बागी पानसिंग तोमर


का कुणास ठाऊक, पण पानसिंग तोमारचा सिनेमा आणि सचिनचे शतक दोन्ही एकदम आले, आणि पानसिंगच्या कार्तुत्वापुढे सचिन आणि क्रिकेट खुज वाटू लागल हे नक्की,
घरची प्रचंड गरिबी धावता येत हेच भांडवल प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पानसिंग तोमरने मग 
"मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट"अस म्हणत लष्कराचा रस्ता धरला. वडील, आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत,भांवडांनाही कामाला जावं लागायचं.
अशा परीस्थित हा लष्करात सामील झाला त्यातही मोठ्ह कारण त्याला खायला भरपूर लागत असे आणि खेळाडू म्हणू ते त्याला लष्करात मिळत होते,
पण दुर्दैव पहा त्याला डाकू म्हणून जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली तितकी खेळाडू म्हणून नाही मिळाली आणि सिनेमात तसा एक डायलॉग देखील आहे ,एकेठिकाणी तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा देवून तो एक यशस्वी अपहरण करतो लगेच टीव्हीवर आणि रेडीओवर बातमी झळकते डाकू पानसिंग ने अस केल त्यावेळी पानसिंग उद्वेगाने म्हणतो,
"देशासाठी सुवर्ण पदक जिंकत होतो त्यावेळी काल कुत्र विचारात नव्हत आणि तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा काय दिला सगळीकडे नाव झाल,,,?"
पायात घालायला नीट बूट नसताना पानसिंग तोमरने 
या देशाला 
(१)-२३ वी राष्ट्रीय स्पर्धा कटक १९५८
३००० मिटर्स स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट १२.४ सेकंद राष्ट्रीय विक्रम,
(२)-२४ वी राष्ट्रीय स्पर्धा त्रिवेंद्रम १९५९
५००० मीटर प्रथम १४ मिनिट ५४ सेकंद राष्ट्रीय विक्रम
३००० मीटर स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट १७ सेकंद.
(३)-२५ वी राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली १९६०
५००० मीटर प्रथम १४ मिनिट ४३.२ सेकंद 
३००० स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट ०७.८ सेकंद 
(४)-२६ वी राष्ट्रीय स्पर्धा जालंधर १९६१
३००० मीटर स्टीपलचेस प्रथम ९मिनित ०२.३ सेकंद राष्ट्रीय विक्रम 
----
बर हे सार पानसिंग तोमार्च्याच बाबतीत या देशात घडत अस नाही असे असंख्य खेळाडू असतील जे योग्य संधी अभावी मागे पडत असतील त्यांना सरकार मदत करताना हात आखडता घेत असेल, नव्हे घेतेच.
काय हव या गुणी खेळाडूंना जे देशासाठी खेळतात?
फक्त पाठीवर मदतीचा हात लई मागण न्हाई देवा लई मागण न्हाई..
त्यांना हवा एका साधा संधीप्रकाश हवा ज्या प्रकाशात देशाच नाव उज्ज्वल करतील असे एकसो एक हिरे ईथे आहेत,

क्रिकेट सामने खेळले जात असताना या देशाच उत्पन्न वाढल कि कमी झालं?
आणि अस जर या देशात घडत असेल तर सुभेदार या पदावर असलेला पानसिंग तोमर डाकू झाला तर ती चूक कुणाची?
वयाच्या ५० व्या वर्षी पोलिसांच्या हातून तो मारला गेला ह्याला जबादार कोण?
पुन्हा जाता जाता सिनेमाचा सुरवातीचा एक डायलॉग सांगावासा वटतो.पत्रकार विचारतो ,तुम्ही डाकू कसे झालात ?
त्यावेळी पानसिंग बोलतो 
"हम डाकू नाही हम तो बागी है साले डाकू तो सांसद में बैठे है."

सचिन हा सर्वश्रेष्ठ - व्हीवियन रिचर्डस

सकाळ वृत्तसेवा -

त्रिनिनाद - ""मी पाहिलेल्या फलंदाजांपैकी सचिन तेंडुलकर हा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे"", असे मत वेस्ट इंडिजच्या सर व्हीवियन रिचर्डस यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केले.

""मी डॉन ब्रॅडमन यांना खेळताना पाहिलेले नाही. मात्र, माझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज मी अजून पाहिलेला नाही, किंबहुना सचिनपेक्षा चांगला फलंदाज अजून झालेला नाही,'' असे रिचर्डस म्हणाले.

यावेळी ब्रायन लारा, रिकी पॉंटिंग आणि जॅक्‍स कॅलीस या समकालीन फलंदाजांपेक्षा तसेच सुनील गावसकर अथवा जावेद मियॉंदाद यांच्यापेक्षाही तेंडुलकर श्रेष्ठ फलंदाज असल्याचे प्रमाणपत्र रिचर्डस यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

""सचिनच्या कारकिर्दीचा आलेख हा सर्व संकटांवर मात करत सतत उंचावलेला आहे आणि ही सर्वांत वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. एक क्रिकेटपटू म्हणून मी इतर कोणाहीपेक्षा सचिनचा आदर जास्त करतो. तो एक "पूर्ण खेळाडू' आहे,'' असे रिचर्डस यांनी सांगितले.

यावेळी रिचर्डस यांनी विंडीज दौऱ्यावर न येण्याच्या सचिनच्या निर्णयाचेही समर्थन केले.

