वटसावित्री !!!

Posted by Abhishek Thamke on ६:०० म.पू. with No comments
वडाचे झाड तसे पुजनीयच आहे म्हणा ,त्याची पूजा केलीच पाहिजे, कारण ते २४ तास प्राणवायू ऑक्सिजन देते. परंतु सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून सुशिक्षित स्त्रिया जेव्हा त्याला दोरा गुंडाळून पूजा करतात तेव्हा मात्र त्यांच्या भाबडेपणाची व साक्षरतेची कीव करावीशी वाटते !
सत्यवान आणि सावित्री उन्हातून रस्त्याने जात असतांना प्रखर उन्हामुळे त्याला मूर्च्छा आली आणि तो बेशुद्ध होवून खाली कोसळला, सावित्रीने त्याला ओढत-ओढत बाजूच्या वडाच्या झाडाच्या सावलीत आणले. सावलीमुळे त्या सत्यवानाच्या शरीराचे तापमान सामान्य होऊन व त्याला मुबलक प्रमाणत प्राणवायू ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो शुद्धीवर आला आणि सावित्रीने यमाला याचना करून आपला पती परत मिळविला म्हणून आजही अगदी सुशिक्षित स्त्रिया सुद्धा सात जन्मी हाच पती मिळावा ह्याच हेतूने वटसावित्रीला वडाच्या झाडाचे पूजन करतात.
मग त्या सावित्रीचे काय ?
जिने तुम्हाला शिकवून साक्षर करण्यासाठी शेण,माती, चिखल, दगड, शिव्या यांचा मार सहन केला? तो याच तुमच्या भोळ्या भाबड्या अंधश्रद्धा जोपासण्यासाठी का ? त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत बसण्यापेक्षा प्रत्येकीने दरवर्षी एक नवीन वडाचे झाड जर लावण्याचा कार्यक्रम केला असता तर किती बरे झाले असते नाही का?
सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून, मग तो कसाही असो व्यभिचारी असो, की दारुडा असो, रोज दारू पिवून तुम्हाला मरेस्तोवर मारणारा असो तुमच्या आईवडीलासह शिव्या देणारा असो, माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावणारा असो हुंड्यासाठी तुम्हाला छळणारा असो जाळणारा असो कसा ही असो पण सात जन्मी हाच पती लाभो म्हणजेच त्याचे अन्याय अत्त्याचार सोसण्यास एक जन्म अपुरा आहे म्हणून सात जन्मी हाच पती मिळावा का? आणि वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून पूजा करून कधी सात जन्मी तोच पती मिळतो का? कुणाला आजवर
मिळाला आहे का? कुणाला आपला पुनर्जन्म आठवतो का?
Reactions: