२०१४ चे उदारमतवादी भारतरत्न

Posted by Abhishek Thamke on ११:२६ म.पू. with No comments
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना गुणवत्ता, कर्तृत्व आणि राजकीय सोय यांची सांगड घालण्याची पूर्वापार परंपरा पाळत नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदुत्ववादी शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय मदनमोहन मालवीय यांना हा सन्मान जाहीर केला आहे. हिंदुत्वाचा मवाळ सर्वसमावेशक चेहरा आणि 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' असे म्हणणारा आग्रही विचार, अशा दोन्ही प्रवाहांना एकाचवेळी खूष ठेवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित करून केंद्र सरकारने दीर्घकाळच्या जनभावनांचा आदर केला आहे. भारतीय राजकारणाचा इतिहास ज्यांच्या समावेशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे वाजपेयी यांचे नेतृत्व आहे. हिंदुत्ववादी संगोपन असूनही उदारमतवादाचा वारसा त्यांनी जपला. त्यांचे कार्य फक्त जनसंघ वा भारतीय जनता पक्ष यांच्यापुरते कधीच सीमित नव्हते. वाजपेयी नेहमीच पक्ष आणि विचारसरणीच्या भेदांपलीकडे वाटचाल करीत राहिले. आघाडीचे सरकार आणि एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या किंवा समांतर विचारांच्या घटकांना एकत्र बांधून ठेवणारे सरकार पहिल्यांदा यशस्वीपणे चालवले ते वाजपेयींनी. ते हिंदुत्ववादी आहेत, यात कधीच शंका नव्हती; मात्र त्याचा हिंस्र आविष्कार कधीच त्याच्या वागण्या-बोलण्यात आला नाही. देशाचे वैविध्य समजून समन्वय साधणारे त्यांचे राजकारण भाजपला देशभर पोचवण्यात मोलाचे ठरले. वाजपेयी संसदेत काँग्रेसच्या सरकारचे वाभाडे काढताना सत्ताधारीही ऐकत राहात. अपवादात्मक असा संसदपटू वाजपेयींच्या रूपाने संसदेने पाहिला आहे. तेच वाजपेयी नेहरूंच्या निधनानंतर ‘सूर्यास्त तर झाला; आता ताऱ्यांच्या प्रकाशात वाट शोधूया असे सहजपणे बोलून गेले. पाकिस्तानला नमवणारे युद्ध जिंकणाऱ्या इंदिरा गांधींचे वर्णन दुर्गा असे करताना त्यांना पक्षाभिनिवेश शिवला नाही. नेहरूंनीच ज्यांच्यात भविष्यातला पंतप्रधान पाहिला ते वाजपेयी भाजप सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान बनणे स्वाभाविक होतं. त्यांनी कारगिलमधल्या पाकिस्तानी विश्वासघाताला तोंड दिले; तसेच अणुचाचण्या करून भारतीय उपखंडातील संरक्षण सिद्धतेची समीकरणे कायमची बदलूनही टाकली. महामार्गाचा देशव्यापी सुवर्ण चतुष्कोन साकारणारा महाप्रकल्पही त्यांच्या कारकिर्दीतलाच.

वाजपेयींनीही प्रारंभी पत्रकारिता केली, कविता केल्या आणि लखनौतील मुशायऱ्यांनाही हजेरी लावली. त्यांचे असे बहुपैलू कर्तृत्व आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुढाकाराने जनता पक्षात संघ विलीन झाला आणि पुढे सत्ता आल्यावरही जनता पक्षात झालेल्या फाटाफुटीनंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना संघपरिवाराने केली, तेव्हा अध्यक्षपदावरून बोलताना वाजपेयींनी ‘गांधीवादी समाजवादाचा नारा दिला होता! पण हे नाणे राजकारणात चालले नाही आणि संघपरिवाराने लालकृष्ण अडवानी यांना पुढे करून अयोध्येत ‘बाबरीकांड घडवून आणले, तेव्हा वाजपेयी त्या घडामोडींपासून काहीसे दूरच होते. समन्वयवादी मध्यममार्ग हे वाजपेयीच्या राजधर्माचे सूत्र राहिले. पाकिस्तानशी निर्णायक समझोता करण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले, तरी इतिहासाला दखल घ्यायला लावणारे आहेत. गुजरातच्या दंगलीने विषण्ण झालेल्या वाजपेयींनी जाहीरपणे गुजरात सरकारला राजधर्माची आठवण करून दिली. वाजपेयींचे हेच मोठेपण आहे. एकेकाळी अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर अवघा देश गाजवणाऱ्या वाजपेयींना आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या वाणीनेच दगा द्यावा, यापरते दुर्दैव दुसरे नाही. राजकारणाच्या धबडग्यात राहूनही आपल्या कवी कलंदर वृत्तीसह संपन्न आयुष्य जगलेले वाजपेयी नव्वदीत पदार्पण करताना ‘भारतरत्नने सन्मानित झाले आहेत.


वाजपेयींबरोबरच हा सन्मान स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी आणि शिक्षणतज्ज्ञ पंडित मदनमोहन मालवीय यांनाही मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. पंडितजींच्या कार्याचे मोलही अनमोल आहे. त्यांनी स्थापन केलेल्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे जगजीवन राम यांच्यापासून सेतू माधवराव पगडी यांच्यापर्यंत देशभरातील अनेक अग्रणी स्नातक होते आणि ते विद्यापीठ हेच मालवीयजींचे कायमस्वरूपी स्मारक आहे. त्यांच्या पुरस्काराच्या निमित्ताने मरणोत्तर असा पुरस्कार द्यावा का, हा विषय काहींनी नव्याने चर्चेत आणला आहे. पुरस्काराचे निकष कसे ठरवावेत, यावर स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते; मात्र मालवीय यांच्या कामगिरीविषयी दुमत असायचे कारण नाही. मालवीय आणि वाजपेयी यांच्या कारकिर्दीत काळाच्या दृष्टीने मोठे अंतर असले, तरी त्यांची वैचारिक बैठक एकाच मुशीतून तयार झालेली होती. मालवीय यांनी आपले समाजकारण आणि राजकारण हे काँग्रेसच्या दुसऱ्याच म्हणजे १८८६ मध्ये झालेल्या अधिवेशनास उपस्थित राहून सुरू केले आणि वाजपेयींची उभी हयात काँग्रेसविरोधातील राजकारण करण्यात गेली असली, तरी दोघांची मानसिक जडणघडण एकाच म्हणजे आर्य समाजाच्या वैचारिक परंपरेतून तयार झाली. मालवीय यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात काँग्रेसमधून बाहेर पडून आपले जीवन शैक्षणिक कार्याला अर्पण केले. वाजपेयींप्रमाणेच त्यांनीही सुरवातीला काही काळ पत्रकारिता केली होती. सायमन कमिशनविरोधातील निदर्शनात ते सहभागी होते. निधनानंतर सहा दशकांनीही स्मरणात राहिलेले त्यांचे काम म्हणजे त्यांनी स्थापन केलेली बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हेच होय. या दोघांच्या सन्मानामुळे ‘काल के कपोल पर लिखता मिटाता हूँ... गीत नया गाता हूँ...’ हे वाजपेयींचे शब्द सहजपणे आठवतात.
Reactions: