स्त्रियांना मिळाला जगण्याचा अधिकार!

Posted by Abhishek Thamke on ३:१८ म.उ. with No comments
आपल्याकडे पूर्वी महिलांना विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच, परंतु जगण्याचाही अधिकार ख-या अर्थाने नव्हता. प्रजासत्ताकाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्यातील योग्यतेनुसार ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा मान मिळवून दिला. विधवांनाही समाजात कोणतेही अधिकार आणि स्थान नव्हतं. परंतु आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनं कोणताही भेदाभेद न मानता, इंदिरा गांधींना पंतप्रधानपद दिलं. याद्वारे जगण्याविषयीचा विस्तृत दृष्टिकोनच घटनेनं आपल्या सर्वाना दिला. काहींना प्रजासत्ताकाचा अर्थही कळत नाही, उलट त्याचा गैरवापर होताना दिसतो. मग अण्णाभाऊ साठेंनी जे म्हटलं होतं, ‘ये आजादी झुठी हैं, देश की सत्ता भुखी हैं!’ ही परिस्थिती आजही तशीच आहे. दारूचे दुष्परिणाम, प्रेमप्रकरणांमधून समोर येणारी हिंसक वृत्ती, तरुणांमधली निष्क्रियता अशा समाजविघातक गोष्टींनी अंत:करण दुखावतं. म्हणून देशभर काही प्रासंगिक विषयांवरही सप्त खंजिरी वादन, गाणी या माध्यमातून माझं प्रबोधन सुरू असतं. क्रिकेटच्या विरोधात मी प्रबोधनाची मोहीमच सुरू केली आहे. क्रिकेटचे सामने भरवण्यापेक्षा, खरी गरज ही वर्षानुर्वष अर्धवट राहिलेले प्रश्न, समस्या, नसलेल्या सेवासुविधा पूर्ण करण्याची, असं मला वाटतं. कायदा कडकच आहे, त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करून घेणारे नालायक आहेत. कायदा आहे म्हणून आसाराम बापू, तरुण तेजपाल आज न्यायालयीन कोठडीत आहेत. धर्माचा किंवा कुठल्याही प्रकारचा धाक आज न उरल्यामुळे बळावत चाललेल्या वाईट वृत्तीतून ही कृत्य घडतात. म्हणूनच घरच्यांचा, मोठ्यांचा धाक हा हवाच!
- सत्यपाल महाराज (सप्तखंजिरी वादक)
Reactions: