पत्नीभयास्तव सोडली सिगारेट: ओबामांची कबुली!

बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा
पतीच्या सवयी बदलण्यात पत्नीचा मोठा वाटा असतो, या विधानाला "जगातील सर्वांत सामर्थ्यवान व्यक्ती' मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हेदेखील अपवाद नाहीत. सिगारेट हा बराक ओबामा यांचा "वीक पॉईंट' मानला जातो. पण गेल्या सहा वर्षांत त्यांनी एकही सिगारेट ओढलेली नाही. यामागे "बायकोची भीती' हे कारण असल्याचे बराक यांनी अनौपचारिक संभाषणात मान्य केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अधिकाऱ्याशी अनौपचारिक चर्चा करताना बराक ओबामा यांनी हे वक्तव्य केले; पण नेमका यावेळी त्यांच्यासमोरील मायक्रोफोन सुरू राहिला आणि हे संभाषण ध्वनिमुद्रित झाले.

त्या अधिकाऱ्याने धूम्रपान सोडले की नाही, याविषयी बराक यांनी चौकशी केली. त्यावर त्या अधिकाऱ्याने बराक यांच्या सिगारेट प्रेमाविषयी विचारले. "गेल्या सहा वर्षांत मी सिगारेट ओढलेली नाही. कारण मी माझ्या बायकोला घाबरतो..' असे उत्तर बराक यांनी दिले.

2008 मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ओबामा यांची धुम्रपानाची सवय व ती सोडण्याचे प्रयत्न, चर्चेचा विषय झाला होता. अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या वर्षी धुम्रपानाची सवय "95%' सुटल्याचे ओबामा यांनी सांगितले होते. ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा या सार्वजनिक आरोग्य मोहिमेबद्दल आग्रही असून आपल्या पतीच्या धुम्रपानाच्या सवयीबद्दल त्यांनी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली आहे!
स्त्रोत : eSakal.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या