युट्यूब वर अकाउंट उघडण्याचे फायदे


यु ट्यूब मेनू युट्यूब वर अकाउंट उघडण्याचे फायदे खूप आहेत. ते असे
१)  जेव्हा युट्यूब वर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता, त्या नंतर काही दिवसांनी तुम्हाला तो व्हिडिओ परत पाहावयाचा असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओ चे नाव किंवा त्या व्हिडिओ च्या च्यानल चे नाव किंवा तो व्हिडिओ बनविणाऱ्या व्यक्तीचे नाव माहीत असल्याखेरीज तुम्ही तो व्हिडिओ परत शोधून काढणे कठीण.
जर तुम्ही युट्यूब वर अकाउंट उघडले असेल आणि त्या मध्ये लॉग इन करून तुम्ही व्हिडिओ पहात असाल तर तुम्ही पाहिलेल्या व्हिडिओची नावे तुमच्या अकाउंट मध्ये हिस्टरी या सदराखाली जमा होतात. म्हणजे तुम्ही कधीही पाहिलेले  व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अकाउंट च्या हिस्टरी मध्ये एकत्र पहावयाला मिळतात. महत्वाचे किंवा आवडलेले व्हिडिओ सहजा सहजी शोधून काढण्याचा हा मार्ग तुम्ही युट्यूब वर अकाउंट उघडले असेल तर सापडतो. 
येथे तुम्ही युट्यूब च्या अकाउंट मध्ये लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या मेनुचे चित्र पहात आहात. (चित्र विस्तारित स्वरूपात पाहण्यासाठी त्यावर माऊस पॉइंटर न्यावा )
२) जर तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला तो पाहण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही व्हिडिओ च्या खालील पट्टीवर एक गोल घड्याळा सारखे चिन्ह दिसते तेथे क्लिक केल्यास ते चिन्ह बरोबर च्या चिन्हा मध्ये बदलते. त्यानंतर आपल्या च्यानल मध्ये जावून  वाच लेटर या सदराखाली तो  व्हिडिओ जमा झालेला पाहू शकता.
३) जर तुम्हाला एखादे च्यानल आवडले तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब केलेल्या च्यानल मध्ये नवीन  व्हिडिओ आल्यास तो तुम्हाला तुम्ही आपल्या  युट्यूब च्या अकाउंट मध्ये लॉग इन केल्या नंतर माय सबस्क्रिपशन्स या सदराखाली  एकत्रित पाहता येतात. एकापेक्षा जास्त च्यानल ला सबस्क्राईब केलेले असल्यास ही सोय सुविधाजनक वाटते
वॉच  लेटर
४) जर तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला तर त्याला पसंदी दर्शवणे तसेच त्याखाली आपली प्रतिक्रिया लिहिणे या सारख्या गोष्टी तुम्ही युट्यूब वर अकाउंट असल्यास करू शकता

याखेरीज तुम्ही आपले व्हिडिओ युट्यूब च्या अकाउंट मध्ये साठवून ठेवू शकता.

या संभाजीच्या चरित्राने एक प्रभावी व मंगल सत्य प्रकट केले आहे...


इतिहास संशोधक श्री वा.सी.बेंद्रे यांनी चार तपांपेक्षा अधिक काल पर्यंत जी तपश्चर्या केली आहे तिचें साफल्य म्हणजे त्यांनी लिहिलेले संभाजी चा ग्रंथ होय.मराठ्यांच्या इतिहासाची साधने संगृहीत व संपादित करणार्या विद्वानांच्या चार पिढ्यांचे संशोधन विषयक परिश्रम सफल झाल्याची ग्वाही हे पुस्तक उच्च स्वराने निरंतर देत राहील,इतकी ह्या पुस्तकाची योग्यता आहे.गेल्या शंभर वर्षातील महाराष्ट्रीय मनाला मराठ्यांच्या इतिहासाचा ध्यास लागला होता व त्या करिता अनेक प्रज्ञावनतांनी त्या इतिहासाच्या अभ्यासाकरिता आवश्यक साधनांची जुळवाजुळव करण्याकरिता हव्यास केला होता.विष्णुशास्त्री चिपळुणकरांपासून तो श्री.बेंद्रे यांच्या पर्यंतच्या दीर्घ कालावधींत मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित असे जे जे काही प्रयत्न झाले त्या सर्वांना या पुस्तकामुळे सार्थकता आली आहे.हे पुस्तक पुरस्कृत करण्याचा बहुमान प्राज्ञमालेला मिळाला याबद्दल आम्हांस धन्यता वाटते.हा बहुमान मिळवून देण्यांत आमचे मित्र व सहकारी प्रा.न.र.फाटक यांचे साहाय्य मिळाले म्हणून येथे त्यांचाहि कृतज्ञता पूर्वक निर्देश आम्ही करतो .

या संभाजीच्या चरित्राने एक प्रभावी व मंगल सत्य प्रकट केले आहे इतिहास संशोधक पुष्कळवेळां लोकप्रिय व पूज्य वाटणाऱ्या घटनांचे असत्यत्व दाखवून अप्रिय व अपूज्य अशा घटनांची त्या ठिकाणी स्थापना करतो ;कारण ,इतिहाससंशोधकाला सत्य हेच पूज्य व आनंददायक असते.श्री.वा.सी.बेंद्रे अशा सत्यनिष्ठ संशोधकां पैकी आहेत.त्यांचा योगायोगच मोठा म्हटला पाहिजे कीं इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालींत जुना लोकप्रसिद्ध धर्मवीर परंतु दुर्गुणी संभाजी न सापडता एक महान विभूति असलेला संभाजी गवसला.धर्मांकरितां आत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्यें शौर्याने व धीराने उभा राहून प्राणविसर्जित करणारा संभाजी दुर्व्यसनी ,खुनी व धर्मभोळा म्हणून आजपर्यंत इतिहासलेखकांनी व नाटककारांनी दाखविला आहे ; तत्वचिंतकाच्या दृष्टीनें हें एक न उलगडलेले कोडें होते.जिवंतपणी शरीराचे तुकडे होत असतां ,डोळे काढले जात असतां, शरीर सोलले जात असतां जो धर्मनिष्ठेनें देहातीत रहातो व आपल्या धर्मनिष्ठेच्या अंतिम कसोटीस उतरतो तो आयुष्यभर देहधर्माचा दास म्हणून वागतो,ही घटना सुसंगत वाटत नाहीं ,अतर्क्य वाटते.आतां श्री.बेंद्रे यांनी या वैचारिक कोडयांतून कायमची सुटका केली आहे.मराठ्यांच्या विषयीं गैरसमज असलेला मुसलमान इतिहासकार काफिखान संभाजीस शिवाजीपेक्षां सवाई समजतो ,याचा उलगडा या चरित्राने होतो. आतां मराठ्यांच्या इतिहासांतील एका अभिमानास्पद कालखंडाच्या कार्यकारणभाव उघडकीस येतो, व त्या इतिहासाची उपपत्ति लागते.संभाजी नंतरचा औरंगजेबाच्या निराशामय अंतापर्यंतचा मराठ्यांचा झुंजार व विजयी इतिहास आतां बोलूं लागेल कीं, धर्मनिष्ठ,राजकारणधुरंदर मुत्सद्दी व सेनापति छत्रपती संभाजी महाराज हीच माझी प्रेरकशक्ती आहे !

श्री. बेंद्रे यांनी "छत्रपती संभाजी महाराज " हेम चरित्र लिहून ऐतिहासिक चरित्र लेखनाचा एक उच्चतर मानदंडच निर्माण केला आहे.या पुस्तकाच्या अखेरची संदर्भग्रंथसुचि त्यांच्या अध्ययनाच्या व व्यासंगाच्या विस्ताराची सूचक आहे व या ग्रंथातील प्रकरणवारी इतिहासाच्या आंगोपांगाचा केवढा व्याप लक्षांत घ्यावा लागतो ,याची दर्शक आहे

मराठ्यांच्या इतिहासाला या पुस्तकाने नवी दिशा मिळाली आहे व नवा प्रकाशहि मिळाला आहे. संभाजी संबंधी या पूर्वी प्रसिद्ध झालेले अपवाद सूचक सर्व साहित्य आतां बाधित झाले आहे,एक महान पुण्यश्लोक पुरुषाबद्दलचा अनेक शतके द्दढ झालेला मिथ्यापवाद बाद झाला आहे.याची दखल यानंतर प्रसिद्ध होणार्या सर्व साहित्याने जरूर घेतली पाहिजे.नाहींतर सत्यापलापाचें पाप लागेल तें एक खोटें नाटकच ठरले आहे ,विशेषतः क्रमिक पुस्तकांच्या व सुबोध वांग्मयाच्या लेखकवर्गाने यापुढे सावध राहून संभाजीवरील मिथ्यावादापासून वाचक वर्गाला दूर ठेवलें पाहिजे ; हें त्यांचे कर्तव्य आहे.
लक्ष्मणशास्त्री जोशी
अध्यक्ष
प्राज्ञपाठशाळा मंडल, वाई
१७.२.१९६०

लाइफ ऑफ पाय - एक दर्जेदार कलाकृती


या सिनेमाची कथा तोंडात बोट घालायला लावणारी आहे. ही पिसिन नावाच्या भारतीय तरुणाची कथा आहे. त्याला पाय म्हटले जाते. फ्रेंच भाषेत स्विमिंग पूलला पिसिन म्हणतात.

हा तरुण कॅनडाला जात आहे. मात्र तो ज्या जहाजावरुन जात असतो, ते बुडते आणि तो आपल्या कुटुंबियांपासून विभक्त होतो. मात्र लाइफबोटवर असल्यामुळे तो समुद्रांच्या लाटांमधून बचावतो. त्याच्या लाइफबोटवर त्याच्याबरोबर कोल्हा, झेब्रा आणि वाघ हे प्राणी आहेत. हे सगळे प्राणी पाँडेचेरीमधील त्याच्या वडिलांच्या प्राणीसंग्रहायलातील सदस्य आहेत.

शेवटी केवळ पाय आणि वाघ दोघेच त्या वादळातून बचावतात. हे दोघेही एकमेकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. ही कथा लेखिका यान मार्तेल यांची आहे. जवळपास पाच प्रकाशकांनी त्यांची ही कथा प्रकाशित करायला नकार दिला होता. मात्र २००१ साली ही कथा प्रकाशित झाल्यानंतर ’लाइफ ऑफ पाय’ ही कादंबरी जगभरात बेस्ट सेलर ठरली.

सहसा एखाद्या कादंबरीवर तयार झालेली कलाकृती उत्तमरित्या साकार होत नसल्याचा समज आहे. मात्र यान मार्तेल यांच्या ’लाइफ ऑफ पाय’ या कादंबरीवर दिग्दर्शक अँग ली यांनी उत्कृष्ठ कलाकृती तयार केली आहे.

या पुस्तकावर एवढी चांगली कलाकृती तयार होऊ शकते याची कल्पनाही कुणी करु शकत नाही. मात्र क्राउचिंग टायगर हिडन डॅगन, ब्रोकबॅक माउंटन, टेकिंग वुडस्टाक या सिनेमांचे दिग्दर्शन करणा-या दिग्दर्शकालाच हे शक्य झाले आहे. टारझन आणि मोगलीमधली मनुष्य आणि प्राण्यांच्या मैत्रीची गोष्ट जितकी जुनी आहे, तितकीच ती डिस्ने आणि लॉयन किंगमधील कथेएवढी नवीनसुद्धा आहे.

याप्रकारच्या कथांमध्ये प्राणी आणि मनुष्याला खूपच प्रेमळ दाखवले जाते. या कथांना लहान मुलांची पसंती मिळत असते.

इतके वर्ष उलटल्यानंतरही जंगलातील नियम बदललेले नाही. आजही नॅशनल जिओग्राफीवर किंवा एनिमल प्लॅनेट चॅनलवर एखाद्या वाघाला बघून आपल्या अंगावर शहारा उभा राहतो. ही आपल्या मनात असलेली भीती आहे.

दिग्दर्शक अँग ली प्रेक्षकांच्या भावनांना जाणून आहेत. थ्रीडीमध्ये जेव्हा रिचर्ड पार्कर नावाचा वाघ हल्ला करतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनात थरार निर्माण होतो. त्यामुळे हा फक्त मुलांसाठी तयार केलेला सिनेमा नाहीये. हा खूप विचारपूर्वक तयार करण्यात आलेला सिनेमा आहे.

जेव्हा आपण भयावह वादळात जहाजाला बुडताना बघतो तेव्हा त्या असाहय मुलासाठी शोक व्यक्त करण्या इतकाही वेळ आपल्याकडे नसतो. आपणच काय पण तो मुलगासुद्धा आपल्या कुटुंबियांना गमावल्याचे दुःख व्यक्त करु शकत नाही. कारण त्याच्यासमोर वाघ बसला आहे. मात्र नंतर तोच वाघ त्या मुलाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनतो.

पायचे आयुष्य काहीसे असेच असते. सूरज शर्माने या सिनेमात पायची भूमिका साकारली आहे. सूरजचा हा पहिलाच सिनेमा आहे. इरफान खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. इरफान हा एकटा भारतीय कलाकार आहे जो सध्या हॉलिवूड सिनेमांमध्ये दिसतोय. या सिनेमात इरफानला भरपूर स्थान देण्यात आले आहे. मात्र या सिनेमातला खरा नायक कॉम्प्यूटरच्या मदतीने तयार करण्यात आलेला मात्र खराखुरा वाटणारा वाघ आहे. रिचर्ड पार्कर नावाचा हा वाघ खरे पाहता काल्पनिक आहे. मात्र पडद्यावर तो आपल्याला खराखुरा वाटतो.

अनेक प्रेक्षक थ्रीडी सिनेमा बघण्यास उत्सुक नसतात. मात्र हा सिनेमा बघताना ही अडचण वाटत नाही. प्रत्येक दृश्य आपल्या मनावर बिंबत जातं. अनेक दिग्दर्शक थ्रीडी सिनेमांचा उपयोग गिमिक्सच्या रुपात करतात. मात्र हा सिनेमा आत्तापर्यंतच्या थ्री डी सिनेमांपैकी सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे असे म्हणावे लागेल.

नवीन वर्ष, नवीन चेकबुक !


नवीन वर्ष, नवीन चेकबुक हे नवीन वर्षाचे स्लोगन किंवा घोषवाक्य नाही. नवीन वर्षापासून जुन्या चेकबुकचा वापर करता येणार नाही. १ जानेवारीपासून देशभरात नवीन चेक ट्रंक्शन सिस्टीम (सीटीएस) लागू करण्यात येणार असल्याने बँकेच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेणे अनिवार्य आहे. 
नवीन चेक ट्रंक्शन सिस्टीमअन्वये चेक आता एकाच दिवसात वठतील. चेक क्लिअरिंगसाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी न पाठविता त्याऐवजी चेकची इलेक्ट्रॉनिक छायाप्रत (इलेक्ट्रॉनिक इमेज) पाठविण्यात येणार आहे.
या नवीन पद्धतीमुळे चेक क्लिअरिंगची प्रक्रिया जलद, उत्कृष्ट आणि सुरक्षित होईल. यासाठी नवीन स्वरूपातील चेक लागतील. आजवर बँका आपल्या पद्धतीने चेक तयार करीत. आता रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार चेक एकसारखेच असतील. आकार, कागद, डिझाईन सर्वकाही एकसारखे असेल. चलनी नोटांप्रमाणे नवीन चेकमध्येही गोपनीय ओळख असेल; जेणेकरून बनावट चेक ओळखता येतील. नवीन व्यवहारासाठी नवीन चेकचा वापर करता येईल.
असे असतील नवीन चेक 
- बँकेचे नाव चेकवर सर्वांत वर असेल. 
- बँकेचा ‘लोगो’ अल्ट्रा व्हॉयलेट इंकमध्ये असेल. 
- लांबी ८ इंच आणि रुंदी ३.६६७ इंच असेल. 
- वॉटर मार्कमध्ये बँकेचे नाव असेल. 
- एका कोपर्‍यात ‘सीटीएस-इंडिया’ लिहिलेले असेल. 
- चेक सर्व बँकांसाठी स्वीकृत असतील, असेही नमूद असेल. 
- चेकच्या डाव्या बाजूला पँटोग्राफ असेल. 
- रकमेच्या रकान्यात रुपयाचे प्रतीक चिन्ह असेल.

वाचालयाच हवा अंतराळातून सुनिताने लिहिलेला ब्लॉग...


तब्बल १२७ दिवसांची अंतराळ सफर करून भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळतज्ज्ञ सुनीता विल्यम्स नुकतीच पृथ्वीवरल्या तिच्या दुसर्‍या घरी परतली. अंतराळात असताना तिने लिहिलेल्या ब्लॉगमधल्या या काही मोजक्या नोंदी !

स्पेस स्टेशनमध्ये रहाणं ही एक गंमतच आहे. थंडीही खूप आणि उष्णताही खूप. डोळे बंद असले तरी तपमानातला फरक कळतो आणि त्यामुळे सूर्योदय सूर्यास्तही! इथं २४ तासाच्या काळात तब्बल १६ वेळा दिवस-रात्र होते.
या संपूर्ण ट्रिपमध्ये मी एकच पॅन्ट आणि एक शॉर्टस घातलीय. इथे धूळ नाही, त्यामुळे कपडे मळत नाहीत. पण इक्विपमेंट्सवर काम करताना कधी कधी डाग मात्र लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे कपडे धुता येत नाहीत. पण पृथ्वीवरच्यासारखे पुन:पुन्हा कपडे मात्र बदलावे लागत नाहीत.
आजअखेर एकदा शेवटचं आम्ही आमचं सोयूझ एअरक्राफ्ट पाहून आलो. प्रत्येक गोष्ट आम्हाला हवी तशीच आहे ना, आमचं सामान लागलंय ना याची खातरजमा केली. आमच्या या यानाला युरीने सांकेतिक नाव ठेवलंय - अगाट (अ¬अढ). किती सुंदर आहे आमचं हे अगाट ! नासा टीव्हीवर जर तुम्ही आमचा लाँच पाहणार असाल तर तुम्हाला आमच्या यानाचा उल्लेख - ‘अगाट’ असाच ऐकू येईल आणि याच सांकेतिक भाषेत युरी म्हणजे अगाट १, मी - अगाट २ आणि अकी - अगाट ३
१३ जुलै २0१२
या मधल्या काही तासांत युरी, अकी आणि मी- आम्ही तिघांनीही हेअरकट केलाय. प्रत्येकाला लाँचच्या आधी तो करावाच लागतो. परंपराच आहे म्हणा ना.
सोयूझ आता लाँचसाठी बाहेर आणण्यात आलंय. या समारंभासाठी प्राईम क्रू ला म्हणजे आम्हाला जरी जाता येत नसलं तरी आमची घरची मंडळी आणि मित्रमंडळी तिथे हजर आहेत. कझाकिस्तानमधली आजची ही सकाळ खूप छान आहे.
३0 जुलै २0१२
आम्ही इथे पोहोचलो ! इथपर्यंतचा प्रवास आणि हे ठिकाण दोन्ही सुंदर ! मला या सगळ्या गोष्टी करायला मिळताय.. मी खरंच भाग्यवान आहे ! आम्ही इथे जे प्रयोग करतोय त्याचा फायदा सगळ्या मानवजातीला नवीन गोष्टी शोधण्यासाठी, शिक्षणासाठी, कुतुहल शमवण्यासाठी होईल. 
अंतराळात येण्याची माझी ही दुसरी वेळ असली, तरी यावेळी सगळं वेगळं आहे. स्पेस स्टेशन मोठं आहे, लोकंही जास्त आहेत आणि सगळी कामंही वेगळी आहेत. विज्ञानाची काय किमया आहे.. इथे येणार्‍या वेगवेगळ्या यानांमुळे वस्तू येण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. लॅबची काम करण्याची यंत्रणा स्टेबल आहे त्यामुळे मागच्यापेक्षा आता काम करणं जास्त सुरळीत झालंय.
पण काही गोष्टी तशाच राहतात - सफाई, टॉयलेटची सफाई आणि त्याची यंत्रणा नीट ठेवणं, कचर्‍याचं नियोजन आणि त्याची विल्हेवाट लावणं, नेहमी लागणार्‍या वस्तू काढून ठेवणं, कॉम्प्युटर मेन्टेनन्स.. कुठेही जा.. या गोष्टींपासून सुटका नाही ! इथे आम्हाला हरकाम्या असावं लागतं.. चांगलंच आहे. त्यामुळे आमचा वेळही जातो. 
आत्ता आमचं यान युरोपवरून जातंय. इंग्लंड, फ्रान्स, इटली, दक्षिण ग्रीस, कैरो, सूवेझ कालव्यापासून रेड सी ते सोमालियापर्यंत सगळे देश मला स्पष्ट ओळखता आले. आफ्रिकेजवळ असलेलं सॅण्ड स्टॉर्म - वाळूचं वादळ सोडलं तर इतर ठिकाणी आकाश तसं निरभ्र आहे.
या आठवड्यात आम्ही केलेल्या गोष्टी 
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधली रविवारची रात्र जपानचं कार्गो यान कढत आमच्या दिशेनं येतंय. तर आताच आम्ही प्रोग्रेस ४७ यान सोडलं. अंतराळात ट्रॅफिक जाम होणार बहुतेक ! 
आता कढत स्टेशनला जोडून घेण्याची तयारी जो आणि अकी करतायत. जपानच्या किनारपट्टीजवळून हे कार्गाे यान लाँच करण्यात आलंय आणि आता आम्हाला रोबोटिक आर्मच्या मदतीनं ते पकडून स्टेशनला जोडायचंय. यान पकडण्याचं मुख्य काम ते दोघं करणार आहेत आणि माझ्यावर तुलनेनं कमी जबाबदार्‍या आहेत, म्हणून मी इतरही काही गोष्टी करू शकतेय.
इथे आल्यावर आम्हाला आमचे कपडे शोधावे लागले. कॉम्प्युटर्सवर ईमेल सेटिंग्स करावी लागली आणि हो, आता इथे आमच्याकडे नवं टॉयलेट आहे ! इथे असणार्‍या आधीच्या रशियन टॉयलेट सारखंच आहे; पण यामध्ये एक नवं फीचर आहे. या नव्या टॉयलेटमध्ये युरिन रिसायकलिंग करून युरिनचं रूपांतर पाण्यात करता येतं ! आमच्या सोयूझच्या टॉयलेटपेक्षा तर नक्कीच चांगलं आहे हे ! 
इथली स्लिप स्टेशन्स - झोपायच्या जागाही कुल आहेत ! आम्ही चौघं जण नोड २ मध्ये झोपतो. बाजूबाजूला. इथे झोपण्यासाठी जमिनीसोबतच छताचाही वापर करता येतो ! मी सगळ्यात खाली झोपते. झोपायची जागा कॉफिनसारखी ! इतर दोघं जण स्टेशनच्या रशियन सेगमेंटमध्ये झोपतात. 
व्यायाम
इथल्या सगळ्या गोष्टींची आम्हाला हळूहळू सवय होतेय. दोनच दिवसांत तुमच्या शरीरात - स्नायूंमध्ये किती बदल होऊ शकतात याची जाणीव थक्क करणारी आहे. मला हे माहीत होतं म्हणून मी इथे आल्याच्या दुसर्‍याच दिवशी ट्रेडमिल वापरायला सुरुवात केली. अंतराळ दिसणार्‍या घुमटाच्या खालीच ही मशीन्स आहेत आणि जवळच गाणी लोड केलेला लॅपटॉपही आहे. आज मी लवकर उठले, मोठय़ा आवाजात गाणी लावली आणि खिडकीतून बाहेर पाहात व्यायाम केला. इथे व्यायामासाठी असलेली बाइक जुनीच आहे. मागच्या वेळी मी आले होते, तेव्हाही हीच होती. आमची जुनी मैत्री आहे !
१७ ऑगस्ट २0१२
आमचा स्पेसवॉक आता जवळ येतोय. ३0 ऑगस्टला मी आणि अकी एतअ म्हणजेच स्पेसवॉक करणार आहोत. त्यामुळे आता एअरलॉकची सफाई करायला आम्ही सुरुवात केलीय. आमच्या सूट्सकडे पण लक्ष द्यायला हवं. हे सूट्स आमच्यासाठी अंतराळात एका लहानशा स्पेसक्राफ्टचं काम करतात. त्यामुळे त्यांच्यात अनेक व्हॉल्व्ह, टँक्स, कुलिंग, हीटिंग अशा स्पेस स्टेशनवर असलेल्या सगळ्या गोष्टी असतात. यामुळेच तर आम्ही तग धरून आहोत. हे सूट बरेच दिवस वापरण्यात आलेले नाहीत, म्हणून मग आता त्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही लहान लहान प्री-फ्लाईट्स करायला लागलोय.
३ सप्टेंबर २0१२
एक्स्ट्रा वेहिक्युलर अँक्टिविटी म्हणजे स्पेसवॉकमध्ये आम्ही बिझी झालो होतो. आधी तयारी आणि मग स्पेसवॉक. रोबॉटिक आर्म वापरत ३0 ऑगस्टला आम्ही स्पेसवॉक केला. आमच्या अंदाजापेक्षा तो जास्त काळ चालला. इथे उठून सरळ बाहेर जाता येत नाही. कदाचित स्टेशनच्या बाहेर पडणं हाच सगळ्यात सोपा आणि रंजक भाग आहे. वॉकच्या आधी बरीच कामं करावी लागतात. बॅटरी बदलणं, कार्बन डाय ऑक्साइडची नळकांडी काढणं, सूटची मापं नीट करणं, इतर वस्तूंची जमवाजमव आणि बरंच काही. अगदी झोपायचं कधी आणि खायचं कधी याचंही प्लानिंग करावं लागतं. कारण ६ तासांच्या स्पेसवॉकसाठी ८ तास त्या सूटमध्ये घालवावे लागतात.
