संगणकावर मराठी वापरणे सहज शक्‍य

सकाळ वृत्तसेवा

संगणकावर मराठीचा इंग्रजीसारखा विश्‍वव्यापी वापर करता येतो आणि जगभरात तो कोठेही वाचला जातो, यावर ज्यांचा विश्‍वास नव्हता, अशांना आज आश्‍चर्याचा धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राने साहित्य संमेलनात "युनिकोड ः संगणकावर मराठीचा वापर व त्याचे प्रमाणीकरण' या विषयावर कार्यशाळा घेतली. त्यात मराठीच्या सुलभीकरणाचा उपस्थितांना प्रत्यय आला. राममोहन खानापूरकर यांनी याचे प्रात्यक्षिक दाखविले.

आपल्या घरी संगणक असतो; पण त्यात आपण भारतीय भाषांचा सॉफ्टवेअर न टाकताही आपली मातृभाषा केवळ युनिकोडच्या माध्यमातून वापरू शकतो. इतकेच नव्हे, तर त्यात मराठी भाषेची सोय अगोदरच केलेली असते, हे खानापूरकर यांनी दाखवून दिले. कार्यशाळेमुळे मराठीचा वापर आपण आपल्या संगणकावर घरबसल्या करू शकतो, याचा आनंददायी आत्मविश्‍वास उपस्थितांना आला. त्यामुळे या युनिकोडची माहिती असलेली पुस्तिका मिळविण्यासाठी कार्यशाळेनंतर रसिकांची झुंबड उडाली होती

अमिताभने मानले महाराष्ट्राचे आभार

महाराष्ट्रामुळे आपणास नावलौकिक प्राप्त झाला म्हणून आपण मराठी चित्रपटाची निर्मिती केली. मराठी चित्रपटसृष्टी एक पाऊल आणखी पुढे टाकीत आहे, याचा आपणास आनंद आहे. कलेला प्रोत्साहन देणे हे आपले काम आहे आणि आपण ते नेहमीच केले आहे. भाषा आणि आपली कला देश-विदेशात जात आहे, याचा आनंद आहे, असे अमिताभ बच्चन मिफ्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म ऍण्ड थिएटर अवॉर्ड) पुरस्कार सोहळ्यात म्हणाले.

मिफ्टाच्या रंगात नाहला मराठी दुबईकर!

दुबईतील पलाडियम ऑडिटोरियम येथे रंगलेल्या मिफ्टा (मराठी इंटरनॅशनल फिल्म ऍण्ड थिएटर अवॉर्ड) पुरस्कार सोहळ्यात "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट; तर याच चित्रपटासाठी संतोष मांजरेकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिफ्टा पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार "झिंग चिक झिंग' या चित्रपटासाठी भरत जाधव आणि "मी शिवाजीराजे...'साठी सचिन खेडेकर यांना विभागून देण्यात आला; तर "मुंबई-पुणे-मुंबई' या चित्रपटासाठी मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.

"अश्‍वमी फिल्म' आणि "राजा-राणी ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईतील पलाडियम ऑडिटोरियममध्ये रंगतदार वातावरणात पार पडलेल्या मिफ्टा सोहळ्यात दुबईतल्या मराठी माणसांसह तेथील अरबी समुदायही रंगला होता. सोहळ्याला मराठी दुबईकर रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. एकापाठोपाठ एक दिले जाणारे पुरस्कार आणि त्यासोबत असलेल्या धम्माल मनोरंजनात रसिक न्हाऊन निघाले.

बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्याने सोहळ्याला चार चांद लागले होते. त्यांनी मराठी भाषा आणि कलावंताचे अभिनंदन केले आणि यापुढेही असाच प्रकारे मराठी पताका जगभरात दिमाखात फडकत राहू दे, अशा शुभेच्छाही दिल्या. त्यांनी बनविलेल्या "विहीर' या चित्रपटासाठी दोन पुरस्कार देण्यात आले. अँथोनी रुबीन आणि प्रमोद थॉमस यांना "विहीर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचा; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळविणारा चित्रपट म्हणून "विहीर'चा सन्मान करण्यात आला.

संगीत विभागात "नटरंग'ने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट गायक म्हणून "खेळ मांडला...' या गाण्यासाठी; तर सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून "वाजले की बारा...' या गाण्यासाठी अनुक्रमे अजय गोगावले आणि बेला शेंडे यांना पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही याच चित्रपटाने पटकाविला. सर्वोत्कृष्ट गीतांचा पुरस्कार "जोगवा' चित्रपटासाठी संजय पाटील यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट खलनायक समीर धर्माधिकारी (लालबाग-परळ), सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार स्वप्नील जोशी (मुंबई-पुणे-मुंबई), सर्वोत्कृष्ट कथा जयंत पवार (लालबाग-परळ), पटकथा परेश मोकाशी (हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी) आणि संवादाचा पुरस्कार संजय पवार व महेश मांजरेकर यांना विभागून देण्यात आला. शिरीष पारकर यांनी मराठीचा झेंडा सगळीकडे फडकला पाहिजे, असे सांगितले. सोहळ्यादरम्यान प्रकाश आणि मंदा आमटे यांना "गर्व महाराष्ट्राचा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

कलाकारांचा क्रिकेट सामना
कलाकार आणि तेथील महाराष्ट्र मंडळाचे सदस्य यांच्यामध्ये एक क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. दुबईच्या भव्य स्टेडियमवर शुक्रवारी (ता. 18) झालेल्या या सामन्यात बाजी मारली ती महेश मांजरेकर यांच्या संघाने. त्यांनी दुबई येथील महाराष्ट्र मंडळ संघाचा पराभव केला.

मराठी चित्रपटांना मराठीचीच स्पर्धा!

अटकेपारच नव्हे, तर दुबई-कॅलिफोर्नियापार पोचलेल्या मराठी चित्रपटाने गेल्या काही वर्षांत मोठी मजल मारली आहे. वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांवरील चित्रपट बनत आहेत. मात्र, बदलत्या काळात वाढलेल्या संख्येमुळे मराठीला हिंदीची स्पर्धा करण्याऐवजी मराठी चित्रपटांचीच स्पर्धा जाणवू लागल्याचे चित्र आहे. दि. 24 डिसेंबर 2010 रोजी एकाच दिवशी पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

"आघात', "ऑन ड्यूटी 24 तास', "हंगामा', "चल धरपकड' आणि "आजी आणि नात' हे पाच चित्रपट एकाच दिवशी पुण्यात प्रदर्शित होत आहेत. नाताळ आणि सुट्यांचा मुहूर्त हे प्रमुख कारण आहेच, शिवाय पुढील वर्षी होणाऱ्या पुरस्कारांसाठी आणि चित्रपट महोत्सवांसाठी सन 2010 या वर्षात चित्रपट प्रदर्शित करण्याची घाईदेखील त्यामागे आहे. याच दिवशी "तीस मार खान', "टूनपूर का सुपरहिरो' आणि "इसी लाइफ में' असे तीन मोठे चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. "तीस मार खान'ने एक पडदा चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्‍स खाऊन टाकलेली असताना हे पाच मराठी चित्रपट हिंदीशी आणि मराठीशीही स्पर्धेचे आव्हान कसे पेलणार, याचीही उत्सुकता आहे.

"ऑन ड्यूटी 24 तास'चे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, ""ऑगस्टमध्ये या चित्रपटाची सुरवात केली, तेव्हाच 24 डिसेंबर ही प्रदर्शनाची तारीख मी नक्की केली होती. माझा चित्रपट खास सुटीच्या मोसमासाठीचा आहे. चित्रपटाच्या शैलीला साजेसाच काळ प्रदर्शनासाठी निवडला पाहिजे. मी तसा निवडला आहे. पोलिस दलात भरती झालेल्या 15 ताज्या दमाच्या शिलेदारांची कहाणी आम्ही दाखवली आहे. प्रेक्षकांना ती आवडेल, असा विश्‍वास आहे.''

विक्रम गोखले यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या "आघात'चे निर्माते मोहन दामले म्हणाले, ""आधी 17 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न होता, पण ते शक्‍य झाले नाही. आता अन्य चार चित्रपटांची स्पर्धा करावी लागणार आहेच. एकाच दिवशी पाच चित्रपट प्रदर्शित होणे मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रगतीचे पाऊल असले, तरी एका प्रकारे घातक आहे. चित्रपटगृहेदेखील त्यामुळे उपलब्ध नसल्याने "प्रभात'ला आमचा चित्रपट लागणार नसल्याची खंत आहेच.''

महिनाअखेर असताना आणि आधीच मराठी प्रेक्षकांचे चित्रपटासाठीचे बजेट कमी असताना एवढे चित्रपट एकत्र येणे नुकसानकारक असल्याचे वितरक मिलिंद लेले यांनी सांगितले. निर्मात्यांनी थोडे सामंजस्याने आणि नियोजनपूर्वक आखणी केली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

"चल धरपकड'चे दिग्दर्शक आत्माराम धरणे म्हणाले, ""जो चित्रपट चांगला असेल, तोच चालणार आहे. अन्य चार चित्रपटांची स्पर्धा आम्हालाही जाणवणार आहेच. तरीही एका दिवशी एवढे चित्रपट येऊ नयेत, हेही खरे आहे.''

महोत्सवासाठी पाठविण्यासाठी "आजी आणि नात' या वर्षीच प्रदर्शित करण्याचे ठरले होते, असे निर्माते अंकुश मोरे यांनी सांगितले. आपल्या चित्रपटाचे साधे-सोपे नाव, सुलभा देशपांडे यांची भूमिका आणि "माउथ-पब्लिसिटी' यांवर चित्रपट प्रेक्षकांना आकर्षून घेईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

इतरांना प्रेम द्या!

वयाच्या साठीनंतर शरीर व मनाची थकण्यास सुरवात होते. वृद्धावस्था सुखकारक होण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम, योगा, आहार यांची मदत घेऊन समाधान, शांती मिळविता येते हे आयुर्वेद, अध्यात्म, विज्ञान, ज्ञान आदीने सिद्ध केलेच आहे.

भारतीय संस्कृतीत विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांच्या मदतीने मानव स्वतःचा उत्कर्ष करू लागतो. मुलांचे मागच्या पिढीकडे म्हणजेच आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते असा वृद्ध मातापित्यांचा कधी समज तर कधी गैरसमज होतो. यातूनच वृद्ध मातापित्यांना एकाकीपण येते व त्यांचे एकाकी जीवन सुरू होते, असे निरीक्षणाअंती दिसते.

आई-वडिलांची वृद्धावस्था ही समाजातील स्वतःचे अस्तित्व निर्माण करून, मान-सन्मान उपभोगून, स्थिरस्थावर होऊन, मुलांच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन नंतर आलेली असते. या काळात मुलांच्या उत्कर्षाच्या वाटचालीला सुरवात झालेली असते. त्यांना त्यांचे अस्तित्व आता सिद्ध करायचे असते. सामाजिक मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळविण्याची त्यांची धडपड चालू असते. अशा अवस्थेत वृद्ध आई-वडिलांनी काय करावे? मुलांना आपल्या कौटुंबिक व सामाजिक स्तराप्रमाणे आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्याची आवश्‍यकता असते. त्यांना त्या दृष्टीने धडपड करायची असते. अशा वेळी वृद्ध मातापित्यांनी वृद्धावस्थेचे, एकाकीपणाचे दुःख सांगून त्यांना व त्यांच्या वाटचालीला अंकुश लावणे योग्य आहे का?

मुलांच्या विचारशक्तीला, मानसिक विकासाला आपणच उत्तेजन देऊन मोठे केलेले असते. अशा वेळी त्यांच्याशी, त्यांच्या जीवनशैलीशी तडजोड करणे हितावह नाही का? आपणच आपल्या मुलांच्या वाटचालीत "स्पीडब्रेकर' होणे कोणत्याही मातापित्यांना आवडणार नाही.

समन्वय-पीठाचा कुलगुरू

देवदत्त दाभोलकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांना एक वडीलधारे माणूस आपल्यातून गेले, असे निश्‍चितच वाटले असेल. हे वडीलधारेपण दाभोलकरांकडे चालून आले ते त्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाचा वसा सांभाळल्यामुळे हे तर खरेच; पण त्याचबरोबर त्यांचा ऋजू स्वभाव आणि समाजाच्या भल्याची त्यांना अखंड लागून राहिलेली चिंता यामुळे हे नाते तयार झाले होते. तब्बल नऊ दशकांचे आयुष्य त्यांना लाभले. शेवटचा आजारपणाचा काही काळ वगळता "जे आपणासी ठावे, ते इतरांना सांगावे...' हा त्यांचा क्रम अविरत चालू होता. कारण त्यांच्या साऱ्या आयुष्याला एका व्यापक सामाजिक ध्येयवादाचे कोंदण लाभले होते. त्यासाठी त्यांनी कार्यक्षेत्र निवडले ते शिक्षकाचे. केवळ शाळा, महाविद्यालये यांच्या भिंतींआड दिले जाणारे शिक्षण नव्हे; तर समाजाच्या आमूलाग्र पुनर्रचनेच्या संदर्भातील शिक्षण. त्यासाठी अनुकूल अशी जनमानसाची जडणघडण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे त्यांनी मानले आणि हा वसा अखेरपर्यंत सांभाळला. या कार्याची महती नेमकी काय, हे आज विशीत किंवा तिशीत असलेल्यांना मुद्दाम समजावून सांगावे लागेल. कारण माध्यमस्फोटाच्या सध्याच्या काळात राजकीय-सामाजिक घडामोडींवर "इन्स्टंट' प्रतिक्रिया देणारे म्हणजे "विचारवंत' असे समीकरण तयार होऊ पाहात आहे. मात्र कृतिशील विचारवंत म्हणजे काय याचे उदाहरण म्हणजे दाभोलकरांचे जीवन.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकाच्या संधिकालात समाज स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहू लागला. प्रबोधनाचे हे पहिलेवाहिले किरण होते. "विचारकलहास का भिता,' असा सवाल आगरकरांनी केला तो याच काळात. दुर्दैवाने महाराष्ट्राची परिस्थिती स्वातंत्र्यानंतरच्या काळात उत्तरोत्तर बिघडत गेली आणि विचारकलहाची जागा नुसत्याच कलहाने घेतली. जातीय, प्रादेशिक, भाषिक किंवा धार्मिक अस्मितांचे अंगार फुलले आणि फुलविले जाऊ लागले. एकीकडे हे चित्र आणि दुसरीकडे अगदी पुरोगामी म्हणविणाऱ्यांमध्येही आक्रस्ताळेपणा जितका जास्त तितका तो अधिक क्रांतिकारक असे मानण्याचा प्रघात रूढ झाला. "समाजात क्षोभ निर्माण करण्यापेक्षा विचार निर्माण करणे हे कितीतरी महत्त्वाचे आणि कठीण कार्य असते', असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत असत. असे कठीण काम हातात घेऊन ते निष्ठेने करणाऱ्यांमध्ये देवदत्त दाभोलकर एक होते. सर्वच प्रकारच्या झगमगाटापासून दूर राहत शांतपणे दाभोलकर आपले काम करीत राहत. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे, यावर त्यांची श्रद्धाच होती. त्यांच्या दृष्टीने ही एक "सायलेंट रिव्होल्युशन' होती. "नवभारत'चे त्यांचे शिक्षणाला वाहिलेले विशेषांक याचीच साक्ष देतात. "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन'च्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य या दृष्टीने उल्लेखनीय आहे. दाभोलकर अर्थशास्त्राचे अभ्यासक. अंत्योदयाचा विचार त्यांच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासात केंद्रस्थानी होता. दाभोलकरांच्या विचारनिष्ठेमुळेच विनोबा भावे यांनी "आचार्यकुला'चे सदस्य म्हणून त्यांना निवडले होते. विनोबांना जे "अनुशासन पर्व' अभिप्रेत होते, त्यात समाजाला शिक्षकाच्या भूमिकेतून वळण लावण्याचा विचार होता. दाभोलकरांसारखे लोकच हे काम करू शकतील, असा त्यांना विश्‍वास वाटत होता. आणीबाणीच्या काळात दाभोलकर पुणे विद
्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहत होते. या अस्थिर कालखंडातही त्यांनी कुलगुरुपदावर आपला ठसा उमटविलाच. आपल्या मुलाने आणीबाणीविरोधी सत्याग्रहात भाग घेतला तर आपले कुलगुरुपद अडचणीत येऊ शकते, हे माहीत असूनदेखील त्यांनी मुलाला विरोध केला नाही. अर्थात त्यांना स्वतःला जयप्रकाशांचे आंदोलन आणि जनता पक्षाचा प्रयोग याविषयी आस्था वाटत होती. ती केवळ कॉंग्रेसविरोधातून किंवा द्वेषातून नव्हे; तर विकसनशील देशात समर्थ राजकीय पर्याय होणे लोकशाही स्थिरावण्याच्या दृष्टीनेही आवश्‍यक असते, हा विचार त्यामागे होता. उजव्या आणि डाव्यांनी एकत्र येऊन काही प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हा समन्वयाचा विचार हे दाभोलकरांचे वैशिष्ट्यच होते. हा समन्वयाचा सूर अनेकांना रुचला नाही; परंतु जनता पक्षाच्या प्रयोगाचा विचका झाल्यानंतरही दाभोलकरांनी हा विचार कधी सोडला नव्हता. त्यांचा समन्वयवाद म्हणजे भोंगळपणा नव्हता, तर त्यामागे समाजाला उपकारक असा उदारमतवाद आणि भिन्न विचार समजावून घेण्याची सहिष्णुता होती. आज ती दिवसेंदिवस दुर्मिळ होताना दिसते आहे आणि लोकशाही तत्त्वे पायदळी तुडविली जात आहेत. अशा काळात दाभोलकरांचे विवेकाचे बोल हा एक मोठाच आधार होता.

एकविसाव्या शतकातील मराठी

मराठीच्या दैनंदिन वापरात अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर भरमसाठ वाढतो आहे. ‘‘कौंग्रँच्यूलेशब’’ हा शब्द सहज वाटू लागला आहे. ह्याउलट ‘‘अभिनंदन’’, हा शब्द परका वाटू लागला आहे. वृत्तपत्रं, दृक-श्राव्य प्रसारामाध्यमं ह्यांना मराठी मथळे सुचेनासे झाले आहेत. हे टाळून निव्वळ मराठी बोलण्या-लिहिण्याचा प्रयत्न हा स्वभाषकांनाही शुद्धिवादी, प्रतिगामी, हटवादी वाटू लागला आहे. मराठीतच नवे शब्द घडवण्याचा, वापरण्याचा कंटाळा वाढतो आहे. शब्द घडवलेच, तर ते संस्कृतप्रचूर आणि क्लिष्ट घडवले जात आहेत.