'अर्जुन'

अर्जुन हा सिनेमा नुकताच बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सचित पाटील आणि अमृता खानविलकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. .मराठी माणसाला साद घालणारा विषय असल्यानं प्रेक्षक तो पहाण्यासाठी आवर्जून हजर झाले होते. हा सिनेमा त्यांना मनापासून आवडला आहे.
या सिनेमात मराठी तरूणांना उद्योगधंद्याकडे वळण्याचा संदेश देण्यात आला आहे. या सिनेमात अर्जुन पवार या मराठी तरूणाची कथा दाखवण्यात आली आहे. अर्जुन हा सर्वसामान्य मराठी कुटुंबातला एक तरूण असतो. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या अर्जुनला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. त्यानुसार घरच्यांचा विरोध न जुमानता अर्जुन स्वतःच्या व्यवसायाला सुरूवात करतो आणि अनेक प्रस्थापितांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकतो. या संघर्षात तो नेमका एका चक्रव्युहात अडकतो. या चक्रव्युहातून तो नक्की कसा बाहेर येतो ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सिनेमातले दमदार डायलॉग्ज, चकचकीत सादरीकरण आणि मराठी अस्मितेला साद देणारा संदेश यांच्या जोरावर हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला आहे. सचित पाटीलनं या सिनेमात अर्जुनची भूमिका साकारली आहे. तर अमृता खानविलकरनं त्याची प्रेयसी अनुष्काच्या रोलमध्ये आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमानंतर अभिनेते विद्याधर जोशी या सिनेमात पुन्हा एकदा निगेटिव्ह रोलमध्ये दिसेल. कलाकारांच्या कामाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली आहे. मराठी अस्मितेच्या विषयाला हात घातलेले सिनेमे मराठी प्रेक्षकाला नेहमीच आवडतात. अर्जुन हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. सिनेमाच्या सफाईदार टेकिंग आणि योग्य एडिटिंगमुळे तो रटाळ होत नाही. कथेची मांडणीही एकसंध असल्यानं सिनेमाची गती राखण्यातही दिग्दर्शक एमएफ ईलियास यांना यश आलंय. ललित सेन यांची गाणीही चांगली झालीत. प्रेक्षकांनी सिनेमाला दिलेले स्टार्स पाहिले की प्रेक्षकांनाही या गोष्टी कळल्याचं लगेचच लक्षात येतात. चांगली कथा, उत्तम सादरीकरण आणि जोडीला हिंदी सिनेमाशी स्पर्धा नसल्यानं त्याचा फायदा अर्जुन या सिनेमाला मिळाला आहे. एकाचवेळी सिंगल स्क्रीन आणि मल्टीप्लेक्सेसमध्येही त्याला चांगलं ओपनिंग मिळालं आहे. सिनेमाची घोडदौड पहाता या अर्जुननं आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतलाय असंच म्हणावं लागेल.

'हिस्टरी' आता मराठीत ! सलमान खान ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर

नुकताच दसरा सण मोठ्या उत्साहात पार पडला. दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर खर्‍या अर्थाने मराठी भाषेनं सुध्दा सीमोल्लंघन केलं आहे. टीव्ही 18 नेटवर्कने हिस्टरी चॅनल हे मराठीत सुरू केलं आहे. आंतरराष्ट्रीय विषयावरील एकापेक्षा एक माहितीपट, अनेक थरारक गोष्टी...कधीही न पाहिलेल्या गोष्टी दाखवणारं चॅनल म्हणून हिस्टरी चॅनल ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय पातळीवर इतिहास घडवलेलं हिस्टरी चॅनल आता मराठीत इतिहास घडवणार आहे. हिस्टरी चॅनलने आता मराठी भाषेत चॅनल सुरू केलं आहे. टीव्ही 18 नेटवर्कच्या या चॅनलचं काल मोठ्या दिमाकात लाँचिंग झालं. तसेच बंगाली,मल्याळम,पंजाबी इतर प्रादेशिक भाषेतही हिस्टरी चॅनल पाहण्यास मिळणार आहे. या चॅनेलचा ब्रँड अम्बॅसेडर अभिनेता सलमान खान आहे.
रटाळ मालिका, संगीत आणि स्टॅण्डअप कॉमेडीचे ‘टिपिकल’ रिअ‍ॅलिटी शोज् आणि चित्रपटांवर आधारित कार्यक्रमांची रेलचेल असे स्वरूप असलेल्या भारतीय टीव्ही वाहिन्यांच्या विश्वात आता ‘हिस्टरी’ ही नवीन मराठी वाहिनी लवकरच समाविष्ट होणार आहे. रूढार्थाने ऐतिहासिक घटना, युद्धांचा इतिहास, इतिहासात अजरामर झालेल्या वास्तू, व्यक्ती यांच्या गोष्टी याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या नव्या वाहिनीवरून दाखविले जाणार आहेत. विशेष म्हणजे बॉलीवूडचा आघाडीचा स्टार अभिनेता सलमान खान या वाहिनीचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर आहे. ए प्लस ई नेटवर्क्‍स आणि टीव्ही १८ या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाची ‘हिस्टरी’ ही मराठी वाहिनी असून वास्तवस्पर्शी करमणूक या वाहिनीद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी माहिती या दोन्ही नेटवर्क्‍सचे अध्यक्ष अजय चाको यांनी दिली. प्रेक्षकांना आता वर्णनात्मक आणि काल्पनिक कथानकांवर आधारित मालिका, कार्यक्रम नको आहेत. सबंध जगभर वास्तवस्पर्शी करमणूक हा वेगळा प्रकार अस्तित्वात आला असून मराठी प्रेक्षकांची रुची बदलत आहे. म्हणूनच या नव्या पद्धतीची करमणूक करणाऱ्या ‘हिस्टरी’ या वाहिनीचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर झालो आहे. दृक्श्राव्य अनुभवाबाबतची रुची बदलत असून लोकांना वेगळ्या प्रकारची, वेगळ्या धाटणीची करमणूक हवी आहे, असे संशोधनाअंती स्पष्ट झाल्यामुळेच वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या नव्या वाहिनीवरून दाखविले जातील, असे वाहिनीकडून सांगण्यात आले. लोकप्रिय अभिनेता असलेल्या सलमान खानला ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर केल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये वाहिनी लोकप्रिय करणे सोपे ठरणार असून आगामी एक ते दोन महिन्यांत ‘हिस्टरी’ वाहिनी सुरू होणार आहे.