इतरांना प्रेम द्या!

Posted by Abhishek Thamke on १०:०८ म.पू. with No comments
वयाच्या साठीनंतर शरीर व मनाची थकण्यास सुरवात होते. वृद्धावस्था सुखकारक होण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, योगा, आहार यांची मदत घेऊन समाधान, शांती मिळविता येते हे आयुर्वेद, अध्यात्म, विज्ञान, ज्ञान आदीने सिद्ध केलेच आहे.

भारतीय संस्कृतीत विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांच्या मदतीने मानव स्वतःचा उत्कर्ष करू लागतो. मुलांचे मागच्या पिढीकडे म्हणजेच आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते असा वृद्ध मातापित्यांचा कधी समज तर कधी गैरसमज होतो. यातूनच वृद्ध मातापित्यांना एकाकीपण येते व त्यांचे एकाकी जीवन सुरू होते, असे निरीक्षणाअंती दिसते.

आई-वडिलांची वृद्धावस्था ही समाजातील स्वतःचे अस्तित्व निर्माण करून, मान-सन्मान उपभोगून, स्थिरस्थावर होऊन, मुलांच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन नंतर आलेली असते. या काळात मुलांच्या उत्कर्षाच्या वाटचालीला सुरवात झालेली असते. त्यांना त्यांचे अस्तित्व आता सिद्ध करायचे असते. सामाजिक मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळविण्याची त्यांची धडपड चालू असते. अशा अवस्थेत वृद्ध आई-वडिलांनी काय करावे? मुलांना आपल्या कौटुंबिक व सामाजिक स्तराप्रमाणे आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्याची आवश्‍यकता असते. त्यांना त्या दृष्टीने धडपड करायची असते. अशा वेळी वृद्ध मातापित्यांनी वृद्धावस्थेचे, एकाकीपणाचे दुःख सांगून त्यांना व त्यांच्या वाटचालीला अंकुश लावणे योग्य आहे का?

मुलांच्या विचारशक्तीला, मानसिक विकासाला आपणच उत्तेजन देऊन मोठे केलेले असते. अशा वेळी त्यांच्याशी, त्यांच्या जीवनशैलीशी तडजोड करणे हितावह नाही का? आपणच आपल्या मुलांच्या वाटचालीत "स्पीडब्रेकर' होणे कोणत्याही मातापित्यांना आवडणार नाही.
Reactions: