अँग्री बर्डस्‌ची धमाल आता टीव्हीवरही"अँग्री बर्डस्‌'च्या गेमने जगभरात धमाल उडवून दिलेली असताना हा रागीट पक्षी आता टीव्हीवरही कमाल दाखविणार आहे. अँग्री बर्डस्‌चे जनक असलेल्या रोव्हिओ कंपनीने "अँग्री बर्डस्‌ टून्स'ची निर्मिती केली असून, काही वाहिन्यांवर ही मालिका दाखविण्यात येत आहे. 

विविध खासगी वाहिन्यांबरोबरच व्हिडिओ ऑन डिमांडवर अँग्री बर्डस्‌चे ऍप्लिकेशन असलेल्या स्मार्टफोन आणि टॅबलेटवर चाहत्यांना ही मालिका पाहता येणार आहे. ऑस्ट्रेलियात "फॉक्‍स एट', इंडोनेशियात "एएनटीव्ही', भारतात "कार्टून नेटवर्क' आणि फिनलंडमध्ये "एम टीव्ही थ्री ज्युनोरी' आणि "एम टीव्ही थ्री' या वाहिन्यांवर अँग्री बर्डस्‌ची धमाल पाहता येईल. 2016 मध्ये अँग्री बर्डस्‌वर थ्रीडी चित्रपट प्रदर्शित करण्याची योजनाही कंपनीने आखली आहे. 

रोव्हिओ ऍनिमेशनचे प्रमुख नीक डोरा यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिका तयार करण्याचे नियोजन केले होते. कार्टून मालिकेबद्दल डोरा यांनी आनंद व्यक्त करीत श्रोत्यांना अँग्री बर्डस्‌मधील पात्र कार्टूनरूपात पाहताना नवा अनुभव मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. ही मालिका तयार करताना कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे त्यांनी नमूद केले. अँग्री बर्डस्‌ची 52 भागांची मालिका असणार असून, ती वर्षभर सुरू असेल. मोबाईलवर सध्या अँग्री बर्डस्‌च्या अप्लिकेशनला सर्वाधिक मागणी आहे. आजच्या दिवसअखेरपर्यंत जगभरात 1.7 अब्ज वेळेस अँग्री बर्डस्‌चे ऍप्लिकेशन डाऊनलोड झाले आहे. अँग्री बर्डस्‌ कपडे, खेळणी, गेम्स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मीडिया पार्टनर, अँग्री बर्डस्‌च्या विविध वस्तूंना जगभरातून मागणी आहे. कंपनीचा ब्रॅंड अँग्री बर्डस्‌ हा श्रोत्यांच्या निखळ मनोरंजनाचे आगार आहे, असे रोव्हिओचे सीईओ मायकल हेड यांनी म्हटले आहे.

अवघे गाव झाले शाळा, गावाचे रस्ते झाले फळा!

प्राथमिक शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अमलात आणून सरकारने शिक्षणाचा प्रवाह खेडोपाडी पोहोचविला. परंतु, एका छोट्याशा आदिवासी वस्तीत येथील उपक्रमशील शिक्षक विठ्ठल राठोड यांनी आपल्या अभिनव उपक्रमाने विद्यार्थ्यांसाठी शिक्षण चौकाचौकांवर, रस्त्यारस्त्यांवर, वीजखांबांवर, घरांच्या भिंतींवर, गावातील झाडांवर अशा अनेक ठिकाणी पोहोचविले. 


घाटंजी तालुक्‍यातील मारेगाव या शंभर टक्के आदिवासी व दारिद्य्ररेषेखालील गरीब वस्तीतील मुले "आज खेळता खेळता शिक्षण, शिकता शिकता खेळणे', अशा प्रकारच्या शिक्षणमयी वातावरणात वावरताना दिसत आहेत. सामान्यत: दूरदर्शनवरील जाहिरातींचा बालमनावर लवकरच प्रभाव पडतो. हाच मुद्दा हेरून राठोड यांनी विविध शैक्षणिक जाहिरातीच गावातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत लावलेल्या आहेत. 
काना-मात्रायुक्त, स्वर चिन्हयुक्त, शब्दांचे चार्टस, सोपी वाक्‍ये, छोटेछोटे संवाद, गणितातील विविध संकल्पना, नाणी व नोटा, फळांची इंग्रजीतील नावे, प्राणी व पक्षी यांसारख्या अनेक प्रकारच्या फलकांनी गावातील सारे रस्ते, चौक भरभरून गेलेले आहेत. राठोड यांचा उत्साह बघून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नैताम, ग्रामपंचायत सदस्य बुधाराम दडांजे, अरुण अरबट, रंजना नगराळे यांनी सहकार्य दिले. गावात लावण्यात आलेल्या शैक्षणिक फलकांचा खर्च पालकांनी स्वयंस्फूर्तीने केलेला आहे. या प्रकल्पात शिक्षिका संजीवनी मालके यांचा मोलाचा वाटा आहे. आज संपूर्ण गावच शाळा बनलेले असून, गावातील रस्ते जणुकाही फळेच बनलेले भासतात. 
सामान्यत: विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ घरी, गावात खेळण्यातच जात असतो. या उपक्रमामुळे विद्यार्थी खेळताना शिक्षण घेत आहेत व शिक्षण घेता घेता खेळतही आहेत. याआधीही विठ्ठल राठोड यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम आपल्या शाळेत राबविलेले आहेत. ज्याप्रमाणे विद्यार्थी दैनिक उपस्थिती वाढविण्याकरिता मोबाईल बस या उपक्रमाची दखल सह्याद्री वाहिनीने घेतलेली होती, त्याचप्रमाणे टू डेज स्टार, उपस्थिती फलक, इंग्रजी भाषेची प्रयोगशाळा असे नानाविध उपक्रम आजही शाळेत सुरू आहेत. 
अशा उपक्रमाची दखल घेत त्यांना महात्मा फुले, राज्य पुरस्कार आणि तालुकास्तरावर उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे मारेगाव या शाळेला साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर हरितशाळा पुरस्कार, सप्ततारांकित शाळा पुरस्कार, उत्कृष्ट पटनोंदणीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विठ्ठल राठोड यांच्या या उपक्रमाचे कौतुक गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके, विस्तार अधिकारी रामकृष्ण पार्लावार व केंद्रप्रमुख पी. एन. इंगळे यांनी केले