'मंगल'कार्य सिद्धिस

Posted by Abhishek Thamke on १०:३१ म.पू. with No comments
भारताच्या अवकाश कार्यक्रमाची "मंगल‘ प्रभात बुधवारी झाली. पहिल्याच प्रयत्नात "मंगळयान‘ मंगळाच्या कक्षेत पोचवून भारतीय शास्त्रज्ञांनी नवा इतिहास लिहिला. अमेरिका, रशिया, जपान, चीन या महासत्तांना जी गोष्ट पहिल्याच प्रयत्नात साध्य झाली नाही, ती गोष्ट भारतीय शास्त्रज्ञांनी साध्य केली अन्‌ प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा आशियातील पहिलाच देश ठरला आहे. या यशामुळे अवकाश क्षेत्रातील नवी ताकद म्हणून भारत पुढे आला आहे. 

भारताच्या मंगळ मोहिमेची सुरवात गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी झाली होती. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत मंगळयान (मार्स ऑर्बिटर मिशन) पृथ्वीभोवती 250 किलोमीटर बाय 23 हजार 550 किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आले. मंगळाला गवसणी घालण्याचा हा पहिला टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) लीलया पार केला. सुमारे 300 दिवसांच्या प्रवासानंतर व सुमारे सहा कोटी किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर बुधवारी सकाळी वेग कमी करून योग्य कक्षेत नेण्यासाठी मंगळ यानाचे इंजिन 7 वाजून 17 मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आले.

मंगळयानापासून पृथ्वीपर्यंत संदेश पोचण्यासाठी सुमारे 12 मिनिटांचा कालावधी लागत आहे, त्यामुळे प्रत्यक्ष इंजिन सुरू झाल्याचा संदेश 7 वाजून 29 मिनिटांनी मिळाला. हा संदेश मिळताच येथील नियंत्रण कक्षात असलेल्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. यानाचे काम पूर्णपणे व व्यवस्थित सुरू असल्याचे ते निदर्शक होते. पुढील 24 मिनिटेही निर्णायक होती. याच काळात यानाचा वेग प्रतिसेकंद 22.3 किलोमीटरवरून 4.2 किलोमीटर प्रतिसेकंदापर्यंत आणण्यात येणार होता. सुमारे आठ वाजता यानाकडून संदेश आला आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थापित करण्यात आल्याचे "इस्रो‘ अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी जाहीर केले. हे इंजिन सुरू होण्यात अडचण निर्माण झाली असती, तर पर्यायी योजना तातडीने कार्यान्वित करावी लागली असती. त्यानुसार आठ थ्रस्टर्सच्या मदतीने यानाला मंगळाच्या कक्षेत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे लागले असते. मात्र नेमून दिलेल्या आज्ञांप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया झाल्याने शास्त्रज्ञांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

"इस्रो‘तील संशोधकांची ही कामगिरी पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नियंत्रण कक्षात उपस्थित होते. अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) सोडलेले "माविन‘ यानही दोन दिवसांपूर्वीच मंगळाच्या कक्षेत स्थिर झाले आहे. मंगळयान व "माविन‘ या दोघांची उद्दिष्टे साधारण सारखीच आहेत. भारताच्या या कामगिरीबद्दल "नासा‘नेही अभिनंदन केले आहे. 

भारताच्या या मंगळ मोहिमेला इतर देशांच्या मोहिमांच्या तुलनेत खूपच कमी खर्च आला आहे. केवळ 15 महिन्यांच्या तयारीनंतर अंतराळात सोडलेल्या मंगळयानाचा खर्च सुमारे 450 कोटी रुपये आहे. जगभरातील विविध देशांनी मंगळावर 51 मोहिमा आखल्या. त्यापैकी केवळ 21 यशस्वी झाल्या. या यशस्वी देशांच्या पंक्तीत भारत आता जाऊन बसला आहे. 

काय करणार मंगळयान? 
पुढील सहा महिने मंगळयान तेथील वातावरणाचा अभ्यास करणार आहे. तसेच तेथील वातावरणात मिथेन वायू आहे का, याचाची शोध घेणार आहे. त्याचबरोबर तेथे कधी काळी पाणी होते का, याचाही शोध घेतला जाणार आहे. 

‘क्‍युरिऑसिटी‘कडूनही अभिनंदन 
"नासा‘ची "क्‍युरिऑसिटी‘ ही बग्गी (रोव्हर) सहा ऑगस्ट 2012 रोजी मंगळावर उतरली होती. या बग्गीनेही मंगळयानाशी संपर्क साधून अभिनंदन केले आहे. "नमस्ते, मार्स ऑर्बिटर! पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान स्थापित केल्याबद्दल "इस्रो‘चे अभिनंदन,‘ असा संदेश "क्‍युरिऑसिटी‘ने पाठविला आहे. यावर "मार्स क्‍युरिऑसिटी संपर्कात राहा. मी जवळच असेन!‘ असा अभिनंदनाचा स्वीकार करणारा संदेश "मंगळयाना‘च्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आला. 

अभिमानास्पद क्षण : मनमोहनसिंग 
"देशाच्या दृष्टीने हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. मंगळ मोहिमेशी संबंधित प्रत्येकाचे हार्दिक अभिनंदन. "मंगळयान‘ प्रकल्पाची सुरवात केलेल्या सरकारचा एक भाग असल्याची भावना अभिमानास्पद आहे,‘‘ अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली आहे. 

भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्या कामगिरीमुळे पूर्वजांचा सन्मान केला आहे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मानवाच्या कल्पनाशक्तीपलीकडची कामगिरी आपण केली आहे. आजच्या यशामुळे आपल्यामध्ये अधिक जोश, उत्साह निर्माण होवो. आता आणखी उत्तुंग ध्येय आपण आपल्यासाठी निश्‍चित करूया. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 
Reactions: