''हॅपी जर्नी " (अ फिल्म बाय सचिन कुंडलकर) ''थोड़ी खट्टी… थोडी मिठी… ''

भावाबहिणीच्या नात्यावर मराठीत आजवर असंख्य चित्रपट निघाले असतील. पण ते सर्व चित्रपट हे घराच्या चार भिंतीमध्ये हुंदके देत बंदिस्त होते. सचिन कुंडलकरचा ''हॅपी जर्नी " मात्र याला अपवाद ठरतो. भावाबहिणीच्या हळव्या, मोकळया ढाकळ्या मैत्रीपूर्ण नात्यावर आधारित असलेला सदर चित्रपट आजच्या काळाची गरज ओळखून घराच्या चार भिंतीं भेदत थेट 'चार चाकीच्या' (छोटी मोटारगाडी) आश्रयाला गेला आहे. तो आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ पाहतोय. ''हॅपी जर्नी " चे सादरीकरणातील हे 'वेगळेपण' नक्कीच दखलपात्र असंच आहे नि त्यासाठी सचिन कुंडलकरला धन्यवाद दयायला हवेत.

सदर सिनेमा हा भावाबहिणीच्या नात्यावर असला तरी त्याची भाषा, भावाबहिणीतील हळवं, निखळ मैत्रीपूर्ण नातं आजच्या तरुणाईच्या भावेल असंच आहे. त्यातंच ताईच्या (जानकी) भूमिकेत असलेली गोड,बिनधास्त, थोडीशी बोल्ड प्रिया बापट तर आजच्या तरुणाईची फेवरेटच आहे. त्यातच तिच्या मोठा दादाच्या (निरंजन) भूमिकेत असलेल्या अतुल कुलकर्णीची तिच्याशी जुळलेली केमिस्ट्री यामुळे ''हॅपी जर्नी "अर्थातच प्रेक्षकांना भावतो. पण ''हॅपी जर्नी" पाहून प्रेक्षक पार भारावून वैगेरे अजिबात जात नाहीत. कथानकाची सरळसोट मांडणी, सुरुवातीलाच सिनेमा एकदा घराच्या चार भिंती भेदून बाहेर पडल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा त्याचे घरात घुटमळणे, भावाबहिणीचे नाते फुलू देण्याअगोदरच पुढील व्यक्तिरेखेची (जानकीचा प्रियकर अजिंक्य~ सिध्दार्थ मेनन) कथानकात होणारी (खरं तर अडसर वाटणारी) एन्ट्री, सहकलाकार पल्लवी सुभाषचा अतिशय सुमार दर्जाचा (खरं तर प्राथमिक स्तरावरचा अभिनय), दिग्दर्शकाचा तिची नि निरंजनमधील प्रेमकहाणी फुलवण्याचा तोकडा प्रयत्न, त्या प्रयत्नामुळे जानकी नि निरंजन या भावाबहिणीतील फुलू पाहणाऱ्या नात्याला खोडा बसणं… या सर्व कारणांमुळे ''हॅपी जर्नी" चा प्रवास सुखकर न होता अधेमधे बऱ्याचदा रेंगाळतो, भटकतो नि कंटाळवाणा सुद्धा होतो.

''हॅपी जर्नी " चा ट्रेलर दाखवताना जी गोष्ट दिग्दर्शकाने लपवली होती, तिचा 'पर्दाफाश' मात्र तो चित्रपटाच्या सुरुवातीलाच करून मोकळा होतो! 
कथा सांगताना दिग्दर्शकाने दाखवलेल्या या 'निष्काळजीपणामुळे' आपला चांगलाच भ्रमनिराश होतो नि मग आपल्याला ''हॅपी जर्नी" च्या पुढील प्रवासाविषयी काळजी वाटू लागते. त्यातच परवा मी जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक Mohsen Makhmalbaf यांचा 'GABBEH' हा सुंदर चित्रपट पाहिला असल्याने त्यातील अगदी साधे सरळ असलेलं कथानक उलगडताना दाखवलेल्या चातुर्यामुळे तो चित्रपट शेवटपर्यंत आपलं कुतूहल कायम ठेवत आपली उत्सुकता ताणतो. खरं तर ते 'कुतूहलच' त्या सामान्य कथेला सौंदर्य प्राप्त करून जातं. इथे मात्र दिग्दर्शकाने सुरुवातीलाच रहस्यभेद केला असल्याने ते कुतूहल नाहीसं होतं. बरं यापुढे आपली नि जानकीची सुद्धा अशीच इच्छा असते कि निरंजनने पुढील काही दिवस घरापासून दूर राहत फक्तं निसर्गाच्या सानिध्यात तिच्यासोबत वेळ घालवाण्यासाठी ''हॅपी जर्नी" ला सुरुवात करावी. त्यासाठीच तर त्यांच्या दिमतीला जानकीची आवडती मोटारगाडी होती ना ?
पण इथे सुद्धा सदर चित्रपटलेखक/दिग्दर्शक सचिन कुंडलकर निरंजनला त्याच्या घरीच घुटमळत ठेवतो. मग त्या गाडीचे नक्की प्रयोजन काय ???

फक्तं दिवसा जानकीसोबत गावात चक्कर मारणे नि रात्री शहाण्या बालकाप्रमाणे घरी परतणाऱ्यामुळे, घरी आई वडिलांसोबतच्या प्रसंगामुळे त्या दोघा भावाबहिणीत फुलू पाहणाऱ्या नात्यात वारंवार अडथळा येत राहतो. हे कमी कि काय म्हणून कथेत लगेच जानकीचा प्रियकर अजिंक्यला घुसडण्याची लेखक/ दिग्दर्शक घाई करतो. त्यामुळे त्या दोघा बहिणभावातील नाते फुलण्यास अवधीच मिळत नाही. त्यासाठी अजिंक्यला मध्यंतरानंतर कथेत आणायला हवे होते.

त्यातच मग उत्तरार्धानंतर निरंजन नि त्याच्या मैत्रिणीमधील (पल्लवी सुभाष) प्रेमकहाणीसाठी दिग्दर्शकाने बराच वेळ वाया घालवला आहे. त्यामुळे जानकी नि निरंजनमधील भावाबहिणीचे नाते काही काळ दुर्लक्षित होते. गंमत म्हणजे आपल्या बहिणीच्या इच्छेकडे दुर्लक्ष करणारा निरंजन आपल्या प्रेमिकेला पळवून नेण्यासाठी मात्र जानकीच्या आवडत्या मोटरगाडीचा वापर करतो! अर्थात त्यांच्यासोबत जानकीही असतेच. नव्हे तीच त्याला त्यासाठी प्रेरित करते. त्यामुळे उतरार्धानंतर खऱ्या अर्थाने ''हॅपी जर्नी " ला सुरुवात होते असे म्हणणे योग्य ठरेल!

कथानकातील कमकुवतपणा प्रिया बापट नि अतुल कुलकर्णी यांच्या सुंदर अभिनयामुळे थोडाफार झाकला जातो. प्रिया बापटच्या प्रगल्भ अभिनयाची झलक याअगोदरच 'काकस्पर्श' मधे आपल्याला दिसली होती. पण माझ्या मते त्याची मराठी फिल्म इंडस्ट्रीने म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. अतुल कुलकर्णीचा नेहमीप्रमाणेच सयंत, समंजस अभिनय. पल्लवी सुभाषने मात्र मॉडेल्सचा अभिनयाशी तिळमात्र संबंध नसतो (काही अपवाद असतीलही) याची आपल्या सुमार अभिनयाने खात्री पटवून दिली. सुहिता थत्ते नि माधव अभ्यंकर यांनी आपआपली कामे ठिक केली असली तरी मुळातच त्यांना चित्रपटात जास्त वाव नाहीये. मराठी प्रायोगिक रंगभूमी गाजवत असलेला 'सिध्दार्थ मेनन' हा युवा अभिनेता वयाने नि शरीराने खूप लहान वाटतो. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे कौतुक वैगेरे वाटण्याऐवजी कधी कधी तो चेष्टेचा विषय बनतो. ('एकुलती एक' मधे याचा अनुभव आला होता)

''अन्न, वस्त्र,निवारा नि वायफाय मला लागतंच '' हे असे आजच्या तरुणाईला साजेसे ,तजेलेदार संवाद प्रिया बापटच्या तोंडी अगदी शोभून दिसतात. नव्हे ती या अशा संवादाद्वारे आजच्या या तरुणाईचे एक प्रकारे प्रतिनिधित्वच करते! 
बाकी चित्रपटाचे संगीत ठिक असले तरी लक्षात राहणारे वा ठेका धरायला लावणारे अजिबात नाही.

असो. ''हॅपी जर्नी " ची एक गंमत आहे. चित्रपट बऱ्याच वेळेला दिग्दर्शकाच्या हातून सुटतो पण प्रेक्षक मात्र शेवटपर्यंत त्याच्याशी 'कनेक्ट' राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो !
नि याचे क्रेडीट मी अर्थातच प्रिया बापटला देईल. So, प्रिया बापटसाठी ''हॅपी जर्नी " एकदा अनुभवायला हरकत नाही.

~ कल्याण 
(नोव्हेंबर २९, २०१४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या