मागच्या वेळी मी इथे आले होते तेव्हाच एक गोष्ट शिकले. इथे कोणतीही गोष्ट ठरवल्याप्रमाणेच होईल याची खात्री नाही. जी गोष्ट अवघड वाटते ती सोपी होऊन जाते आणि एखादी सोपी वाटणारी गोष्ट महाकठीण होते. असं का, कुणास ठाऊक. म्हणजे जसं एखाद्या रिकाम्या रस्त्यावरून जॉगिंग करताना दोन कार्स अगदी तुमच्या बाजूनंच एकमेकांच्या जवळून जाव्यात, तसं. ‘स्टिकी बोल्ट’चंही असंच झालं. आम्हाला जी गोष्ट सोपी वाटली होती, तीच अवघड ठरली.
इथे असताना स्टेशनच्या आतलं वातावरण बदलत नाही, त्यामुळे बाहेरच्या वातावरणात होणार्‍या बदलांचा आम्हाला कधीकधी विसर पडतो. अंतराळ खूप बदल घडत असतात. थंडीही खूप आणि उष्णताही खूप. सूर्याकडून येणार्‍या झळा, गरम वारा आणि पोकळी या सगळ्यांमुळे अनेक गोष्टी आणि बदल घडतात. अगदी स्पेससूट घातल्यानंतरही सूर्योदय - सूर्यास्त जाणवतो. डोळे बंद असले तरी तपमानातला फरक कळतो आणि त्यामुळे सूर्योदय सूर्यास्तही ! असाच परिणाम स्टेशनच्या बाहेरील बाजूला असणार्‍या मेटलवर होतो आणि असाच परिणाम काही बोल्ट्सवरही झाला. गेली दहा वर्षं हे स्पेस स्टेशन वातावरणातले बदल सोसतंय. इथं २४ तासाच्या काळात तब्बल १६ वेळा दिवस-रात्र होते.
आता जॉन्सन स्पेस सेंटरमधले आमचे सहकारी आमच्या पुढच्या स्पेसवॉकवर आणि तेव्हा उरलेली दुरुस्ती पूर्ण कशी करायची यावर काम करतायत.
१६ नोव्हेंबर २0१२
आता घरी परतायची तयारी सुरू झाली. आतापर्यंत मी याचा विचारच केला नव्हता. मला अजूनही परत जावंसंच वाटत नाहीये. पण आता तयारी सुरू केलीय कारण इथे एखादी गोष्ट राहिली तर पुन्हा आणता येणार नाही. मला स्पेसमध्ये राहायला खूप आवडतं. माझ्यासारखंच इथे येणार्‍या प्रत्येकालाच आवडतं. तुम्ही इथे येता आणि इथलेच होऊन जाता. एका क्षणाला तुम्ही उभे असता आणि थोड्याशा प्रयत्नात - खाली डोकं वर पाय ! ही जागा भन्नाट आहे. आणि इथून दिसणारा व्ह्यू पाहिलात, तर कोणालाच परत जावंसं वाटणार नाही.
आता तुम्ही विचाराल की मला नेमकं काय पॅकिंग करायचंय? विमानांसारखंच इथेही बॅगेज लिमिट असतं. ठरावीक सामान आणू शकता. पण विमानांपेक्षाही कमी. सोयूझमध्ये फक्त दीड किलो. आम्ही सगळ्यांनी तेवढय़ाच खासगी वस्तू आणल्यायत. त्यामुळे आता तेवढय़ाच परत घेऊन जायच्या आहेत. कपडे, टूथब्रश, टूथपेस्ट, शाम्पूचं पॅकिंग आम्ही करत नाही. आम्ही इथे येतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी इथे असतात. अगदी आमचे स्पेशल शर्ट आणि कार्गो पॅन्टही आमची वाट पाहत असतात. पण आमच्या इतर काही वस्तूंचा मात्र दुसर्‍यांना उपयोग नसतो.
या संपूर्ण ट्रिपमध्ये मी एकच पॅन्ट आणि एक शॉर्टस घातलीय. इथे धूळ नाही, त्यामुळे कपडे मळत नाहीत. पण इक्विपमेंट्सवर काम करताना कधी कधी डाग मात्र लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे कपडे धुता येत नाहीत. आम्ही जुन्या गोष्टी फेकून सरळ नव्या गोष्टी वापरतो. पण पृथ्वीवरच्यासारखे पुन:पुन्हा कपडे मात्र बदलावे लागत नाहीत. 
आमचा मागचा आठवडा एकदम बिझी गेला. आधी कॉम्प्युटर्स बिघडले, मग टॉयलेट ! 
इथे असताना अंतराळवीरांच्या शरीरात वाढ होते आणि मग आमचे सूट्स आम्हाला बसत नाहीसे होतात. अंतराळात पाठीचा कणा प्रसरण पावतो. स्नायूंवरही गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नसतो, त्यामुळे तेही प्रसरण पावतात. त्यामुळे शरीराचा आकार बदलतो. आम्ही आमचे सूट्स घालतानाच ही गोष्ट माझ्या लक्षात आली. सूटमधून डोकं बाहेर काढण्यासाठी मला सगळे स्ट्रॅप्स - पट्टे वाढवावे लागले. तो थोडा घट्ट होतोय - पण झाला. 
नंतर एकदम वाटलं - सोयूझ किती लहान आहे. इथे आलो तेव्हा किती मोठं आणि ऐसपैस वाटत होतं. पण आता या मोठय़ा हॉटेलसारख्या स्टेशनवर राहून लहान वाटायला लागलंय. इथे तुम्हाला नुसतं बसता येत नाही. आईच्या पोटातल्या बाळासारखं झोपावं लागतं. पण असं सगळं असून पण सोयूझ आपलंसं वाटतं. इथे काय काय करायचंय हे जणू आपोआप उमगतं. हीच आमच्या ट्रेनिंगची करामत आहे. फारसा विचारच करावा लागत नाही.. फक्त करत जायचं.
१९ नोव्हेंबर २0१२
सगळं सामान बांधून झालंय. अगदी इथे वापरण्याचा खास चश्मा - ज्याला आम्ही हॅरी पॉटरचा चष्मा म्हणतो, तो ही काढून ठेवलाय. आता उद्या सोयूझमध्ये स्लिपिंग बॅग्स टाकल्या की झालं.
आता पुढच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. सोयूझ व्यवस्थित ऑपरेट करणं. गोष्टींचं महत्त्व कसं आपोआप बदलतं. आता स्टेशनपेक्षा आमचं जास्त लक्ष सोयूझकडे आणि ते पृथ्वीवर नीट उतरवण्याकडे लागलंय. त्यासाठीच्या सगळ्या तपासण्याही आम्ही केल्या. पृथ्वीवर उतरताना करायच्या गोष्टींची रंगीत तालीम केली. यानाची झाल्यावर आता आमची तयारी सुरू. पण त्या आधी स्पेसस्टेशनची काही दुरुस्ती करायची होती. केव्हिन आणि त्याच्या क्रूच्या हाती स्टेशन सोपवताना सगळं व्यवस्थित हवं. इथे आमचा चेंज ऑफ कमांड समारंभ झाला. सूत्रं दुसर्‍या टीमच्या हाती गेली आणि परतायची वेळ झाल्याचं जाणवलं. मागल्या वेळी मी उन्हाळ्यात कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात लॅण्ड झाले होते. यावेळी कझाकिस्तानच्या थंडीत एका कॅप्सूलमधून उतरणार. सूत्रं दुसर्‍यांकडे देण्याचा कार्यक्रम छान झाला. इथे आम्ही सगळे किती वेगवेगळ्या भागांतून आलोय - युरी युक्रेनचा, अकी जपानचा, केविन इंडियानामधून, ओलेग बेलासचा, इगनी सायबेरियाचा आणि मी बोस्टनची. किती वेगळे पण तरी खूप काही समान असणारे आम्ही सर्व जण. रोज एकत्र राहताना अनेक गोष्टींचा एकत्र आनंद घेतला. आमचा क्रू आणि एक्सपिडिशीन ३२ चा क्रू. आम्ही दाखवून दिलं की वेगवेगळं आयुष्य जगणारी, वेगळ्या दृष्टिकोनाची, संस्कृतीची, धर्माची लोकं एकत्र येऊन चांगलं काम करू शकतात.
याच समारंभात आम्ही या नव्या क्रूला काही भेटीही दिल्या. सगळ्यात शेवटी आम्ही आमच्या क्रूचा पॅच आमच्या स्पेसशिपवर लावला. आमच्या आधी येऊन गेलेल्या सगळ्या ३२ जणांचे पॅच इथे आहेत. 
दरम्यान, आता पुन्हा पृथ्वीवर, घरी जायची वेळ झालीय..
शेवटी पृथ्वीच प्यारी.. दुसर्‍या कुठल्या ग्रहाचा मी विचारच करू शकत नाही.
संकलन, अनुवाद : अमृता दुर्वे

मार्मिक’ सुरू करण्याच्या वेळची परिस्थिती...


१९६० सालात आचार्य अत्र्यांच्या वाढदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा आरंभ केला. तत्पुर्वी त्यांनी अनेक ठिकाणी नोकर्‍या केल्या होत्या किंवा वृत्तपत्रासाठी कामही केले होते. त्यांच्याच इतके उत्तम चित्रकला साधलेले धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे त्यांच्या जोडीला होते. त्यांनी प्रकाशक म्हणून जबाबदाली उचलली आणि बाळासाहेब संपादक झाले. तेव्हाचे सिद्धहस्त पत्रकार द. पां. खांबेटे कार्यकारी संपादक होते. ही झाली टीम ठाकरे. पण या सर्व उद्योगाला प्रबोधनकार ठाकरे यांचा आशीर्वाद लाभला होता. आचार्य अत्र्यांपासून एसेम जोशी, कॉम्रेड डांगे आणि थेट शहू महाराजांपर्यंत सर्वांच्या संपर्कात आलेले प्रबोधनकार हे चालतेबोलते विद्यापीठच होते. पुढल्या काळात सेक्युल्रर विचारवंत लेखक म्हणून नावारूपास आलेले डॉ. य. दि. फ़डके; त्याच प्रबोधनकारांना गुरू मानायचे. त्यांनीच युती शासनाच्या कारकिर्दीमध्ये समग्र प्रबोधनकार साहित्य संकलित करुन प्रकाशित करण्याची जबाबदारी पार पाडली. असा डोंगराएवढा माणुस व पिता पाठीशी उभा असताना; ‘मार्मिक’ बाळासाहेबांनी सुरू केला, ती मग मराठी माणसासाठी चळवळच बनत गेली. एका साप्ताहिकाने असे चळवळीचे रूप का धारण करावे? तसे पाहिल्यास त्याच काळात अनेक मराठी साप्ताहिके व नियतकालिके जोरात चालू होती. पण त्यांच्या मर्यादा होत्या. लेखन वाचन व चर्चा यापलिकडे त्यांची झेप नव्हती. नाही म्हणायला दैनिक ‘मराठा’ हे आचार्य अत्र्यांचे दैनिक खास मराठी चळवळीचे केंद्र होते. चळवळ्यांसाठी ‘मराठा’ हे त्याआधीपासूनचे व्यासपीठच होते. मात्र मराठी भाषिकांचे संयुक्त महाराष्ट्र हे वेगळे राज्य स्थापन झाले आणि ‘मराठा’चे स्वरूप काहीसे बदलत गेले होते. त्यामुळे ‘मार्मिक’ला आपले स्थान निर्माण करणे सोपे होऊन गेले. म्हणूनच शिवसेनेकडे येण्यापुर्वी मुळात ‘मार्मिक’ महाराष्ट्राला का आवश्यक झाला होता ते बघायला हवे.तसे पाहिल्यास ‘मराठा’सुद्धा एकटाच नव्हता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र व्हायला धडपडणार्‍या लेखक व पत्रकारांचे आणखी एक वृत्तपत्र त्या काळात तात्पुरता अवतार घेऊन अंतर्धान पावले होते. ‘लोकमित्र’ असे त्याचे नाव. समाजवादी नेते एस. एम. जोशी त्याचे संपादक होते. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारी घेऊ लागली; तेव्हा मराठीमध्ये ‘लोकमान्य’ नावाचे एक प्रमुख दैनिक होते. आजही प्रकाशित होणार्‍या गुजराती ‘जन्मभूमी" दैनिकाचे मराठी भावंड; असे त्याचे स्वरूप होते. पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ केवळ मराठी भाषिक राज्यापुरती नव्हती, तर द्वैभाषिक राज्याच्या विरोधातली होती. द्वैभाषिक म्हणजे आजचा गुजरात व कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचा मिळून जो भूभाग होतो, तेवढे मुंबई राज्य. तिथे मराठी व गुजराती भाषिकांनी एकत्रित गुण्यागोविंदाने नांदावे; असा दिल्लीश्वरांचा आग्रह होता. मात्र तो मराठी विद्वान, साहित्यिक, पत्रकारांना अजिबात मान्य नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाषिक तत्वावर नवी प्रांतरचना करायचा निर्णय झाल्यावर; त्या भूमिकेला नवी उभारी मिळाली. पण त्याच्याही खुप आधीपासूनच साहित्य संमेलन वा पत्रकार संमेलनातून मराठी भाषिक राज्याचे ठराव वेळेवेळी मंजूर केले जातच होते. मात्र जेव्हा हट्टाने गुजरात-मराठी एकच राज्य बनवायचा निर्णय लादला गेला, तेव्हा तो सुप्त विरोध प्रचंड प्रमाणावर उफ़ाळून आला. त्याचीच पार्श्वभूमी ‘लोकमान्य’ दैनिकातील पेचप्रसंगाला लाभली होती. तिथे काम करणारे संपादक किंवा पत्रकार आजच्यासारखे रस्त्यावर उतरून अविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा खांद्यावर नाचवणारे नाचे नव्हते. तर पगार वा नोकरीवर लाथ मारून आपल्या तत्वाशी व विचा्रांशी प्रामाणिक राहू शकणारे आणि त्यासाठी किंमत मोजायची क्षमता अंगी असलेले निव्वळ पत्रकारच होते. त्यातूनच ‘लोकमान्य’चा पेचप्रसंग निर्माण झाला आणि ‘लोकमित्र’ एसेमना सुरू करावा लागला.


‘जन्मभूमी’ व ‘लोकमान्य’ ही दोन्ही दैनिके चालविणारी कंपनी व मालक मंडळी गुजराती होती आणि त्यांचे द्वैभाहिकाला समर्थन होते. अशा परिस्थितीत ‘लोकमान्य’च्या संपादक, पत्रकारांनी आपला मराठी बाणा दाखवत संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या मराठी भूमिकेला पाठींबा देणे व त्याचे समर्थन करणे मालकांना मान्य नव्हते. किरकोळ बातम्यांपुरते तिकडे लक्ष द्यावे. पण संपादकीय भूमिका मात्र द्वैभाषिकाचे समर्थन करणारी असावी असा मालकांचा आग्रह होता. पण संपादकांनी तो झुगारून लावला. आपण दैनिकाचे संपादक आहोत तर त्यातली वैचारिक भूमिका व संपादकीय स्वातंत्र्य आपण सोडणार नाही, ही ठाम भूमिका घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पाठींबा देणारा अग्रलेख ‘लोकमान्य’मध्ये छापून आणला गेला. बहुधा पां. वा. गाडगिळ ‘लोकमान्य’चे तेव्हा संपादक होते (मला आता सगळेच आठवत नाही. कारण मी तेव्हा फ़ारतर आठनऊ वर्षाचा होतो). पण घरातल्या शेजारच्या मोठ्या माणसांच्या चर्चेतून ऐकलेले आठवते. त्या संपादकीय लेखाने त्या वृत्तपत्रात खळवळ माजली. ज्या दिवशी तो अग्रलेख छापून आला; त्याच दिवाशी मालक व पत्रकार-संपादक यांच्यात खटका उडाला. पण आपल्या भूमिकेपासून माघार घ्यायला संपादक तयार नव्हते. अखेरीस मालकाने ‘लोकमान्या’चे प्रकशन थांबवण्याची धमकीच दिली. तर संपादकांनी माघार घेण्याची गोष्ट बाजूला राहिली. ‘लोकमान्य’चे तमाम पत्रकार आपल्या संपादकाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि ‘लोकमान्य’ हे मराठी दैनिक त्या दिवशी बंद झाले. आज आपल्या अविष्कार स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणार्‍या किती पत्रकारांमध्ये अशी नोकरी गमावून तत्वासाठी बेकार व्हायची हिंमत आहे? कोणा शिवसैनिकाने दोन थपडा मारल्या किंवा संभाजी ब्रिगेडवाल्यांनी घराच्या दारावर डांबर फ़ासले, मग हौतात्म्याचा आव आणणारे नाटकी मराठी संपादक; आज स्वातंत्र्यवीर म्हणून मिरवत असतात. त्यापैकी एकाची तरी लायकी त्या ‘लोकमान्य’च्या पत्रकाराच्या पायाजवळ बसण्याइतकी तरी आहे काय?


एका दिवसात मराठी भाषिक राज्य व अविष्कार स्वातंत्र्यावरची गदा यासाठी त्या पत्रकारांवर बेकार व्हायची पाळी आली होती. तेव्हा त्यांना काम मिळावे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बातम्या लोकांपर्यंत वास्तव रुपात पोहोचाव्या; म्हणून एसेम जोशी यांच्या नेतृवाखाली नवे दैनिक सुरू करण्यात आले, त्याचे नाव होते ‘लोकमित्र’. मात्र त्याच्याकडे साधने अपुरी होती; तशीच व्यवस्थाही अपुरी होती. दरम्यान मराठी राज्याच्या मागणीसाठी लढणार्‍या नेत्यांमध्ये नाटककार व साहित्यिक आचार्य अत्रे यांचाही समावेश होता. त्यांचे ‘नवयुग’ साप्ताहिक होते. तर लोकांनी त्यांच्याकडे दैनिक काढण्याचा आग्रह धरला होता. खिशात दिडकी नसताना त्यांनी लोकांकडे वर्गणी मागून दैनिक सुरू करण्याचा पवित्रा घेतला. त्यातून सुरू झाला तो ‘मराठा’. अधिक खाडिलकरांचा ‘नवाकाळ’ होताच. या तीन दैनिकांनी संयुक्त महाराष्ट्राची लढाई उभी केली होती. त्यात मग अनेक लहानसहान व प्रादेशिक मराठी साप्ताहिके व नियतकालिकांनी आपल्याला जमेल तसा हातभार लावला होताच. तेव्हाचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आज प्रत्येक वृत्तपत्र खपाचे आकडे सांगण्यासाठी आटापिटा करत असतात. आपणच किती लोकप्रिय आहोत ते सांगणार्‍या जाहिराती आपल्याच अंकात छापतात किंवा आपल्याच वाहिन्यांवर बोलबाला करीत असतात. पण वृत्तपत्र वा माध्यमावर लोक किती प्रेम करतात, त्याचा उत्तम नमूना म्हणजे ‘मराठा’ हे दैनिक होते. रात्री उशिरा खिळ्याच्या टाइपची जुळणी पुर्ण झाल्यावर छपाई सुरू झालेल्या ‘मराठा"ची छपाई दुसर्‍या दिवशी दुपार उजाडली तरी चालू असायची आणि संध्याकाळपर्यंत ते दैनिक विकले जात असे. कारण मागणी भरपूर असली, तरी आजच्या सारखी झटपट लाखो प्रती छापायची यंत्रणा उपलब्ध नव्हती आणि ‘मराठा’ चालवणार्‍यांना परवडणारी नव्हती.


तर मुद्दा इतकाच, की ‘मार्मिक’चा मराठी माध्यमांच्या जगात उदय झाला त्याची अशी पार्श्वभूमी होती. आधीच मराठीचा विषय व मराठी माणसाच्या न्यायाचा संघर्ष करणारी अनेक नियतकालिके बाजारात उपलब्ध होती. त्यांच्याच मेहनत व संघर्षातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली होती. विविध राजकिय पक्ष व संघटना महाराष्ट्रात होत्या. पण त्यांना मराठी अस्मितेसाठी एकत्र आणायचे व एकत्र लढायला उभे करण्याचे महत्वपुर्ण काम; तात्कालीन मराठी नियतकालिकांनी बजावले होते. या लेखक, पत्रकार, संपादक व बुद्धीमंतांनी मराठी समाजाची अस्मिता अशी काही जागवली व बुलंद बनवली, की मराठी अस्मितेकडे पाठ फ़िरवून राजकारण करणेच अशक्य होऊन बसले होते. त्यामुळेच आपापल्या राजकीय भूमिका व अट्टाहास, तत्वज्ञान, आग्रह बाजूला ठेवून त्या सर्वच राजकिय पक्षांना संयुक्त महाराष्ट्र समिती बनवण्याचे काम हाती घ्यावे लागले. वर्तमानपत्र किंवा लेखणीसह अविष्कार स्वातंत्र्याची ताकद किती अगाध असते; त्याची साक्ष देणारा तो कालखंड होता. त्याचा उदय तरूणपणी बाळासाहेब बघत होते, त्यापासून शिकत होते. कदाचित त्यातूनच त्यांनी आपल्या मनाशी काही खुणगाठ बांधून ‘मार्मिक’ सुरू केला असेल काय?