रितेश देशमुखचं मराठी चित्रपटात 'लई भारी' पदार्पण...!!

माझा पहिला हिंदी चित्रपट पाहण्यासाठी वडील विलासराव देशमुख उपस्थित होते. मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले याचा त्यांना खूप आनंद झाला होता. आता माझा पहिलाच मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि तो चित्रपट पाहण्यासाठी माझे वडील नसले तरी त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत, असे भावपूर्ण उद्‌गार अभिनेता रितेश देशमुख याने काढले. 

"लय भारी‘ या मराठी चित्रपटाद्वारे रितेश मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाची निर्मिती जितेंद्र ठाकरे, शालिनी ठाकरे आणि अमेय खोपकर यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. या चित्रपटाचा "फर्स्ट लूक‘ आणि "म्युझिक लॉंच‘ सोहळा गोरेगाव येथे झाला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील तसेच राजकारणातील मान्यवर उपस्थित होते. रितेश म्हणाला, की माझा पहिलाच हिंदी चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा मला जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा अधिक आनंद आता झाला आहे. कारण माझा पहिलाच मराठी चित्रपट येत आहे. मराठीसाठी मी स्वतःला "न्यूकमर‘ समजतो. या चित्रपटात काम करीत असताना चित्रपटाच्या टीमने मला सांभाळून घेतले, तसेच आता मायबाप प्रेक्षकांनीही सांभाळून घ्यावे. हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपटात काम करण्याचा अनुभव निश्‍चितच सुखद होता. निशिकांत कामतबरोबर काम करण्याची इच्छा माझ्या मनात होती. आता या चित्रपटाद्वारे ती पूर्ण झाली आहे. 

संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटातील संगीताबद्दल माहिती दिली. "नटरंग‘ चित्रपटातील संगीत लोकप्रिय ठरले होते. या चित्रपटातील संगीतही तेवढेच, किंबहुना त्यापेक्षाही लोकप्रिय ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मध्यंतरी आम्ही हिंदी चित्रपटांत गुंतलो होतो. त्यानंतर अन्य काही कामांत व्यस्त होतो. आता पुन्हा मराठीकडे वळलो आहोत, असे ते म्हणाले. निर्माते जितेंद्र ठाकरे म्हणाले, की साजिद नाडियादवाला यांनी ही कथा आम्हाला ऐकविली. त्यानंतर आम्ही याच कथेवर चित्रपट काढायचा असे ठरवले.