वाचालयाच हवा अंतराळातून सुनिताने लिहिलेला ब्लॉग...

Posted by Abhishek Thamke on १:०९ म.उ.

तब्बल १२७ दिवसांची अंतराळ सफर करून भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळतज्ज्ञ सुनीता विल्यम्स नुकतीच पृथ्वीवरल्या तिच्या दुसर्‍या घरी परतली. अंतराळात असताना तिने लिहिलेल्या ब्लॉगमधल्या या काही मोजक्या नोंदी !

स्पेस स्टेशनमध्ये रहाणं ही एक गंमतच आहे. थंडीही खूप आणि उष्णताही खूप. डोळे बंद असले तरी तपमानातला फरक कळतो आणि त्यामुळे सूर्योदय सूर्यास्तही! इथं २४ तासाच्या काळात तब्बल १६ वेळा दिवस-रात्र होते.
या संपूर्ण ट्रिपमध्ये मी एकच पॅन्ट आणि एक शॉर्टस घातलीय. इथे धूळ नाही, त्यामुळे कपडे मळत नाहीत. पण इक्विपमेंट्सवर काम करताना कधी कधी डाग मात्र लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे कपडे धुता येत नाहीत. पण पृथ्वीवरच्यासारखे पुन:पुन्हा कपडे मात्र बदलावे लागत नाहीत.
आजअखेर एकदा शेवटचं आम्ही आमचं सोयूझ एअरक्राफ्ट पाहून आलो. प्रत्येक गोष्ट आम्हाला हवी तशीच आहे ना, आमचं सामान लागलंय ना याची खातरजमा केली. आमच्या या यानाला युरीने सांकेतिक नाव ठेवलंय - अगाट (अ¬अढ). किती सुंदर आहे आमचं हे अगाट ! नासा टीव्हीवर जर तुम्ही आमचा लाँच पाहणार असाल तर तुम्हाला आमच्या यानाचा उल्लेख - ‘अगाट’ असाच ऐकू येईल आणि याच सांकेतिक भाषेत युरी म्हणजे अगाट १, मी - अगाट २ आणि अकी - अगाट ३
१३ जुलै २0१२
या मधल्या काही तासांत युरी, अकी आणि मी- आम्ही तिघांनीही हेअरकट केलाय. प्रत्येकाला लाँचच्या आधी तो करावाच लागतो. परंपराच आहे म्हणा ना.
सोयूझ आता लाँचसाठी बाहेर आणण्यात आलंय. या समारंभासाठी प्राईम क्रू ला म्हणजे आम्हाला जरी जाता येत नसलं तरी आमची घरची मंडळी आणि मित्रमंडळी तिथे हजर आहेत. कझाकिस्तानमधली आजची ही सकाळ खूप छान आहे.
३0 जुलै २0१२
आम्ही इथे पोहोचलो ! इथपर्यंतचा प्रवास आणि हे ठिकाण दोन्ही सुंदर ! मला या सगळ्या गोष्टी करायला मिळताय.. मी खरंच भाग्यवान आहे ! आम्ही इथे जे प्रयोग करतोय त्याचा फायदा सगळ्या मानवजातीला नवीन गोष्टी शोधण्यासाठी, शिक्षणासाठी, कुतुहल शमवण्यासाठी होईल. 
अंतराळात येण्याची माझी ही दुसरी वेळ असली, तरी यावेळी सगळं वेगळं आहे. स्पेस स्टेशन मोठं आहे, लोकंही जास्त आहेत आणि सगळी कामंही वेगळी आहेत. विज्ञानाची काय किमया आहे.. इथे येणार्‍या वेगवेगळ्या यानांमुळे वस्तू येण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. लॅबची काम करण्याची यंत्रणा स्टेबल आहे त्यामुळे मागच्यापेक्षा आता काम करणं जास्त सुरळीत झालंय.
पण काही गोष्टी तशाच राहतात - सफाई, टॉयलेटची सफाई आणि त्याची यंत्रणा नीट ठेवणं, कचर्‍याचं नियोजन आणि त्याची विल्हेवाट लावणं, नेहमी लागणार्‍या वस्तू काढून ठेवणं, कॉम्प्युटर मेन्टेनन्स.. कुठेही जा.. या गोष्टींपासून सुटका नाही ! इथे आम्हाला हरकाम्या असावं लागतं.. चांगलंच आहे. त्यामुळे आमचा वेळही जातो. 
आत्ता आमचं यान युरोपवरून जातंय. इंग्लंड, फ्रान्स, इटली, दक्षिण ग्रीस, कैरो, सूवेझ कालव्यापासून रेड सी ते सोमालियापर्यंत सगळे देश मला स्पष्ट ओळखता आले. आफ्रिकेजवळ असलेलं सॅण्ड स्टॉर्म - वाळूचं वादळ सोडलं तर इतर ठिकाणी आकाश तसं निरभ्र आहे.
या आठवड्यात आम्ही केलेल्या गोष्टी 
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधली रविवारची रात्र जपानचं कार्गो यान कढत आमच्या दिशेनं येतंय. तर आताच आम्ही प्रोग्रेस ४७ यान सोडलं. अंतराळात ट्रॅफिक जाम होणार बहुतेक ! 
आता कढत स्टेशनला जोडून घेण्याची तयारी जो आणि अकी करतायत. जपानच्या किनारपट्टीजवळून हे कार्गाे यान लाँच करण्यात आलंय आणि आता आम्हाला रोबोटिक आर्मच्या मदतीनं ते पकडून स्टेशनला जोडायचंय. यान पकडण्याचं मुख्य काम ते दोघं करणार आहेत आणि माझ्यावर तुलनेनं कमी जबाबदार्‍या आहेत, म्हणून मी इतरही काही गोष्टी करू शकतेय.
इथे आल्यावर आम्हाला आमचे कपडे शोधावे लागले. कॉम्प्युटर्सवर ईमेल सेटिंग्स करावी लागली आणि हो, आता इथे आमच्याकडे नवं टॉयलेट आहे ! इथे असणार्‍या आधीच्या रशियन टॉयलेट सारखंच आहे; पण यामध्ये एक नवं फीचर आहे. या नव्या टॉयलेटमध्ये युरिन रिसायकलिंग करून युरिनचं रूपांतर पाण्यात करता येतं ! आमच्या सोयूझच्या टॉयलेटपेक्षा तर नक्कीच चांगलं आहे हे ! 
इथली स्लिप स्टेशन्स - झोपायच्या जागाही कुल आहेत ! आम्ही चौघं जण नोड २ मध्ये झोपतो. बाजूबाजूला. इथे झोपण्यासाठी जमिनीसोबतच छताचाही वापर करता येतो ! मी सगळ्यात खाली झोपते. झोपायची जागा कॉफिनसारखी ! इतर दोघं जण स्टेशनच्या रशियन सेगमेंटमध्ये झोपतात. 
व्यायाम
इथल्या सगळ्या गोष्टींची आम्हाला हळूहळू सवय होतेय. दोनच दिवसांत तुमच्या शरीरात - स्नायूंमध्ये किती बदल होऊ शकतात याची जाणीव थक्क करणारी आहे. मला हे माहीत होतं म्हणून मी इथे आल्याच्या दुसर्‍याच दिवशी ट्रेडमिल वापरायला सुरुवात केली. अंतराळ दिसणार्‍या घुमटाच्या खालीच ही मशीन्स आहेत आणि जवळच गाणी लोड केलेला लॅपटॉपही आहे. आज मी लवकर उठले, मोठय़ा आवाजात गाणी लावली आणि खिडकीतून बाहेर पाहात व्यायाम केला. इथे व्यायामासाठी असलेली बाइक जुनीच आहे. मागच्या वेळी मी आले होते, तेव्हाही हीच होती. आमची जुनी मैत्री आहे !
१७ ऑगस्ट २0१२
आमचा स्पेसवॉक आता जवळ येतोय. ३0 ऑगस्टला मी आणि अकी एतअ म्हणजेच स्पेसवॉक करणार आहोत. त्यामुळे आता एअरलॉकची सफाई करायला आम्ही सुरुवात केलीय. आमच्या सूट्सकडे पण लक्ष द्यायला हवं. हे सूट्स आमच्यासाठी अंतराळात एका लहानशा स्पेसक्राफ्टचं काम करतात. त्यामुळे त्यांच्यात अनेक व्हॉल्व्ह, टँक्स, कुलिंग, हीटिंग अशा स्पेस स्टेशनवर असलेल्या सगळ्या गोष्टी असतात. यामुळेच तर आम्ही तग धरून आहोत. हे सूट बरेच दिवस वापरण्यात आलेले नाहीत, म्हणून मग आता त्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही लहान लहान प्री-फ्लाईट्स करायला लागलोय.
३ सप्टेंबर २0१२
एक्स्ट्रा वेहिक्युलर अँक्टिविटी म्हणजे स्पेसवॉकमध्ये आम्ही बिझी झालो होतो. आधी तयारी आणि मग स्पेसवॉक. रोबॉटिक आर्म वापरत ३0 ऑगस्टला आम्ही स्पेसवॉक केला. आमच्या अंदाजापेक्षा तो जास्त काळ चालला. इथे उठून सरळ बाहेर जाता येत नाही. कदाचित स्टेशनच्या बाहेर पडणं हाच सगळ्यात सोपा आणि रंजक भाग आहे. वॉकच्या आधी बरीच कामं करावी लागतात. बॅटरी बदलणं, कार्बन डाय ऑक्साइडची नळकांडी काढणं, सूटची मापं नीट करणं, इतर वस्तूंची जमवाजमव आणि बरंच काही. अगदी झोपायचं कधी आणि खायचं कधी याचंही प्लानिंग करावं लागतं. कारण ६ तासांच्या स्पेसवॉकसाठी ८ तास त्या सूटमध्ये घालवावे लागतात.
मागच्या वेळी मी इथे आले होते तेव्हाच एक गोष्ट शिकले. इथे कोणतीही गोष्ट ठरवल्याप्रमाणेच होईल याची खात्री नाही. जी गोष्ट अवघड वाटते ती सोपी होऊन जाते आणि एखादी सोपी वाटणारी गोष्ट महाकठीण होते. असं का, कुणास ठाऊक. म्हणजे जसं एखाद्या रिकाम्या रस्त्यावरून जॉगिंग करताना दोन कार्स अगदी तुमच्या बाजूनंच एकमेकांच्या जवळून जाव्यात, तसं. ‘स्टिकी बोल्ट’चंही असंच झालं. आम्हाला जी गोष्ट सोपी वाटली होती, तीच अवघड ठरली.
इथे असताना स्टेशनच्या आतलं वातावरण बदलत नाही, त्यामुळे बाहेरच्या वातावरणात होणार्‍या बदलांचा आम्हाला कधीकधी विसर पडतो. अंतराळ खूप बदल घडत असतात. थंडीही खूप आणि उष्णताही खूप. सूर्याकडून येणार्‍या झळा, गरम वारा आणि पोकळी या सगळ्यांमुळे अनेक गोष्टी आणि बदल घडतात. अगदी स्पेससूट घातल्यानंतरही सूर्योदय - सूर्यास्त जाणवतो. डोळे बंद असले तरी तपमानातला फरक कळतो आणि त्यामुळे सूर्योदय सूर्यास्तही ! असाच परिणाम स्टेशनच्या बाहेरील बाजूला असणार्‍या मेटलवर होतो आणि असाच परिणाम काही बोल्ट्सवरही झाला. गेली दहा वर्षं हे स्पेस स्टेशन वातावरणातले बदल सोसतंय. इथं २४ तासाच्या काळात तब्बल १६ वेळा दिवस-रात्र होते.
आता जॉन्सन स्पेस सेंटरमधले आमचे सहकारी आमच्या पुढच्या स्पेसवॉकवर आणि तेव्हा उरलेली दुरुस्ती पूर्ण कशी करायची यावर काम करतायत.
१६ नोव्हेंबर २0१२
आता घरी परतायची तयारी सुरू झाली. आतापर्यंत मी याचा विचारच केला नव्हता. मला अजूनही परत जावंसंच वाटत नाहीये. पण आता तयारी सुरू केलीय कारण इथे एखादी गोष्ट राहिली तर पुन्हा आणता येणार नाही. मला स्पेसमध्ये राहायला खूप आवडतं. माझ्यासारखंच इथे येणार्‍या प्रत्येकालाच आवडतं. तुम्ही इथे येता आणि इथलेच होऊन जाता. एका क्षणाला तुम्ही उभे असता आणि थोड्याशा प्रयत्नात - खाली डोकं वर पाय ! ही जागा भन्नाट आहे. आणि इथून दिसणारा व्ह्यू पाहिलात, तर कोणालाच परत जावंसं वाटणार नाही.
आता तुम्ही विचाराल की मला नेमकं काय पॅकिंग करायचंय? विमानांसारखंच इथेही बॅगेज लिमिट असतं. ठरावीक सामान आणू शकता. पण विमानांपेक्षाही कमी. सोयूझमध्ये फक्त दीड किलो. आम्ही सगळ्यांनी तेवढय़ाच खासगी वस्तू आणल्यायत. त्यामुळे आता तेवढय़ाच परत घेऊन जायच्या आहेत. कपडे, टूथब्रश, टूथपेस्ट, शाम्पूचं पॅकिंग आम्ही करत नाही. आम्ही इथे येतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी इथे असतात. अगदी आमचे स्पेशल शर्ट आणि कार्गो पॅन्टही आमची वाट पाहत असतात. पण आमच्या इतर काही वस्तूंचा मात्र दुसर्‍यांना उपयोग नसतो.
या संपूर्ण ट्रिपमध्ये मी एकच पॅन्ट आणि एक शॉर्टस घातलीय. इथे धूळ नाही, त्यामुळे कपडे मळत नाहीत. पण इक्विपमेंट्सवर काम करताना कधी कधी डाग मात्र लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे कपडे धुता येत नाहीत. आम्ही जुन्या गोष्टी फेकून सरळ नव्या गोष्टी वापरतो. पण पृथ्वीवरच्यासारखे पुन:पुन्हा कपडे मात्र बदलावे लागत नाहीत. 
आमचा मागचा आठवडा एकदम बिझी गेला. आधी कॉम्प्युटर्स बिघडले, मग टॉयलेट ! 
इथे असताना अंतराळवीरांच्या शरीरात वाढ होते आणि मग आमचे सूट्स आम्हाला बसत नाहीसे होतात. अंतराळात पाठीचा कणा प्रसरण पावतो. स्नायूंवरही गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नसतो, त्यामुळे तेही प्रसरण पावतात. त्यामुळे शरीराचा आकार बदलतो. आम्ही आमचे सूट्स घालतानाच ही गोष्ट माझ्या लक्षात आली. सूटमधून डोकं बाहेर काढण्यासाठी मला सगळे स्ट्रॅप्स - पट्टे वाढवावे लागले. तो थोडा घट्ट होतोय - पण झाला. 
नंतर एकदम वाटलं - सोयूझ किती लहान आहे. इथे आलो तेव्हा किती मोठं आणि ऐसपैस वाटत होतं. पण आता या मोठय़ा हॉटेलसारख्या स्टेशनवर राहून लहान वाटायला लागलंय. इथे तुम्हाला नुसतं बसता येत नाही. आईच्या पोटातल्या बाळासारखं झोपावं लागतं. पण असं सगळं असून पण सोयूझ आपलंसं वाटतं. इथे काय काय करायचंय हे जणू आपोआप उमगतं. हीच आमच्या ट्रेनिंगची करामत आहे. फारसा विचारच करावा लागत नाही.. फक्त करत जायचं.
१९ नोव्हेंबर २0१२
सगळं सामान बांधून झालंय. अगदी इथे वापरण्याचा खास चश्मा - ज्याला आम्ही हॅरी पॉटरचा चष्मा म्हणतो, तो ही काढून ठेवलाय. आता उद्या सोयूझमध्ये स्लिपिंग बॅग्स टाकल्या की झालं.
आता पुढच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. सोयूझ व्यवस्थित ऑपरेट करणं. गोष्टींचं महत्त्व कसं आपोआप बदलतं. आता स्टेशनपेक्षा आमचं जास्त लक्ष सोयूझकडे आणि ते पृथ्वीवर नीट उतरवण्याकडे लागलंय. त्यासाठीच्या सगळ्या तपासण्याही आम्ही केल्या. पृथ्वीवर उतरताना करायच्या गोष्टींची रंगीत तालीम केली. यानाची झाल्यावर आता आमची तयारी सुरू. पण त्या आधी स्पेसस्टेशनची काही दुरुस्ती करायची होती. केव्हिन आणि त्याच्या क्रूच्या हाती स्टेशन सोपवताना सगळं व्यवस्थित हवं. इथे आमचा चेंज ऑफ कमांड समारंभ झाला. सूत्रं दुसर्‍या टीमच्या हाती गेली आणि परतायची वेळ झाल्याचं जाणवलं. मागल्या वेळी मी उन्हाळ्यात कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात लॅण्ड झाले होते. यावेळी कझाकिस्तानच्या थंडीत एका कॅप्सूलमधून उतरणार. सूत्रं दुसर्‍यांकडे देण्याचा कार्यक्रम छान झाला. इथे आम्ही सगळे किती वेगवेगळ्या भागांतून आलोय - युरी युक्रेनचा, अकी जपानचा, केविन इंडियानामधून, ओलेग बेलासचा, इगनी सायबेरियाचा आणि मी बोस्टनची. किती वेगळे पण तरी खूप काही समान असणारे आम्ही सर्व जण. रोज एकत्र राहताना अनेक गोष्टींचा एकत्र आनंद घेतला. आमचा क्रू आणि एक्सपिडिशीन ३२ चा क्रू. आम्ही दाखवून दिलं की वेगवेगळं आयुष्य जगणारी, वेगळ्या दृष्टिकोनाची, संस्कृतीची, धर्माची लोकं एकत्र येऊन चांगलं काम करू शकतात.
याच समारंभात आम्ही या नव्या क्रूला काही भेटीही दिल्या. सगळ्यात शेवटी आम्ही आमच्या क्रूचा पॅच आमच्या स्पेसशिपवर लावला. आमच्या आधी येऊन गेलेल्या सगळ्या ३२ जणांचे पॅच इथे आहेत. 
दरम्यान, आता पुन्हा पृथ्वीवर, घरी जायची वेळ झालीय..
शेवटी पृथ्वीच प्यारी.. दुसर्‍या कुठल्या ग्रहाचा मी विचारच करू शकत नाही.
संकलन, अनुवाद : अमृता दुर्वे
Reactions:
Categories: ,