चला, महाराष्ट्र बदलू या! - मुख्यमंत्री

Posted by Abhishek Thamke on १०:३४ म.उ. with No comments
सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मंत्रालयातील, आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या दालनात बोलावून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या दालनाच्या बाहेर तासन्‌ तास पहारा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि उपाहारगृह कर्मचाऱ्यांनाही आपल्या दालनात बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. "महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मला तुमच्या सर्वांचे सहकार्य हवे आहे,' असे आवाहन त्यांनी या वेळी सर्वांना केले.

मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून शुभेच्छा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सारा कर्मचारी वर्ग भारावून गेला. मुख्यमंत्र्यांनी एक चांगला नवा पायंडा पाडल्याबद्दल कर्मचारी खूश होते. नववर्षाचा आज पहिलाच दिवस. मुख्यमंत्री आज दुपारी एकच्या दरम्यान मंत्रालयात आले. त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे सचिव, अधिकारी, कर्मचारी; तसेच मंत्रालयातील इतर विभागांचे सचिव यांना आपल्या दालनाला लागून असलेल्या समिती कक्षात बोलावले आणि त्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दहा-पंधरा मिनिटे त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, एका विशिष्ट परिस्थितीत माझ्यावर राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत, तसेच विकासाच्या संधीही आहेत. या संधींचा पुरेपूर फायदा घेऊन पारदर्शक व गतिमान प्रशासनाची प्रचीती आणून द्यायची आहे. राज्याच्या विकासाबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांच्या व माझ्याही वेगळ्या अपेक्षा आहेत. इथे येणाऱ्या माणसांची कामे झाली पाहिजेत. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सर्वसामान्य माणसांना मंत्रालयाचे सारखे खेटे घालावे लागणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या कामात गतिमानता व पारदर्शकता हवी असे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. "संपूर्ण राज्याचा समतोल विकास साधायचा आहे. राज्याची प्रतिमा उंचावण्यासाठी, राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे,' असे आवाहन त्यांनी सर्वांना केले
Reactions: