बालक पालक


रवी जाधव यांचा ‘बालक-पालक' हा मराठी सिनेमा सध्या गाजतोय. सिनेमात धाडसी आणि नवा विषय असूनही पारंपरिक शालीनता जपण्यात आली आहे. एकही अभद्र संकेत या सिनेमातत दिसत नाही. ‘विकी डोनर’मध्ये जी ऊर्जा आणि शैली दिसली तीच या सिनेमात दिसली. गंभीर समस्येला विनोदाचे आवरण घालून सादर करण्यात आले आहे. सेंसॉरचे प्रमाणपत्र मिळाल्याने मुले आई-वडिलांसोबत हा सिनेमा एकत्र पाहू शकतात. यातील शाळेत जाणारा मुलगा एका वयस्क सिनेमाची डीव्हीडी पाहतो, त्याचे वडील ते पाहतात आणि त्याला बेदम मारतात. त्याची पत्नी त्याला शांततेने समजवण्याचा सल्ला देते. भूतकाळात तोही अशाच एका अनुभवातून गेला आहे, याची आठवण करून देते.

फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येते की, एका चाळीतील चार मुले चिंतेत असतात की त्यांच्याच चाळीमधील त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलीकडून काहीतरी चूक झाली आहे आणि चाळीतील सर्व लोक तिच्यावर नाराज आहेत. तथापि त्यांना लाजही वाटत आहे. त्या मुलीला जणू काही जगण्याची इच्छा नसते. या चार मुलांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना मारण्याची धमकी दिली जाते. त्या मुलीसोबत काय झाले होते हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यापेक्षा थोडा मोठा मुलगा त्यांना एक सिनेमा पाहण्याचे सांगतो. तो मुलगा त्या चार मुलांना डीव्हीडीवर एक अश्लील सिनेमा दाखवतो. त्यानंतर त्यातील दोन मुले विचित्र वागतात आणि मुलींकडे वेगळ्याच नजरेने पाहतात. त्यामुळे त्यांच्या दोन मैत्रिणी त्यांच्यापासून दूर जातात. एक समजदार माणूस या चार मित्रांमध्ये आलेल्या भिंतीला पाडू पाहतो. तो माणूस सगळी माहिती मिळवून चौघांच्या आई-वडिलांसोबत मुलांना सेक्सचे सत्य सांगतो.

आठवणीतून बाहेर निघून वडील आपल्या शाळेत जाणार्‍या मुलाला समजून सांगतात. त्याच्या विकसित होणार्‍या मेंदूतून हा नाजूक विषय ते काढून टाकतात. अभ्यासक्रमात जीवनाच्या एका महत्त्वाच्या भागाचे वैज्ञानिक शिक्षणात महत्त्व आहे. या गोष्टीकडे कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते. या नाजूक विषयांवर विदेशात अनेक सिनेमे बनलेले आहेत. मात्र भारतात ‘बालक-पालक’ पहिला सिनेमा आहे. तंत्रज्ञानाच्या काळात मुलांसाठी खूप काही उपलब्ध आहे म्हणून त्यांच्या बिघडण्याची भीती असते. तंत्रज्ञानाशी लढता येत नाही, तर त्याचा विचारात समावेश करून जगता येते. बालपण आवाज न करत किशोर वयात प्रवेश करतो आणि युवावस्था पापण्या लवेपर्यंत दरवाजावर उभी असते. या नाजूक विषयावर ‘समर ऑफ 42’ उत्तम सिनेमा आहे. ‘ग्रॅज्युएट’सुद्धा चर्चेत होता. आणखी एक विदेशी सिनेमा होता, त्यात एका तरुणीचा पती युद्धावरून परत येत नाही. त्यामुळे गावातील सर्व लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. एका किशोरवयीन मुलाचा तिला आधार मिळतो. त्या मुलालाही गर्व वाटू लागतो. त्याचवेळी तिचा सैनिक पती परत येतो.

राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’मधील ऋषी कपूर आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठय़ा शिक्षिकेवर प्रेम करू लागतो. ती शिक्षिका आपल्या प्रियकरासोबत लग्न करते. अल्पवयीन नायक शिक्षिकेला कपडे बदलताना पाहतो आणि ते चित्र त्याच्या डोक्यात फिरत असते. तो कन्फेशन खोलीत जातो. परतल्यावर शिक्षिका त्याला म्हणते की, लहान मुले कधीच पाप करत नाहीत तेव्हा मुलगा तिला म्हणतो की, मी आता लहान राहिलो नाही. शिक्षिकेच्या प्रियकराला पहिल्याच नजरेत त्या अल्पवयीन मुलाची मन:स्थिती कळते. तो प्रेमी मुलाला मित्र बनवतो. प्रेम आणि अल्पवयीन वयाच्या आकर्षणाविषयी मुलाला समजून सांगतो. त्या भेटीनंतर मुलगा कुंठेतून मुक्त होतो.

पहिला भाग संपूर्ण सिनेमाप्रमाणे प्रदर्शित करावा म्हणजे ही अजरामर कृती ठरेल. असा सल्ला सिनेमा बनत असताना सत्यजित रे यांनी राज कपूर यांना दिला होता. खरं तर लहानपणी आणि अल्पवयीन वयात मनात जिज्ञासा असते. आपल्या शरीरात होणार्‍या बदलाबरोबरच मानसिक स्तरावर बदलाला समजण्यास ते असर्मथ असतात. आयुष्याच्या याच वळणावर कुंठेचा जन्म होतो. त्यामुळे संपूर्ण आयुष्य काळोखात जाते. सेक्स संबंधित गोष्टीची माहिती नसल्यामुळे हिंसक गोष्टी घडत असतात. हिंसेची अनेक कारणे आहेत. मात्र सेक्स आणि धर्मांधता मूळ कारण आहे. या काळात वयस्कर लोकांचा स्पष्टपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन संपूर्ण जीवनाला प्रकाशमान करू शकतो. शिक्षण तज्ज्ञ आणि समाजशास्त्रींनी या क्षेत्रात पुढाकार घ्यायला हवा.
सौजन्य : दिव्य मराठी

विज्ञानीय दृष्टीकोनतून भगवतगीता


आदीमाणूस जेव्हा गुहातून बाहेर आला, दगड,झाडांच्या फांद्या, पालापाचोळा वगैरे निसर्गसंपत्ती वापरून आपल्या कुटुंबासाठी निवारा निर्माण करू लागला, विस्तव वापरून हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करूलागला, पुढे शेतीचे तंत्र आत्मसात करून धान्य साठवू लागला,पशुधन पाळून दूधदुभते मिळवू लागला, तेव्हा त्याला पोटभर अन्नाची शास्वती वाटली, त्याच्या जीवनाला स्थैर्य आले. त्याच्या मेंदूला विचार करण्याची क्षमता येऊ लागली. त्याचा मेंदू झपाट्याने उत्क्रांत होऊ लागला. अवतीभोवतीच्या निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी वेळ मिळू लागला. निरनिराळ्या मानवसमूहातल्या विचारवंतांनी निसर्गाच्या निरीक्षणांचे आणि अनुभवांचे, त्यांच्या कुवतीनुसार आणि मिळविलेल्या अनुभवानुसार स्पष्टीकरणे देण्यास सुरुवात केली.

पुरातनकाळातील ऋषीमुनींची,धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्वप्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत,सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीचगुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली.धर्माचरणे सांगितली. 

आताथोडा विचार करा. मला जर कोणाला माझे विचार पटवावयाचे असतील तर ते त्यांना समजेलअशा भाषेत सांगावे लागतील. माझ्या विचारानुसार त्यांनी आचरण करावे अशी इच्छा असेल तर त्यांना थोडी प्रलोभनेदाखवावी लागतील थोडी भीती दाखवावी लागेल वगैरे वगैरे.

विचारवंतानीनेमके हेच केले. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, या जन्मीच्या वाईट कर्मांची फळे पुढच्या जन्मीभोगावी लागतील, चांगली कर्मे केली तर देवाला तुम्ही आवडाल,वाईट कामे केली तर देव तुम्हाला शिक्षा करील, तुमच्यावाईट कर्माची फळे तुमच्या संततीला भोगावी लागतील वगैरे वगैरे.

नंतरच्याशिष्यांनी, त्यांच्याफायद्यासाठी आणि स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी या प्रलोभनात आणि भीतीच्या परिमाणातआणखी भर तर घातलीच शिवाय जपजाप्य, नवससायास, उपासतापास, दानधर्म, कर्मकांडे वगैरेंची भरही घातली.

ऋषीमुनींनीजी धर्माचरणे सांगितली त्यात पुरेपूर विज्ञान भरलेले आहे. त्यात वेदातील सर्वविज्ञान सामावलेले आहे. पण ते सर्व अध्यात्माच्या महासागरात जे बुडाले आहे ते अजूनबाहेर निघाले नाही.

जगभरच्या निरनिराळ्या मानव समूहातील विचारवंतांनी धार्मिक संस्कृती निर्माणकेली, धर्मग्रंथ निर्माण केले, बोधवचने लिहिली वगैरे, हा इतिहास, फारफार तर इसविसनपूर्व ८ ते १० हजार वर्षापूर्वीपर्यंत जातो.

मानवसमूहातील शक्तिमान व्यक्ती, नेते बनले आणि त्यांनी मानवसमूहाची सत्ता काबीज केली. तर धार्मिक विचारवंतांनीमानवसमूहाची वैचारिक सत्ता काबीज केली. सामान्य माणसांनी या दोघांचीही सत्ता पूर्णतया मानली आणि त्यांच्या आज्ञेबाहेर वर्तन करण्याची हिम्मत दाखविलीच नाही. त्यांच्या आज्ञाबद्दल कोणतीही शंका उपस्थित केली नाही त्यांना प्रश्न विचारले नाहीत.
मूळलेख : शुक्रवार ३० डिसेंबर २०११
(ग्लोबल मराठी)

स्वामी विवेकानंदांचे भावस्पर्शी पत्र


आपली पाश्चात्य शिष्या कु. जोसेफिन मक्लिऑड यांना स्वामी विवेकानंद यांनी अखेरच्या काळात लिहिलेले, जीवन निवृत्तीचे वेध लागलेल्या काळातील हे भावपूर्ण, भावस्पर्शी पत्र. एका वेगळ्याच विवेकानंदांचे दर्शन या पत्रातून होते.

