बदल तुमच्याच हातात!


हॅल्लो फ्रेंडस, 

तुम्हा तरुणांची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितेय? तुमचं एखाद्या घटनेबद्दल बेधडक मत मांडणं. तुम्हाला एखाद्या घटनेबद्दल मत मांडावसं वाटतं. आणि तसं तुम्ही बिनधास्त मांडताही. भीती, संकोच जणूकाही तुम्हाला माहीतच नाही. सोशल नेटवर्किंग साइट्सवर तुम्ही ज्या धाडसाने मतं मांडता त्याच धाडसाने चारचौघांसमोरही उभे राहता. ही गोष्ट जास्त कौतुकास्पद आहे. तुमची आणखी एक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. तुमची पिढी अत्यंत हुशार आणि स्मार्ट आहे. समाजात एखादी चुकीची घटना घडताना दिसत असेल तर त्याविरुद्ध तुम्ही एकत्र येऊन लढता, आवाज उठवता. करिअरच्याबाबतीत तुमच्यात कितीही स्पर्धा दिसत असली तरी अयोग्य घटनेविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध उभे राहताना तुमच्यातही ही एकी प्रकर्षाने दिसून येते. तुमची ही जिद्द वाखाणण्यासारखी आहे. अलीकडेच दिल्ली बलात्कार प्रकरणाविरुद्ध झालेल्या आंदोलनामध्ये हीच जिद्द जाणवली. त्या पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी तुम्ही एकत्र येऊन लढलात. स्त्री-पुरुष या भेदभावावर बोलायला लागलात. तुमच्यात हिरीरीने होणाऱ्या अशा चर्चा, लढा मला जास्त भावतो. 

मुळात स्त्री-पुरुष असा भेदभाव का करावा हेच मला कळत नाही. शास्त्रीयदृष्ट्या हा फरक असला तरी आज दोघेही समान काम करतात. आज तुम्ही अनेक ठिकाणी एकत्र काम करता. त्यामुळे करिअरचे कसे आणि किती पर्याय आहेत हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. पुरुषांना जितके करिअरचे पर्याय खुले आहेत तितकेच स्त्रियांनाही आहेत. खरंतर जेवढी क्षमता स्त्रियांमध्ये आहे तितकी पुरुषांमध्ये नक्कीच नाही. स्त्री ही एकावेळी अनेक काम करते. ती घर, संसार, मुलं सांभाळणं, ऑफीसची जबाबदारी पार पाडणं, ऑफीसमध्ये असतानाच दुसरीकडे घराकडेही लक्ष देणं असं सगळं ती एकाच वेळी करत असते. इतकी शक्ती, ताकद पुरुषांमध्ये नक्कीच नाही. 

रात्री बाहेर फिरु नकोस, एकटीने कुठे जाऊ नकोस असं अनेकींना वारंवार सांगितलं जात असेल. पण, मला हे पटत नाही. दिल्ली ' सेफ ' नाही असं वारंवार म्हटलं जातं, पण काही मूठभर अमानुष लोकांमुळे शहराला दोष का द्यावा? त्यापेक्षा कारवाई करा आणि स्वसंरक्षणासाठी सिद्ध व्हावं. आपल्या कायद्यातल्या पळवाटा, संथ न्यायप्रक्रिया त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी खूप वेळ लागतो. आपल्या कायदा आणि न्याय व्यवस्थेत शिस्तीची अत्यंत गरज आहे. यामुळे गुन्हेगारांचं मात्र फावतंय. आपलं कोण वाकडं करणार? हा त्यांचा समज मोडून काढला पाहिजे. शिक्षा तर हवीच तीही लवकरात लवकर. आणि यासाठी तुम्हीच पावलं उचलाल याची मला खात्री आहे. 

तुमचा आत्मविश्वास, एकी, जिद्द या सगळ्याचा इथे फायदाच होईल. मी स्वतः तरुण असल्यामुळे तुम्हाला रिलेट करते. तुमची विचारपद्धती, विशिष्ट गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन या सगळ्याशी मी सहज जोडली जाते. तुमच्या कुठल्याही उपक्रमात मी स्वतःला बघते. तुमच्यात अफाट शक्ती आहे. ती चुकीच्या ठिकाणी वापरण्यापेक्षा चुकीच्या घटनांविरुद्ध वापरा. त्यातून नक्कीच खूप चांगले बदल घडू शकतील याची 
मला खात्री आहे. 

स्त्रियांना आपण का कमी लेखतो? खरंतर पुरुषांपेक्षा त्याच जास्त कार्यक्षम असतात. एकाचवेळी, घर-संसार, ऑफीसही सांभाळणं हे काही सोपं काम नाही. 

नंबर वनच्या रेसमध्ये तू कुठे आहेस? 

मी मुळात खेळाडू आहे. त्यामुळे स्पर्धा मला आवडतेच. ती निकोप असावी हा माझा आग्रह असतो. प्रतिस्पर्धीच नसतील तर स्पर्धेला काय मजा? सध्या इंडस्ट्रीत सगळ्याच हिरॉइन्स त्यांची वेगळी ओळख निर्माण करतायत. प्रत्येकीचं काम चांगलंच होतंय. त्यामुळे नंबरच्या भानगडीत न पडता. निकोप स्पर्धा करण्यावर माझा विश्वास आहे. 
-दीपिका पदुकोण

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या