
- वॉटर मार्कमध्ये बँकेचे नाव असेल. 
- एका कोपर्‍यात ‘सीटीएस-इंडिया’ लिहिलेले असेल. 
- चेक सर्व बँकांसाठी स्वीकृत असतील, असेही नमूद असेल. 
- चेकच्या डाव्या बाजूला पँटोग्राफ असेल. 
- रकमेच्या रकान्यात रुपयाचे प्रतीक चिन्ह असेल.