मराठी विश्वकोश आता युनिकोडमध्ये!

Posted by Abhishek Thamke on १२:०० म.पू.
मराठी विश्वकोश आता डिजिटल स्वरूपात युनिकोड मध्ये ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. हा विश्वकोश

वेबसाइटच्या स्वरुपात प्रसिद्ध होणार असल्यामुळे जगात कुठेही बसून तो विनामूल्य पाहता येईल , असे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी ‘ महाराष्ट्र टाइम्स ’ ला सांगितले.

विश्वकोशाचा संपूर्ण पहिला खंड ३० सप्टेंबर पासून ऑनलाइन पाहता येईल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक या प्रमाणे टप्प्याटप्प्याने अन्य खंड वेबसाइटवर उपलब्ध केले जातील , असेही विजया वाड यांनी सांगितले. राज्य सरकार , सी-डॅक आणि मराठी विश्वकोश संयुक्तपणे हा प्रकल्प राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली.

विश्वकोशाच्या १७ व्या आणि १८ व्या खंडाचे काम सुधींद्र कुलकर्णी , आशिष महाबळ आणि वैभव पुराणिक यांच्या सहकार्याने होत आहे. या खंडाला डॉ. जयंत नारळीकर , डॉ. भालचंद्र नेमाडे , डॉ. स्नेहलता देशमुख , अरूंधती खांडेकर आणि रा.ग. जाधव या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी विश्वकोशाचा १९ वा खंड ३० जानेवारी २०१२ रोजी प्रकाशित होत आहे. १९ वा आणि २० वा हे दोन्ही खंड रंगीत आहेत. २० वा खंड २०१२ पर्यंत प्रसिध्द होईल. त्यानंतर २१ वा परिभाषा , २२ वा नकाशा आणि २३ वा सूची खंड प्रकाशित होणार आहे.

सध्या कुमार विश्वकोशाच्या वाचनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यात पाच शाळांतील दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हाच प्रयोग शिक्षण शास्त्र महाविद्यालयात तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये राबवणार असल्याचे विजया वाड यांनी सांगितले. जीवसृष्टी ते पर्यावरण या कुमार विश्वकोशाच्या दुस-या खंडाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. एकूण १२ खंडात हा प्रकल्प साकारणार असून डॉ. हेमचंद्र प्रधान हे समन्वयक म्हणून काम पहात आहेत , अशी माहिती वाड यांनी दिली.

कला चरित्र कोश यात राज्यातील सुमारे २५० कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून देणारा कन्या चरित्र कोश ३० जानेवारी रोजी प्रसिध्द होईल. बोलका विश्वकोश आणि सीडी याआधीच प्रसिध्द झाल्या आहेत. मराठी विश्वकोश विभागात नव्याने भरतीला परवानगी दिल्यानंतर राज्यातील अनेक जिज्ञासू तरूणांनी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचा फार मोठा फायदा पुढील काळात विश्वकोशाला होणार आहे. विज्ञान विभागतही तज्ज्ञ मंडळींचा समावेश करण्यात आला आहे. मानव्य विभाग डॉ. सु. रे. देशपांडे , विज्ञान विभाग डॉ. गोविंद फडके पहात आहेत , असेही वाड यांनी सांगितले.
Reactions: