स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


क्रांतिकारकांचे सेनापती, स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्त्वज्ञ व सक्रिय हिंदू संघटक; क्रियाशील धर्मसुधारक व समाजसुधारक; प्रेरणादायी महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे विचारवंत!

महाराष्ट्रात नाशिकजवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन्‌ सर्जनशील कवित्व लाभलेले हे बालक वयाच्या १० व्या वर्षीच इतिहास आणि धर्मशास्त्रावरील जाडजूड पुस्तके वाचू लागले. १० व्या वर्षी विनायकाने केलेल्या कविता तत्कालीन अग्रणी मराठी वृत्तपत्रात छापून येत असत. मात्र कवीच्या वयावर वाचकांचा विश्र्वासच बसत नसे. सावरकरांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पारतंत्र्य, गुलामी, ब्रिटिश राजवट यांचा थोडाही उपद्रव सावरकरांपर्यंत पोहचला नव्हता. पण...

इतिहासाची पाने वाचत असताना सावरकरांच्या मनात राष्ट्रवाद आकार घेत होता. देशबांधवांबद्दल प्रेम जागृत होत होते. गुरु गोविंदसिंहांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि महाराणा प्रतापांपासून बंदा बैराग्यांपर्यंत सहस्रावधी योद्धयांचे बलिदान त्यांच्या मनावर वेळोवेळी आघात करत होते. उन्मत्त ब्रिटिश सत्तेशी झगडणार्‍या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त सावरकरांना अस्वस्थ करू लागले. त्याच काळात रँडचा वध करून फासावर चढलेल्या चापेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकरांवर फार मोठा आघात झाला. त्याच रात्री देशभक्तीने तळमळलेल्या त्या १६ वर्षांच्या तरुणाने आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली - ‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता-मारिता, मरेतो झुंजेन... जर यशस्वी झालो, तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेन, आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घडेल.’’

पुढचा तरुण सावरकरांचा जीवनपट चित्तथरारक प्रसंगांनी भरलेला आहे. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (१९०५). उच्च शिक्षणाच्या निमित्ताने ते लंडनमध्ये दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या इंडिया हाउसमध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉंब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉंम्बचे  तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

सावरकरांनी आपल्या सळसळत्या व्यक्तिमत्त्वाने व ओघवत्या वक्तृत्वाने इंग्लंड आणि भारतातल्या क्रांतिकारकांना झपाटून टाकले. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना  तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(१९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रांन्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना बेकायदेशीरपणे अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (१९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रांन्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण भारताच्या दुर्दैवाने तसे घडले नाही.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. अंदमानातल्या त्या अंधार्‍या खोलीत हा तेजस्वी बॅरिस्टर किडे पडलेले अन्न खात होता आणि मचूळ पाण्याने तहान भागवत होता. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता  मुजोरपणा  सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारया नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसर्‍या भागात समाजसुधारक सावकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चवळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारावंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत समाजासमोर आलेले दिसतात.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्द केले. हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्नागिरीत केले, ते अतुलनीय आहे. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले आणि त्या विरोधात कार्य केले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाही त्यांनी लावून दिले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रार्येंल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा याची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.

एक थोर साहित्यिक म्हणूनही महाराष्ट्र सावरकरांना ओळखतो. जोसेफ मॅझिनी (इटालियन क्रांतिकारकाचे चरित्र), ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘शिखांचा इतिहास’, ‘माझी जन्मठेप’, ‘सन्यस्त खड्‌ग’ (नाटक), ‘काळे पाणी’, ‘मला काय त्याचे’, ‘हिंदुत्व’, ‘गोमंतकअसे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. जयोस्तुते श्री महन्मंगले’, ‘जयदेव जयदेव जय जय शिवरायाही शिवरायांची आरती; ने मजसि ने परत मातृभूमिला, सागरा प्राण तळमळला - यासारखी अजरामर काव्ये लिहिणार्‍या सावरकरांनी कमला हा काव्यसंगहही लिहिला. १९३८ सालच्या मुंबईतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना सावरकरांनी लेखण्या मोडा, बुंदुका हातात घ्याशस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्रचिंता प्रवर्ततेअसे संदेश तत्कालीन साहित्यिकांना व वाचकांना दिले. भाषाशुद्धीवरही त्यांचा विशेष भर असे. महापौर’, ‘नगरसेवक’, ‘महानगरपालिकाइत्यादी शब्द सावरकरांनीच व्यवहारात आणले.

एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलुंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन कॉंग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अश अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.

सुमारे ६० वर्षे स्वातंत्र्यवीरांनीस्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २२ व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या