अलमेडा, कॅलिफोर्निया; १८ एप्रिल १९००
प्रिय जो,
तुमचे आणि श्रीमती बुल यांचे अशी दोन पत्रे आत्ताच मिळाली. आनंद वाटला. मी हे पत्र लंडनला पाठवीत आहे. श्रीमती लेगेट यांची प्रकृती निश्चितपणे सुधारत आहे हे वाचून अत्यानंद झाला. श्रीयुत लेगेट यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे ऐकून अतिशय वाईट वाटले. असो, गोंधळात आणखी भर पडू नये म्हणून मी गप्प बसतो.
माझ्या पद्धती अतिशय कडक असतात हे तुम्हाला ठाऊकच आहे आणि जर का मी एकदा क्षुब्ध झालो तर मी अ-ला असा धारेवर धरेन की त्याची मानसिक शांती भंग होऊन जाईल. श्रीमती बुलविषयीच्या त्याच्या कल्पना पूर्णपणे चुकीच्या आहेत हे त्याला जाणवावे एवढ्यासाठीच मी त्याला पत्र लिहिले होते.
कार्य करणे हे नेहमीच कठीण असते. जो, माझ्यासाठी अशी प्रार्थना करा की माझी कामे कायमची थांबावित आणि माझा आत्मा जगन्मातेच्या ठायी लीन होऊन जावा. तिची कामे तिलाच ठाऊक.
पुन्हा एकदा लंडनमध्ये आपल्या जुन्या मित्रमंडळींबरोबर राहायला मिळाल्याने तुम्हाला आनंद झाला असेल. आपल्या जुन्या मित्रांचा मी ऋणी आहे. त्यांना माझा नमस्कार कळवा.
माझी प्रकृती ठीक आहे. मन:स्वास्थ्यही खूप चांगले आहे. माझ्या शरीरापेक्षा माझ्या आत्म्याला अधिक शांती लाभत आहे असे मला वाटते. युद्धात मी जिंकलो आणि हरलोही. मी सगळी बांधाबांध केली असून त्या मोक्षदात्याची प्रतीक्षा करीत आहे.
`हे शिव, हे शिव, माझी नौका परतीरी ने.'
जो, काहीही झाले तरी अजून मी तोच मुलगा आहे की जो, दक्षिणेश्वरच्या त्या वटवृक्षाखाली बसून श्रीरामकृष्णांच्या मुखातून निघणारे अद्भुत शब्द आश्चर्यचकित होऊन एकाग्र चित्ताने ऐकत असे. तोच माझा खरा स्वभाव आहे; कामे, परोपकाराची कृत्ये आणि इतर साऱ्या गोष्टी मजवर लादल्या गेल्या आहेत. आता पुन: मला त्यांचा आवाज ऐकू येत आहे.तोच जुना परिचित आवाज माझ्या हृदयाला कंपायमान करीत आहे. बंधने निखळून पडत आहेत, प्रिय जनांविषयीची आसक्ती दूर होत आहे, काम निरस होऊ लागले आहे, जीवनाचे आकर्षण मावळू लागले आहे. फक्त आता प्रभूंचे आवाहन ऐकू येत आहे.
`येतो प्रभू मी येतो.'
`गतगोष्टींचा विचार करू नको. माझ्यामागून ये.'
`येतो मी. प्रिय प्रभू, येतो मी.'
खरेच येतो मी. निर्वाण मला समोर दिसत आहे. कधीकधी मला त्या अनंत शांतीसागराची स्पष्टपणे प्रतीती येते. किंचित देखील वारा किंवा लाट त्याची शांती भंग करीत नाही.
मी जन्माला आलो त्याबद्दल मला आनंद होतो, मी यातना सोसल्या याबद्दलही मला आनंद होतो, मी मोठमोठ्या चुका केल्या याबद्दलही मला आनंद होतो आणि आता चिरशांतीच्या राज्यात प्रवेश करतानाही मला आनंद होत आहे. मी कोणालाही बंधनात टाकून जात नाही, मी कोणतीही बंधने घेऊन जात नाही. हे शरीर पतन पावून मला मुक्ती मिळो किंवा मला जीवनमुक्ती लाभो, माझे जुने व्यक्तित्व गेले, कायमचे गेले, ते पुन: कधी परत येणार नाही. मार्गदर्शक, गुरु, नेता, शिक्षक विवेकानंद निघून गेला आहे; मागे राहिला आहे बालक, शिष्य, प्रभूचा सेवक.
अ-च्या कामात मी ढवळाढवळ का करीत नाही ते तुम्हाला आता कळले असेल. जो, एखाद्याच्या कामात ढवळाढवळ करणारा मी कोण? नेत्याचे पद मी केव्हाच त्यागिले आहे- मला आता काहीही बोलण्याचा अधिकार नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासून मी भारतातील कार्यासंबंधी कोणतीही आज्ञा दिलेली नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही आणि श्रीमती बुल यांनी आतापर्यंत माझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुम्हावर शुभाशीर्वादांचा सतत वर्षाव होवो. मी जेव्हा प्रभूच्या इच्छेच्या प्रवाहाबरोबर वाहत जात असे तेव्हाचे क्षण हे माझ्या आयुष्यातील मधुरतम क्षण होत; मी पुन: एकदा त्या प्रवाहाबरोबर वाहत जात आहे. समोर सूर्य तळपत आहे, सभोवार झाडे-झुडपे आहेत, आणि या उन्हात सगळे कसे शांत, स्थिर आहे. आणि नदीच्या उबदार पत्रातून मी सुस्तपणे वाहत जात आहे. ती कमालीची नीरवता, स्तब्धता भंगेल या भीतीने हातापायांची कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यास मी धजत नाही. ती स्तब्धताच तुम्हाला निश्चितपणे जाणवून देते की, हे जग म्हणजे माया आहे, मृगजळ आहे.
माझ्या कार्यामागे महत्वाकांक्षा होती. माझ्या प्रेमामागे विशिष्ट व्यक्तींविषयी आसक्ती होती. माझ्या पावित्र्यामागे भीती होती, माझ्या नेतृत्वामागे सत्तेची तृष्णा होती, त्या सर्व आता अस्तंगत होत आहेत आणि मी पुढेपुढे वाहत चाललो आहे. मी येतो! माते, मी येतो! तू आपल्या उबदार कुशीत घेऊन मला जेथे नेशील तेथे मी येतो. मी आता प्रेक्षक म्हणून येत आहे. अभिनेत्याची माझी भूमिका संपली आहे.
आहा! किती गंभीर शांती ही ! माझ्या हृदयाच्या अगदी आत आत असलेल्या अत्यंत दूरस्थ अशा स्थानापासून माझे विचार येत आहेत असे भासते. ते दुरून येणाऱ्या अस्पष्ट कुजबुजीसारखे वाटत आहेत. ती मधुर, मधुरतम शांती सर्वत्र पसरली आहे. निद्रादेवीच्या अधीन होण्यापूर्वी काही क्षण माणसाला जसे वाटत असते, त्यावेळी वस्तू दिसतात, पण त्या जशा छायांसारख्या वाटतात, त्यावेळी जसे भय नसते, प्रेम नसते, कोणतीच भावना नसते, तशीच माझ्या मनाची सध्या अवस्था झाली आहे. सर्वत्र मधुरमधुर शांती पसरलेली आहे. चोहो बाजूंनी पुतळ्यांनी व चित्रांनी घेरलेले असताना माणसाची शांती भंगण्याचे जसे कारण उरत नाही तद्वतच माझ्या या अवस्थेत जगाकडे पाहून शांतीला मुळीच बाधा पोहोचत नाही. मी येतो, प्रभू- मी येतो.
जग आहे पण ते सुंदर नाही अथवा कुरुपही नाही. कोणत्याही भावना न उचंबळविणार्या संवेदनांसारखे ते आहे. आहा ! जो, किती आनंदाची अवस्था आहे ही. सर्वच गोष्टी चांगल्या आणि सुंदर आहेत; कारण माझ्या शरीरासकट सर्व वस्तूंच्या सापेक्ष गुणदोषांची, त्यांच्या चांगल्यावाईटपणाची, उच्चनीचपणाची वगैरे माझी जाणीव गळून पडत आहे. ओम तत्सत !
लंडन आणि फ्रांस येथे तुम्हाला पुष्कळ चांगल्या गोष्टींचा अनुभव येईल अशी मी आशा करतो. तुम्हाला नवीन नवीन प्रकारचा आनंद मिळेल, शरीर- मनाला पुष्टीकारक असे नवीन नवीन अनुभव येतील. श्रीमती बुल यांना सप्रेम नमस्कार सांगावा.

तुमचा
विवेकानंद