मराठी चित्रपटांना मराठीचीच स्पर्धा!

Posted by Abhishek Thamke on १०:११ म.पू. with No comments
अटकेपारच नव्हे, तर दुबई-कॅलिफोर्नियापार पोचलेल्या मराठी चित्रपटाने गेल्या काही वर्षांत मोठी मजल मारली आहे. वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांवरील चित्रपट बनत आहेत. मात्र, बदलत्या काळात वाढलेल्या संख्येमुळे मराठीला हिंदीची स्पर्धा करण्याऐवजी मराठी चित्रपटांचीच स्पर्धा जाणवू लागल्याचे चित्र आहे. दि. 24 डिसेंबर 2010 रोजी एकाच दिवशी पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

"आघात', "ऑन ड्यूटी 24 तास', "हंगामा', "चल धरपकड' आणि "आजी आणि नात' हे पाच चित्रपट एकाच दिवशी पुण्यात प्रदर्शित होत आहेत. नाताळ आणि सुट्यांचा मुहूर्त हे प्रमुख कारण आहेच, शिवाय पुढील वर्षी होणाऱ्या पुरस्कारांसाठी आणि चित्रपट महोत्सवांसाठी सन 2010 या वर्षात चित्रपट प्रदर्शित करण्याची घाईदेखील त्यामागे आहे. याच दिवशी "तीस मार खान', "टूनपूर का सुपरहिरो' आणि "इसी लाइफ में' असे तीन मोठे चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. "तीस मार खान'ने एक पडदा चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्‍स खाऊन टाकलेली असताना हे पाच मराठी चित्रपट हिंदीशी आणि मराठीशीही स्पर्धेचे आव्हान कसे पेलणार, याचीही उत्सुकता आहे.

"ऑन ड्यूटी 24 तास'चे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, ""ऑगस्टमध्ये या चित्रपटाची सुरवात केली, तेव्हाच 24 डिसेंबर ही प्रदर्शनाची तारीख मी नक्की केली होती. माझा चित्रपट खास सुटीच्या मोसमासाठीचा आहे. चित्रपटाच्या शैलीला साजेसाच काळ प्रदर्शनासाठी निवडला पाहिजे. मी तसा निवडला आहे. पोलिस दलात भरती झालेल्या 15 ताज्या दमाच्या शिलेदारांची कहाणी आम्ही दाखवली आहे. प्रेक्षकांना ती आवडेल, असा विश्‍वास आहे.''

विक्रम गोखले यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या "आघात'चे निर्माते मोहन दामले म्हणाले, ""आधी 17 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न होता, पण ते शक्‍य झाले नाही. आता अन्य चार चित्रपटांची स्पर्धा करावी लागणार आहेच. एकाच दिवशी पाच चित्रपट प्रदर्शित होणे मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रगतीचे पाऊल असले, तरी एका प्रकारे घातक आहे. चित्रपटगृहेदेखील त्यामुळे उपलब्ध नसल्याने "प्रभात'ला आमचा चित्रपट लागणार नसल्याची खंत आहेच.''

महिनाअखेर असताना आणि आधीच मराठी प्रेक्षकांचे चित्रपटासाठीचे बजेट कमी असताना एवढे चित्रपट एकत्र येणे नुकसानकारक असल्याचे वितरक मिलिंद लेले यांनी सांगितले. निर्मात्यांनी थोडे सामंजस्याने आणि नियोजनपूर्वक आखणी केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

"चल धरपकड'चे दिग्दर्शक आत्माराम धरणे म्हणाले, ""जो चित्रपट चांगला असेल, तोच चालणार आहे. अन्य चार चित्रपटांची स्पर्धा आम्हालाही जाणवणार आहेच. तरीही एका दिवशी एवढे चित्रपट येऊ नयेत, हेही खरे आहे.''

महोत्सवासाठी पाठविण्यासाठी "आजी आणि नात' या वर्षीच प्रदर्शित करण्याचे ठरले होते, असे निर्माते अंकुश मोरे यांनी सांगितले. आपल्या चित्रपटाचे साधे-सोपे नाव, सुलभा देशपांडे यांची भूमिका आणि "माउथ-पब्लिसिटी' यांवर चित्रपट प्रेक्षकांना आकर्षून घेईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
Reactions: