पानिपतचा समरप्रसंग

१४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे मराठा सैन्य यमुनेच्या रोखाने निघाले.

युद्धाची सुरवात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान झाली. गारदीच्या तोफा गरजल्या व समोर रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पठाणांवर प्रभाव पडला नाही.

गारदींच्या जोरदार हल्ल्यासमोर रोहिले व बर्खुदारखानाचा निभाव लागेना व त्यांचे हजारोंनी सैनिक मरून पडले. गारदीमागे दमाजी गायकवाड व विठ्ठल शिवदेव यांचे घोडदळही घुसले. मात्र, जखमी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली.

त्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या हुजुरातीसमोर वजीर शहावली खानाच्या पथकाशी युद्ध लागले. मराठ्यांचा हल्ला इतका यशस्वी होता की दुराणींना आपण युद्ध हरलो, असे वाटू लागले.

दुपारीच दोनला माघारी आलेल्या वजीराच्या सैनिकांमुळे मराठ्यांवर दबाव वाढला. तोफखाना बंद पडून इब्राहिम खान जखमी.

याचवेळी एक गोळी विश्‍वासरावांना लागल्याने ते मृत्युमुखी पडले. भाऊसाहेब घोड्यावरून दुराणी शहाला मारण्याच्या उद्देशाने पुन्हा त्वेषाने लढू लागले.

विश्‍वासराव पडल्याची बातमी पसरल्यावर मल्हारराव होळकर व शिंदे मागून रणांगण सोडून मार्ग काढीत दिल्लीकडे निघाले. भाऊसाहेबांवर नव्या दिशेने हल्ला झाला.

दुराणी शहाने स्वतःकडील सहा हजार ताज्या दमाचे सैन्य भाऊसाहेबांच्या दिशेने पाठविले. भाऊसाहेबांनी निकराने हल्ले चढविले. पठाण सैन्याच्या गर्दीत लढताना त्यांना शेवटी नाना फडणीसाने पाहिले.

सायंकाळी चार वाजता मराठा सैन्य जणू अदृश्‍य झाले. युद्धात व युद्धानंतर एकूण ८० हजार ते १ लाख मराठे मारले गेले.


पानिपतच्या अनुषंगाने रूढ झालेल्या म्हणी व वाक्‌प्रचार
१७६० भानगडी
एखाद्याचे पानिपत होणे
विश्‍वास तर पानिपतातच संपला
पाचावर धारण बसणे
वानराचे तेल काढणे
प्यादी मात
प्याद्याचा फर्जंद होणे
अटकेपार झेंडे लावणे

मराठी साहित्यातील 'पानिपत'

इ. स. १७६१ मध्ये महाराष्ट्राचे, एवढेच नव्हे; तर संपूर्ण भारताचे भवितव्य घडवणारी एक प्रलयकारी घटना घडली आणि ती म्हणजे पानिपत येथे लढले गेलेले मराठे व गिलचे (अफगाण) यांच्यातील युद्ध. या अतिभयंकर घटनेचे मराठी साहित्यात चित्र न उमटले तरच विशेष.

प्रत्यक्ष युद्ध जवळून पाहिलेल्यांनीही या युद्धाचा आढावा घेतलेला आहे. नाना फडणीसांचे आत्मवृत्त, पंडित काशिराज यांची बखर, भाऊसाहेबांची बखर व पानिपतची बखर या चार साहित्यकृती पायाभूत समजल्या पाहिजेत. नाना फडणीस हे पानिपत युद्धात सामील होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या मातु:श्री व पत्नीही तीर्थयात्रेच्या निमित्ताने होत्या. युद्ध हरल्यानंतर अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत फडणीस पुण्याला परतले खरे; परंतु आप्तांना वाचवू शकले नाहीत. वृद्ध आईला पाठीवर घेऊन परतीचा प्रवास करावा लागला. युद्धातील महत्त्वाच्या घटना व अनुभव यांचे यथार्थ वर्णन त्यांनी आत्मचरित्रात केले आहे.
काशिराज पंडित हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी; पण उत्तरेतील मोगल सरदार सुजाउदवला याच्या पदरी नोकरीस लागला व उच्चपदास पोचला. काशिराज पानिपतच्या लढाईत प्रत्यक्ष सहभागी होता. सुजा प्रत्यक्षात अब्दीलीला सामील होता व तो अब्दालीच्या बाजूने लढला; परंतु त्याचे मराठा सैन्याचा सेनापती सदाशिवरावभाऊ यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. युद्धात आपला विजय झाला तर आपण सुजाला मोगल बादशाहाची वजिरी मिळवून देऊ, असे भाऊसाहेबाने त्यास वचन दिले होते. त्यामुळे सुजाचा युद्धातील सहभाग डळमळीत होता व यात काशिराजाची शिष्टाई महत्त्वाची होती. काशिराजाने युद्धातील अनुभव बखररूपात लिहिले आहेत. मूळ लेखन फारसी भाषेत आहे; पण त्याचे भाषांतरही उपलब्ध आहे. सदाशिवरावभाऊ हत्तीवरून उतरून घोड्यावर बसला व स्वत: लढू लागल्याचे त्याने पाहिले आहे व भाऊचा मृत्यू झाला व त्याचे प्रेत ओळखले, अशी त्याची नोंद आहे; तसेच विश्‍वासराव लढाईत मारला गेल्यावर त्याच्या प्रेताची अवहेलना होऊ नये व त्याचा सन्मानाने अंत्यविधी व्हावा, याची त्याने दक्षता घेतली. भाऊसाहेबाची बखर ही पानिपतच्या लढाईवर आधारित आहे. कृष्णाजी शामराव व चिंतो कृष्ण वळे हे त्याचे लेखक आहेत. युद्ध संपल्यावर दोन-तीन वर्षांनी लिहिलेली आहे. लेखक प्रत्यक्ष युद्धकाळात मराठा सैन्याबरोबर होता. एका अर्थाने युद्धातून परत आलेल्या लोकांच्या साक्षींवरून ही बखर लिहिलेली आहे व त्यामुळे ती काही प्रमाणात पूर्वग्रहदूषित आहे, असे समजले जाते. पानिपतच्या शोकांतिकेला सदाशिवरावभाऊंचा हट्टी व तापट स्वभाव कारणीभूत झाला, अशी या बखरकारांची भूमिका आहे. राघोबादादाने अटकेपार मराठ्यांचा झेंडा लावला, याचा इतिहासही बखरीत आहे. नजीबखान, मल्हारराव होळकर व त्याची पत्नी गौतमबाई यांची व्यक्तिचित्रणे यात फार प्रभावीपणे रेखाटली आहेत.

पानिपतची बखर ही नानासाहेब पेशवे यांची पत्नी गोपिकाबाई हिच्या सांगण्यावरून रघुनाथ यादव चित्रे यांनी लिहिली. सदाशिवरावभाऊ हा या बखरीचा नायक. त्याचे शौर्य यथार्थपणे बखरीत मांडलेले आहे. मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, विश्‍वासराव इत्यादींची स्वभावचित्रेही प्रभावीपणे रेखाटलेली आहेत. युद्धवर्णनेही बहारदार आहेत. युद्धानंतरच्या पाच-सहा वर्षांत या बखरीचे लेखन झाले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळी "लालन द बैरागिण' ही इंग्रजीत कादंबरी लिहिली गेली. या कादंबरीची नायिका लालन बैरागिण आहे. पानिपत लढाईत सहभागी झालेला प्रख्यात मराठा सरदार महादजी शिंदे यांची ती प्रेयसी आहे. या कथानकातील काही पात्रे वास्तव आहेत; पण लालनसारखे पात्र काल्पनिक आहे. पानिपतावरचे हे पहिलेच ललित लेखन. त्याचे जोरवेकर यांनी मराठीत भाषांतर केले आहे. याच गोष्टीचा आधार घेऊन नागेश विनायक बापट यांनी सन १८९७ मध्ये "पानिपतची मोहीम' ही साडेसहाशे पृष्ठांची कादंबरी लिहिली. महादजी शिंदे यांच्या प्रेमात पडलेली लालन त्यांच्या शोधार्थ सर्व हिंदुस्थानभर फिरते व शेवटी पानिपत येथील मराठ्यांच्या छावणीत पोचते. युद्धाच्या अंतिम टप्प्यात अब्दालीचा सरदार सुजाउदवला याला आपल्या बाजूला वळवण्याच्या नाजूक व धोकादायक योजनेची अंमलबजावणी महादजी व सदाशिवरावभाऊ लालनवर सोपवतात. लालन त्यात कितपत यशस्वी होते, हे रहस्यमय कथानक मुळातून वाचणे अधिक रोचक ठरेल. या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्तीही अनंतराव कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केली आहे; तसेच बापटांच्या कादंबरीतील लालन बैरागिण हिच्या व्यक्तिमत्त्वाने मोहित होऊन शिरीष पै यांनी छोटेखानी कादंबरी लिहिली आहे. त्याला प्रबोधनकार ठाकरे यांची सुंदर प्रस्तावनाही आहे.
बापटांनी "पानिपतची मोहीम' या पुस्तकात मराठ्यांचे युद्धातील शौर्य प्रभावीपणे मांडले आहे; परंतु भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांना पानिपत युद्ध ही मोठी शोकांतिका वाटते. त्या भूमिकेतून त्यांनी "दुर्दैवी रंगू' ही कादंबरी लिहिली. रंगू या विधवेचे विश्‍वासरावावर प्रेम बसते; परंतु ते यशस्वी होत नाही, असे या कादंबरीचे कथानक आहे. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी पानिपत युद्धानंतर घडलेल्या "तोतया'च्या बंडावर आधारित नाटक लिहिले आहे.

सन १९८८ मध्ये विश्‍वास पाटील यांची "पानिपत' ही कादंबरी प्रसिद्ध झाली. हट्टी व अहंकारी सेनापती अशी बखरकारांनी रंगवलेली सदाशिवरावभाऊची प्रतिमा विश्‍वास पाटलांना अन्यायकारक वाटली आणि त्याला न्याय देण्यासाठी हेतूने त्यांनी ही कादंबरी लिहिली. जिवंत व्यक्तिचित्रण, उत्कृष्ट संवाद, ओघवती भाषा ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत. मराठी सारस्वताने "पानिपत' या घटनेस योग्य न्याय दिला हे खरे.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा!

सकाळ वृत्तसेवा

जेव्हा जेव्हा दिल्ली अडचणीत आली, तेव्हा तिच्या मदतीला धावला महाराष्ट्र. इतिहासाची पाने उलगडताना अगदी आजपर्यंत याचे दाखले मिळतात. असाच एक दाखला भारत इतिहास संशोधक मंडळाने जतन केला आहे. दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांना दिल्लीची जबाबदारी अक्षरशः आमंत्रण देऊन सोपवली होती, याचा पुरावा असणारे एक अस्सल फर्मान मंडळात आहे. पानिपतच्या लढ्याच्या आधीच्या दहा वर्षांतले हे फर्मान असल्याने त्याला आगळे महत्त्व आहे.

सन 1754 ते 1759 या काळात मुघल बादशहा दुसरा अलमगीर अझिजुद्दिन महंमद हा दिल्लीच्या तख्तावर होता. 1747 पासून अहमदशहा अब्दालीच्या भारतावरच्या स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या. पानिपतचे युद्ध होईपर्यंत म्हणजे 1761 पर्यंत अब्दालीने भारतावर एकूण पाच वेळा स्वारी केली. त्यातल्या चौथ्या मोहिमेनंतर राघोबादादांनी अब्दालीच्या मुलाला तैमूरला पळवून लावत अटकेपार मराठी राज्याचा झेंडा फडकवला. त्यानंतरच्या अब्दालीच्या स्वारीत घडले ते "पानिपत'. दरम्यानच्या काळात दिल्लीचा मुघल दरबार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होता.

वास्तविक पाहता 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा उत्तरेतला प्रभाव वाढत होता. त्याला कळस चढला तो 17व्या शतकातल्या सहाव्या दशकात. 1754 ते 1759 या काळात दिल्लीचा बादशहा आलमगीर दुसरा याला सतत आपल्या राज्याची चिंता वाटत होती. एका बाजूला अब्दालीच्या आक्रमणाचे भय होते, तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत दगाफटक्‍याची टांगती तलवार त्याच्या डोक्‍यावर होती. त्याच स्थितीत त्याने मराठ्यांच्या नावे एक फर्मान पाठविले. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, त्याने हे फर्मान आपल्या दरबारी पद्धतीतून न पाठविता आपल्या खास दूताच्या हस्ते पुण्याकडे रवाना केले होते. मात्र, याला फारसा दुजोरा मिळत नाही.

आपल्या सही-शिक्‍क्‍याचे हे फर्मान आलमगीराने थेट सदाशिवराव पेशव्यांच्या नावे पाठविले होते. बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांचाही त्यात उल्लेख होता. या फर्मानात तीन विनंत्या करण्यात आल्या होत्या. मराठ्यांनी बादशहाच्या रक्षणासाठी फौज तैनात करावी, असे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे आवाहन त्यात होते. दिल्लीचा वझीर आणि मीरबक्षी (सैन्याचे पगारपाणी पाहणारा अधिकारी किंवा आताच्या भाषेत पे-मास्टर जनरल) या दोन्ही पदांवर मराठ्यांनीच आपली माणसे नेमावीत, हे दुसरे आवाहन बादशहाने केले होते. त्या वेळी बादशहा एवढा अगतिक झाला होता, की सरळ नामधारी बादशहा म्हणून राहून मराठ्यांच्या ताब्यात हिंदुस्थानची सत्ता सोपवण्याचीही त्याची तयारी झाली होती, हे तिसऱ्या आवाहनावरून दिसते. मराठ्यांनी बादशहासाठी तनखा सुरू करावा, असे हे तिसरे आवाहन आहे.

पर्शियन भाषेचे अभ्यासक राजेंद्र जोशी यांनी या फर्मानाचा अभ्यास केला आहे. त्यांनीच या फर्मानाची माहिती "सकाळ'शी बोलताना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम आबासाहेब मुजुमदार यांनी 1920 मध्ये या फर्मानाची माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर इतिहासकार ग. ह. खरे यांनीही त्या फर्मानाचा अभ्यास केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या फर्मानाचा अभ्यास होत आहे.

श्री. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठ्यांनी बादशहासाठी तनखा सुरू केला, तसेच अंताजी माणकेश्‍वर या आपल्या सरदाराला बादशहाच्या रक्षणासाठी पाठविले. फर्मानातली तिसरी गोष्ट मराठ्यांनी केली नाही, ती म्हणजे दिल्लीतल्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी स्वतःकडे घेणे. त्या काळात दिल्लीच्या तिजोरीत खडखडाट होता, त्यामुळेच मराठ्यांनी हे उत्तरदायित्व स्वतःकडे घेतले नसावे, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

हे फर्मान म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा. मराठी साम्राज्याची ताकद कळसाला पोहोचल्याचा हा संकेत होता.
- पांडुरंग बलकवडे, इतिहासाचे अभ्यासक.

चला, महाराष्ट्र बदलू या! - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मंत्रालयातील, आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या दालनात बोलावून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या दालनाच्या बाहेर तासन्‌ तास पहारा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि उपाहारगृह कर्मचाऱ्यांनाही आपल्या दालनात बोलावून मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. "महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी मला तुमच्या सर्वांचे सहकार्य हवे आहे,' असे आवाहन त्यांनी या वेळी सर्वांना केले.

मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून शुभेच्छा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सारा कर्मचारी वर्ग भारावून गेला. मुख्यमंत्र्यांनी एक चांगला नवा पायंडा पाडल्याबद्दल कर्मचारी खूश होते. नववर्षाचा आज पहिलाच दिवस. मुख्यमंत्री आज दुपारी एकच्या दरम्यान मंत्रालयात आले. त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे सचिव, अधिकारी, कर्मचारी; तसेच मंत्रालयातील इतर विभागांचे सचिव यांना आपल्या दालनाला लागून असलेल्या समिती कक्षात बोलावले आणि त्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दहा-पंधरा मिनिटे त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, एका विशिष्ट परिस्थितीत माझ्यावर राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत, तसेच विकासाच्या संधीही आहेत. या संधींचा पुरेपूर फायदा घेऊन पारदर्शक व गतिमान प्रशासनाची प्रचीती आणून द्यायची आहे. राज्याच्या विकासाबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांच्या व माझ्याही वेगळ्या अपेक्षा आहेत. इथे येणाऱ्या माणसांची कामे झाली पाहिजेत. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सर्वसामान्य माणसांना मंत्रालयाचे सारखे खेटे घालावे लागणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या कामात गतिमानता व पारदर्शकता हवी असे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. "संपूर्ण राज्याचा समतोल विकास साधायचा आहे. राज्याची प्रतिमा उंचावण्यासाठी, राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मला तुमचे सहकार्य हवे आहे,' असे आवाहन त्यांनी सर्वांना केले