या संभाजीच्या चरित्राने एक प्रभावी व मंगल सत्य प्रकट केले आहे...

Posted by Abhishek Thamke on १२:०६ म.उ. with 2 comments

इतिहास संशोधक श्री वा.सी.बेंद्रे यांनी चार तपांपेक्षा अधिक काल पर्यंत जी तपश्चर्या केली आहे तिचें साफल्य म्हणजे त्यांनी लिहिलेले संभाजी चा ग्रंथ होय.मराठ्यांच्या इतिहासाची साधने संगृहीत व संपादित करणार्या विद्वानांच्या चार पिढ्यांचे संशोधन विषयक परिश्रम सफल झाल्याची ग्वाही हे पुस्तक उच्च स्वराने निरंतर देत राहील,इतकी ह्या पुस्तकाची योग्यता आहे.गेल्या शंभर वर्षातील महाराष्ट्रीय मनाला मराठ्यांच्या इतिहासाचा ध्यास लागला होता व त्या करिता अनेक प्रज्ञावनतांनी त्या इतिहासाच्या अभ्यासाकरिता आवश्यक साधनांची जुळवाजुळव करण्याकरिता हव्यास केला होता.विष्णुशास्त्री चिपळुणकरांपासून तो श्री.बेंद्रे यांच्या पर्यंतच्या दीर्घ कालावधींत मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित असे जे जे काही प्रयत्न झाले त्या सर्वांना या पुस्तकामुळे सार्थकता आली आहे.हे पुस्तक पुरस्कृत करण्याचा बहुमान प्राज्ञमालेला मिळाला याबद्दल आम्हांस धन्यता वाटते.हा बहुमान मिळवून देण्यांत आमचे मित्र व सहकारी प्रा.न.र.फाटक यांचे साहाय्य मिळाले म्हणून येथे त्यांचाहि कृतज्ञता पूर्वक निर्देश आम्ही करतो .

या संभाजीच्या चरित्राने एक प्रभावी व मंगल सत्य प्रकट केले आहे इतिहास संशोधक पुष्कळवेळां लोकप्रिय व पूज्य वाटणाऱ्या घटनांचे असत्यत्व दाखवून अप्रिय व अपूज्य अशा घटनांची त्या ठिकाणी स्थापना करतो ;कारण ,इतिहाससंशोधकाला सत्य हेच पूज्य व आनंददायक असते.श्री.वा.सी.बेंद्रे अशा सत्यनिष्ठ संशोधकां पैकी आहेत.त्यांचा योगायोगच मोठा म्हटला पाहिजे कीं इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालींत जुना लोकप्रसिद्ध धर्मवीर परंतु दुर्गुणी संभाजी न सापडता एक महान विभूति असलेला संभाजी गवसला.धर्मांकरितां आत्यंतिक यातनांच्या अग्नीमध्यें शौर्याने व धीराने उभा राहून प्राणविसर्जित करणारा संभाजी दुर्व्यसनी ,खुनी व धर्मभोळा म्हणून आजपर्यंत इतिहासलेखकांनी व नाटककारांनी दाखविला आहे ; तत्वचिंतकाच्या दृष्टीनें हें एक न उलगडलेले कोडें होते.जिवंतपणी शरीराचे तुकडे होत असतां ,डोळे काढले जात असतां, शरीर सोलले जात असतां जो धर्मनिष्ठेनें देहातीत रहातो व आपल्या धर्मनिष्ठेच्या अंतिम कसोटीस उतरतो तो आयुष्यभर देहधर्माचा दास म्हणून वागतो,ही घटना सुसंगत वाटत नाहीं ,अतर्क्य वाटते.आतां श्री.बेंद्रे यांनी या वैचारिक कोडयांतून कायमची सुटका केली आहे.मराठ्यांच्या विषयीं गैरसमज असलेला मुसलमान इतिहासकार काफिखान संभाजीस शिवाजीपेक्षां सवाई समजतो ,याचा उलगडा या चरित्राने होतो. आतां मराठ्यांच्या इतिहासांतील एका अभिमानास्पद कालखंडाच्या कार्यकारणभाव उघडकीस येतो, व त्या इतिहासाची उपपत्ति लागते.संभाजी नंतरचा औरंगजेबाच्या निराशामय अंतापर्यंतचा मराठ्यांचा झुंजार व विजयी इतिहास आतां बोलूं लागेल कीं, धर्मनिष्ठ,राजकारणधुरंदर मुत्सद्दी व सेनापति छत्रपती संभाजी महाराज हीच माझी प्रेरकशक्ती आहे !

श्री. बेंद्रे यांनी "छत्रपती संभाजी महाराज " हेम चरित्र लिहून ऐतिहासिक चरित्र लेखनाचा एक उच्चतर मानदंडच निर्माण केला आहे.या पुस्तकाच्या अखेरची संदर्भग्रंथसुचि त्यांच्या अध्ययनाच्या व व्यासंगाच्या विस्ताराची सूचक आहे व या ग्रंथातील प्रकरणवारी इतिहासाच्या आंगोपांगाचा केवढा व्याप लक्षांत घ्यावा लागतो ,याची दर्शक आहे

मराठ्यांच्या इतिहासाला या पुस्तकाने नवी दिशा मिळाली आहे व नवा प्रकाशहि मिळाला आहे. संभाजी संबंधी या पूर्वी प्रसिद्ध झालेले अपवाद सूचक सर्व साहित्य आतां बाधित झाले आहे,एक महान पुण्यश्लोक पुरुषाबद्दलचा अनेक शतके द्दढ झालेला मिथ्यापवाद बाद झाला आहे.याची दखल यानंतर प्रसिद्ध होणार्या सर्व साहित्याने जरूर घेतली पाहिजे.नाहींतर सत्यापलापाचें पाप लागेल तें एक खोटें नाटकच ठरले आहे ,विशेषतः क्रमिक पुस्तकांच्या व सुबोध वांग्मयाच्या लेखकवर्गाने यापुढे सावध राहून संभाजीवरील मिथ्यावादापासून वाचक वर्गाला दूर ठेवलें पाहिजे ; हें त्यांचे कर्तव्य आहे.
लक्ष्मणशास्त्री जोशी
अध्यक्ष
प्राज्ञपाठशाळा मंडल, वाई
१७.२.१९६०
Reactions: