समन्वय-पीठाचा कुलगुरू

Posted by Abhishek Thamke on ५:२३ म.उ. with No comments
देवदत्त दाभोलकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांना एक वडीलधारे माणूस आपल्यातून गेले, असे निश्‍चितच वाटले असेल. हे वडीलधारेपण दाभोलकरांकडे चालून आले ते त्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचा वसा सांभाळल्यामुळे हे तर खरेच; पण त्याचबरोबर त्यांचा ऋजू स्वभाव आणि समाजाच्या भल्याची त्यांना अखंड लागून राहिलेली चिंता यामुळे हे नाते तयार झाले होते. तब्बल नऊ दशकांचे आयुष्य त्यांना लाभले. शेवटचा आजारपणाचा काही काळ वगळता "जे आपणासी ठावे, ते इतरांना सांगावे...' हा त्यांचा क्रम अविरत चालू होता. कारण त्यांच्या साऱ्या आयुष्याला एका व्यापक सामाजिक ध्येयवादाचे कोंदण लाभले होते. त्यासाठी त्यांनी कार्यक्षेत्र निवडले ते शिक्षकाचे. केवळ शाळा, महाविद्यालये यांच्या भिंतींआड दिले जाणारे शिक्षण नव्हे; तर समाजाच्या आमूलाग्र पुनर्रचनेच्या संदर्भातील शिक्षण. त्यासाठी अनुकूल अशी जनमानसाची जडणघडण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे त्यांनी मानले आणि हा वसा अखेरपर्यंत सांभाळला. या कार्याची महती नेमकी काय, हे आज विशीत किंवा तिशीत असलेल्यांना मुद्दाम समजावून सांगावे लागेल. कारण माध्यमस्फोटाच्या सध्याच्या काळात राजकीय-सामाजिक घडामोडींवर "इन्स्टंट' प्रतिक्रिया देणारे म्हणजे "विचारवंत' असे समीकरण तयार होऊ पाहात आहे. मात्र कृतिशील विचारवंत म्हणजे काय याचे उदाहरण म्हणजे दाभोलकरांचे जीवन.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकाच्या संधिकालात समाज स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहू लागला. प्रबोधनाचे हे पहिलेवाहिले किरण होते. "विचारकलहास का भिता,' असा सवाल आगरकरांनी केला तो याच काळात. दुर्दैवाने महाराष्ट्राची परिस्थिती स्वातंत्र्यानंतरच्या काळात उत्तरोत्तर बिघडत गेली आणि विचारकलहाची जागा नुसत्याच कलहाने घेतली. जातीय, प्रादेशिक, भाषिक किंवा धार्मिक अस्मितांचे अंगार फुलले आणि फुलविले जाऊ लागले. एकीकडे हे चित्र आणि दुसरीकडे अगदी पुरोगामी म्हणविणाऱ्यांमध्येही आक्रस्ताळेपणा जितका जास्त तितका तो अधिक क्रांतिकारक असे मानण्याचा प्रघात रूढ झाला. "समाजात क्षोभ निर्माण करण्यापेक्षा विचार निर्माण करणे हे कितीतरी महत्त्वाचे आणि कठीण कार्य असते', असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत असत. असे कठीण काम हातात घेऊन ते निष्ठेने करणाऱ्यांमध्ये देवदत्त दाभोलकर एक होते. सर्वच प्रकारच्या झगमगाटापासून दूर राहत शांतपणे दाभोलकर आपले काम करीत राहत. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे, यावर त्यांची श्रद्धाच होती. त्यांच्या दृष्टीने ही एक "सायलेंट रिव्होल्युशन' होती. "नवभारत'चे त्यांचे शिक्षणाला वाहिलेले विशेषांक याचीच साक्ष देतात. "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन'च्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य या दृष्टीने उल्लेखनीय आहे. दाभोलकर अर्थशास्त्राचे अभ्यासक. अंत्योदयाचा विचार त्यांच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासात केंद्रस्थानी होता. दाभोलकरांच्या विचारनिष्ठेमुळेच विनोबा भावे यांनी "आचार्यकुला'चे सदस्य म्हणून त्यांना निवडले होते. विनोबांना जे "अनुशासन पर्व' अभिप्रेत होते, त्यात समाजाला शिक्षकाच्या भूमिकेतून वळण लावण्याचा विचार होता. दाभोलकरांसारखे लोकच हे काम करू शकतील, असा त्यांना विश्‍वास वाटत होता. आणीबाणीच्या काळात दाभोलकर पुणे विद
्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहत होते. या अस्थिर कालखंडातही त्यांनी कुलगुरुपदावर आपला ठसा उमटविलाच. आपल्या मुलाने आणीबाणीविरोधी सत्याग्रहात भाग घेतला तर आपले कुलगुरुपद अडचणीत येऊ शकते, हे माहीत असूनदेखील त्यांनी मुलाला विरोध केला नाही. अर्थात त्यांना स्वतःला जयप्रकाशांचे आंदोलन आणि जनता पक्षाचा प्रयोग याविषयी आस्था वाटत होती. ती केवळ कॉंग्रेसविरोधातून किंवा द्वेषातून नव्हे; तर विकसनशील देशात समर्थ राजकीय पर्याय होणे लोकशाही स्थिरावण्याच्या दृष्टीनेही आवश्‍यक असते, हा विचार त्यामागे होता. उजव्या आणि डाव्यांनी एकत्र येऊन काही प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हा समन्वयाचा विचार हे दाभोलकरांचे वैशिष्ट्यच होते. हा समन्वयाचा सूर अनेकांना रुचला नाही; परंतु जनता पक्षाच्या प्रयोगाचा विचका झाल्यानंतरही दाभोलकरांनी हा विचार कधी सोडला नव्हता. त्यांचा समन्वयवाद म्हणजे भोंगळपणा नव्हता, तर त्यामागे समाजाला उपकारक असा उदारमतवाद आणि भिन्न विचार समजावून घेण्याची सहिष्णुता होती. आज ती दिवसेंदिवस दुर्मिळ होताना दिसते आहे आणि लोकशाही तत्त्वे पायदळी तुडविली जात आहेत. अशा काळात दाभोलकरांचे विवेकाचे बोल हा एक मोठाच आधार होता.
Reactions: