आयपीएलच्या काळातही 10 मराठी चित्रपट प्रदर्शित


धनंजय पाठक - सकाळ वृत्तसेवा

सांगली - विश्‍वचषक आणि पाठोपाठ आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या झगामगाटातही 10 मराठी चित्रपट आले आणि गेले. तर एकेकच हिंदी व इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाले. मराठी चित्रपट एकच आठवडा टिकले. हिंदी व इंग्रजी चित्रपटांना रसिकांकडून दाद मिळणार नाही हे लक्षात घेऊन चित्रपट वितरकांनी एकही नवीन चित्रपट येथे आणलाच नाही. हिंदीत कॉमेडी व ऍक्‍शनवर गाजलेल्या "दबंग' स्टाईलची कॉपी असलेला "रेडी' या सलमान खानच्या प्रमुख भूमिकेतील चित्रपटाकडे वितरकांचे लक्ष लागून राहिले आहे.

बालगंधर्वांच्या जीवनशैलीवर प्रकाशझोत टाकणारा "बालगंधर्व', अभिनेते अशोक सराफ यांचा "कुणासाठी कुणी तरी' तर "पानिपत'कार विश्‍वास पाटील यांच्या कथेवर आधारित "पांगिरा' चित्रपट वेगवेगळ्या कथानकाची साक्ष देत आले. "भाऊंचा धक्का', सिद्धार्थ जाधव याचा "सुपरस्टार', सांगलीच्या विनया पाठकनिर्मित राजकारण 2014, सांगली, हरिपूरमध्ये चित्रित झालेला अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा "डावपेच', मध्यमवर्गीय कुटुंबीयांची जीवनशैली व अडचणी सांगणारा "ताऱ्यांचे बेट', अभिनेते संजय नार्वेकर यांचा "पाच नार एक बेजार', "राजमाता जिजाऊ' असे एकापाठोपाठ एक चित्रपट येत गेले.
इंग्रजीत विक्रम भट यांचा हॉटेंड थ्रिडी या रहस्यमय व इंग्रजीत "परसीस' व हिंदीमध्ये "धर्मात्मा' या नावाने आलेल्या चित्रपटास रसिकांची दाद मिळाली. स्वरूप चित्रमंदिराचे व्यवस्थापक हरी कुलकर्णी व शेखर कुलकर्णी म्हणाले, ""टीव्ही चॅनेल, सीडीचे प्रमाण वाढलेले असले, तरी चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येत घट नाही. हिंदी चित्रपटांमध्ये अभिषेक बच्चन याचा "दम मारो दम' तर अभिनेते नाना पाटेकर यांचा "शागिर्द', राजश्री प्रॉडक्‍शनचा "आय लव्ह यू कलाकार' तर "समुंदर के लुटेरे', रफ्तार का जुनून' आले. या चित्रपटांना आयपीएलचा फटका सहन करावा लागला.''

आनंद चित्रपटगृहाचे चालक आनंद आपटे म्हणाले, 'हिंदीपेक्षा नव्या मराठी चित्रपटांची संख्या वाढली आहे. मराठी रसिकही चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून येत असल्याचे चित्र आहे.''

जून ते ऑगस्टमध्ये येणारे मराठी चित्रपट -
स्त्री समस्यांचा मागोवा घेणारा "जन्म'
अंकुश चौधरी यांची तिहेरी भूमिका असलेला "ब्लफ मास्टर'
भरत जाधव यांचा "येड्याची जत्रा'
महेश मांजरेकर यांचा "फक्त तू लढ म्हण'
अवधूत गुप्ते यांचा "मोरया'

"हेरिटेज मॅनेजमेंट'मध्ये पुण्याच्या युवकाची भरारी


स्नेहा राईरीकर - सकाळ वृत्तसेवा

पुणे - जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांत भारतीयांनी नेहमीच आघाडी घेतली आहे. पुण्याच्या आनंद कानिटकर या तरुणाने हे पुन्हा सिद्ध केले आहे. "हेरिटेज मॅनेजमेंट'शी (सांस्कृतिक वारसा व्यवस्थापन) संबंधित "मास्टर्स इन कल्चरल लॅंडस्केप्स' पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झालेला तो पहिलाच आणि एकमेव भारतीय ठरला आहे.

या अभ्यासक्रमासाठी जगभरातून 64 जणामधून 11 जणांची निवड झाली. 2010 ते 12 असा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर फ्रान्स, इटली व जर्मनी या तीन विद्यापीठांकडून आनंदला "मास्टर्स' पदवी मिळणार आहे.

अभ्यासक्रमाचे पहिले सत्र फ्रान्समधील जॉन मोने विद्यापीठात त्याने पूर्ण केले. सध्या तो दुसऱ्या सत्रात इटलीतील नेपल्स येथे "फ्रेदरिको सेकोन्दो' विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिसरे सत्र जर्मनीतील स्टुटगार्ट विद्यापीठात होईल.

आनंद काही दिवसांसाठी पुण्यात आला असून, "सकाळ'शी बोलताना तो म्हणाला, ""सध्या "कल्चरल हेरिटेज वॉक्‍स' खूप होत आहेत. या सांस्कृतिक वारशाचे जतन कसे करावे, यावरही अनेकदा चर्चा होताना दिसते; पण "हेरिटेज' म्हणजे नक्की काय, त्याची प्रसिद्धी आणि जनजागृती कशी करावी, असे विषय आम्हाला शिकवले जातात.''

याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारा अभ्यासक्रम आपल्या देशात उपलब्ध नाही, याबद्दल त्याने खंत व्यक्त केली.

तो म्हणाला, ""इटलीसारख्या देशातील 45 स्थळे "जागतिक वारसा स्थळ यादीत' समाविष्ट झाली आहेत. मात्र, पाच हजार वर्षांची संस्कृती लाभलेल्या भारतातील केवळ 27 वारसा स्थळे या यादीत आहेत. यापूर्वी भारतातील छाऊ नृत्य, रामलीला इत्यादी कलाप्रकारांचा "जागतिक अमूर्त वारसा यादी'त समावेश झाला आहे. त्याशिवाय लावणी, संगीत नाटक, पंढराची वारी हे प्रकारही यादीत समाविष्ट होऊ शकतात. महाराष्ट्रातील काही किल्ले, लेण्यांचा यादीत समावेश होणे आवश्‍यक आहे. उत्तम सांस्कृतिक वारसा व्यवस्थापनामुळे हे शक्‍य होऊ शकेल.''